वास्कोतील दुहेरी खून प्रकरणी धाकट्या सुनेला अटक

0
117
संशयित प्रतिमाला न्यायालयात नेताना पोलीस., पोलीस नातेवाईकांसमक्ष चौकशी करताना., निर्विकारपणे बसलेली प्रतिमा. (छाया : प्रदीप नाईक)

गुन्ह्याची कबुली दिल्याची पोलिसांकडून माहिती
राज्यभर खळबळ माजवलेल्या वास्को येथील दुहेरी खून प्रकरणाचा गुंता अखेर सुटला असून गोवा पोलिसांच्या विशेष पथकाने सुरूवातीपासून दाट संशय असलेली धाकटी सून प्रतिमा नाईक हिला अटक केल्यानंतर दिलेल्या जबानीत तिने खुनाची कबुली दिली आहे. तिला काल सायंकाळी वास्को न्यायालयाने १४ दिवसांचा रिमांड मंजूर केल्यानंतर पोलीस कोठडीत रवानगी केल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.संशयित आरोपी प्रतिमा हिचे सर्व नातेवाईक, वसाहतीतील लग्नापूर्वीचे मित्र-मैत्रिणी या सर्वांच्या कसून जबान्या घेण्यात येणार असून त्यानंतरच उषा नामदेव नाईक (सासू) व डॉ. नेहा नाईक (जाऊ) यांच्या खुनामागचे खरे कारण स्पष्ट होऊ शकेल, असे महानिरीक्षक गर्ग यांनी सांगितले.
पोलिसांनी बरीच माहिती मिळविली असून संशयित आरोपी प्रतिमा काही प्रकरणी पुरावे सादर केल्यानंतरच गुन्ह्यांची कबुली देते, अन्य कोणतीही माहिती देण्यास तयार होत नाही. आता संशयित पोलिसांच्या ताब्यात आल्याने सत्य उघडकीस आणणे सोपे होईल, असे गर्ग यांनी सांगितले.
अटक करण्यात आलेल्या धाकट्या सुनेची पार्श्‍वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असल्याची माहिती पोलिसांना तपासकाम करतेवेळी मिळाली आहे, असे गर्ग यांनी सांगितले. यापूर्वी तिने घरातील मंडळीवर गुंगीच्या पावडरचा वापर केल्याचा पुरावाही पोलिसांच्या हाती आला आहे. यापूर्वी संशयित प्रतिमाने सोन्याच्या बांगड्या पळविल्याचेही सिद्ध झाले आहे. एका सोनारानेच त्याची माहिती दिल्यानंतर संशयित तिने चोरीचा गुन्हा कबूल केला असल्याचे गर्ग यांनी सांगितले.
दरम्यान, पोलिसांनी काल मृत डॉ. नेहा हिची बहीण डॉ. विशाखा प्रियोळकर हिचीही जबानी नोंदवली. काल प्रतिमाला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, प्रतिमा हिला पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी उसळली होती. पोलीस तपासादरम्यान तिने गुन्ह्याची कबुली द्यावी यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी तिची सतत वीस – बावीस तास उलटतपासणी घेतली.
…अखेर खुनाची कबुली!
या दुहेरी खुनामागे प्रतिमाच असल्याचा संशय सुरूवातीपासून पोलिसांना होता. काल अटक करून तिला पोलिसी दरारा दाखवल्यानंतर रात्री उशिरा तिने खुनाची कबुली दिली. पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर यांनी ही माहिती दिली.
प्रतिमाची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी
संशयित प्रतिमाने यापूर्वी घरातील मंडळीवर गुंगीच्या पावडरचा वापर करून सोन्याच्या बांगड्या पळविल्याचेही पोलीस तपासात सिद्ध झाले आहे. तिने चोरीची कबुली दिली आहे.