वास्कोत भर दुपारी गणेश मंदिरात चोरी

0
68

पोलीस स्थानकानजीक प्रकार

मुरगाव पोलीस स्थानकाच्या पंधरा ते वीस मीटर अंतरावर असलेल्या गणपती पंचायतन संस्थानया श्री गणेशाच्या मंदिरात अज्ञात चोरट्यांनी घुसून येथे असलेली फंड पेटी फोडून २५ हजार रुपयांची रक्कम लंपास केली. आज दुपारी दिवसाढवळ्या पोलीस स्थानकांच्या काहीच पाऊले अंतरावर असलेल्या मंदिरात ही चोरी घडल्याने आल्त रुमडावाडा, सडा भागातील लोेकांत आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

आल्त रुमडावाडा येथील या श्री गणेशाच्या मंदिरात चोरी झाल्याने मंदिर समितीचे अध्यक्ष नीळकंठ देसाई यांनी मुरगाव पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल दुपारी २.४५ च्या सुमारास हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. मंदिरात आलेल्या एका भाविकांने येथील फंड पेटी फोडल्याचे पाहताच त्यांनी मंदिराच्या पुरोहिताला याबाबत माहिती दिली. यानंतर पुरोहित दत्तात्रे भट यांनी मंदिर समितीचे अध्यक्ष देसाई यांना याबाबत कळवून नंतर दोघांनी मंदिरात जाऊन तपासणी केली असता फंड पेटी फोडून चोरट्यांनी २५ हजारांची रक्कम लंपास केल्याचे त्यांना आढळून आले. सदर घटनेबाबत पोलिसांना कळताच श्‍वान पथक व ठसे तज्ज्ञाच्या मदतीने मुरगाव पोलिसांनी या चोरीचा पंचनामा केला असता उशिरा रात्रीपर्यंत चोरट्याबाबत काहीच कळू शकले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, या मंदिरात यापूर्वी दोनवेळा चोरीचा प्रयत्न झाला असल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष देसाई यांनी देऊन ते असफल ठरल्याचे सांगितले. चोरी झाल्याने लोकांकडून आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत असून या चोरी प्रकरणातील चोरट्यांना पकडण्याचे एक मोठे आवाहन मुरगाव पोलिसांसमोर उभे राहिले आहे. मुरगाव पोलीस स्थानकाचे निरीक्षक सुरेश नाईक गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश नार्वेकर पुढील तपास करीत आहेत.