एकाच्या मानेतून, दुसऱ्याच्या हातातून गोळी आरपार
गंभीर जखमी कामगारांवर गोमेकॉमध्ये उपचार सुरू
पोरस्कडे-उगवे येथील तेरेखोल नदीकिनाऱ्यावरील घटना
पोलिसांकडून गुन्हा दाखल; 7 जण चौकशीसाठी ताब्यात
पेडणे तालुक्यातील पोरस्कडे-उगवे सीमारेषेवर तेरेखोल नदीकिनारी वाळू व्यवसायातील वादातून दोन कामगारांवर मंगळवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात बिहारमधील कामगार रामरिशी रामराज पासवान आणि लाल बहादूर गोड हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सध्या बांबोळीतील गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू आहेत. पेडणे पोलीस निरीक्षक सचिन लोकरे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. गोळी एका कामगाराच्या मानेतून, तर दुसऱ्याच्या हातातून आरपार गेल्याचे पोलिसांनी सांगितले. गोळीबार नेमका कोणी आणि का केला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित अजूनही सापडला नसून, पोलिसांनी सात जणांना संशयित म्हणून ताब्यात घेत त्यांची चौकशी केली. दरम्यान, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या गोळीबाराच्या घटनेची गंभीर दखल घेत कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाळू काढण्यासाठी आठ जण कामगार होडीतून तेरेखोल नदीकडे जात असताना अचानक दोन मजुरांवर गोळीबार करण्यात आला. ही गोळी एका कामगाराच्या मानेतून, तर दुसऱ्याच्या हातातून आरपार गेल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमी कामगारांना ताबडतोब रुग्णवाहिकेतून बांबोळीतील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
उच्च न्यायालयाने बेकायदा वाळू उपशावर बंदी घातली असतानाही काही ठिकाणी हा व्यवसाय चोरट्या मार्गाने सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. न्यायालयाने फिरती पथके स्थापन करण्याचे आदेश दिले असतानाही अशा कारवाईला दुय्यम दर्जा दिला जात असल्याचे दिसून येते. त्या त्या तालुक्यातील उपजिल्हाधिकारी, मामलेदार, पोलीस निरीक्षक, किनारी पोलीस, तसेच स्थानिक तलाठ्यांना कारवाईचे अधिकार बहाल करण्यात आले; मात्र बेकायदा वाळू उपशावरील कारवाईकडे बहुतांशवेळा दुर्लक्षच केले जाते. त्यातूनच या व्यवसायातून वर्चस्ववादाची स्पर्धा घातक वळणावर पोचली आहे.
हा गोळीबार दोन गटात झाला का? असाही संशय नागरिक व्यक्त करत आहेत. त्या दृष्टिकोनातूनही पोलीस तपास करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन लोकरे यांनी दिली. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता कलम 109 आणि 3 आर/डब्ल्यू 25 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोरस्कडे-उगवे परिसरात वाळू व्यवसायामुळे स्थानिक शेतजमिनी नदीकाठाशी कोसळत आहेत. या संदर्भात नागरिकांनी वारंवार तक्रारी आणि न्यायालयात अर्ज दाखल केले आहेत. रेती काढण्यासाठी होणाऱ्या स्पर्धेमुळे रात्रीच्या वेळी हद्दीतील वाद, मारामाऱ्या आणि अशा गंभीर घटना वाढल्या आहेत.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, काही रेती व्यापाऱ्यांकडून पोलिसांना अभय मिळते. त्यामुळे बेकायदा रेती उपसा रोखण्यासाठी ठोस पावले उचलली जात नाहीत. पूर्वीही वाळू व्यवसायाशी संबंधित हल्ल्यांच्या घटना घडल्या असून, योग्य कारवाई न झाल्याने वाळू तस्करांना कायद्याचा धाक राहिलेला नाही, अशा प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. सध्या पेडणे पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, गोळीबारामागील कारण आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी चौकशी वेगाने सुरू आहे.

