वार्षिक शिखर परिषदेसाठी व्लादिमीर पुतीन भारतात दाखल

0
7

आज होणाऱ्या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदीही होणार सहभागी; अनेक करार अपेक्षित

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे काल भारत दौऱ्यावर आगमन झाले. दिल्लीच्या पालम विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर देखील उपस्थित होते. रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पुतीन यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. पुतीन हे भारतात दोन दिवसांच्या राजकीय दौऱ्यावर आले आहेत. तसेच ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर शुक्रवार दि. 5 डिसेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या 23 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत.

व्लादिमीर पुतीन यांचा अधिकृत कार्यक्रम शुक्रवारी म्हणजे 5 डिसेंबर रोजी सुरू होणार आहे. पुतीन यांच्या दौऱ्याची सुरूवात राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीने होईल. राष्ट्रपती भवनातून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पुतीन हे राजघाट येथे स्मृतिस्थळावर श्रद्धांजली वाहण्यासाठी जातील. त्यानंतर ते हैदराबाद हाऊसला जातील. शिखर परिषदेदरम्यान, पुतीन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. दोन्ही नेते कच्च्या तेलाचे करार, एस-400 क्षेपणास्त्र प्रणालीची खरेदी आणि मुक्त व्यापार करार यावर चर्चा करतील असे सांगितले जात आहे. या दौऱ्यात भारत आणि रशिया यांच्यातील विविध सामंजस्य करारावर स्वाक्षरी दोन्ही देशांच्या प्रमुखांकडून केली जाऊ शकते.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या पुतीन यांच्या सन्मानार्थ एक राजकीय डिनरचे आयोजन करतील. शिखर परिषदेनंतर, पुतीन रशियन सरकारी ब्रॉडकास्टर आरटीच्या नवीन भारत चॅनेलचा शुभारंभ करतील. त्यानंतर ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या राजकीय भोजनाच्या कार्यक्रमात सहभागी होतील. यानंतर पुतीन हे शुक्रवारी रात्री 9.30 वाजता रशियाकडे प्रयाण करतील.

भारत-रशियात मोठा संरक्षण करार
भारत आणि रशिया यांच्यात एक मोठा संरक्षण करार झाला आहे. भारत आणि रशियादरम्यान अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीसाठी अर्थात न्यूक्लियर सबमरीनसाठी सुमारे 2 अब्ज डॉलर्सच्या (जवळपास 16700 कोटी रुपये) करारावर अंतिम शिक्कामोर्तब झाले आहे. नौदल प्रमुख दिनेश के. त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताला ही पाणबुडी 2027 पर्यंत मिळणे अपेक्षित आहे.

नरेंद्र मोदी हे दबावात येणारे नेते नाहीत : पुतीन
भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी व्लादिमीर पुतीन यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत पुतीन यांना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतची द्विपक्षीय चर्चा आणि भारत- रशियाच्या संबंधांचे भविष्य याबाबत प्रश्न विचारण्यात आले. या मुलाखतीत पुतीन यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाचे कौतुक केले. त्यांना अमेरिकेने भारतावर लादलेल्या टॅरिफ संदर्भात विचारण्यात आले होते. त्याबाबत पुतीन यांनी मोठे वक्तव्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दबावात येणारे नेते नाहीत, असे ते म्हणाले. अमेरिका टॅरिफच्या माध्यमातून दबाव टाकतेय, का असा प्रश्न पुतीन यांना विचारण्यात आला होता.

राहुल गांधींचा सरकारवर मोठा आरोप
व्लादिमीर पुतीन यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. मोदी सरकार परंपरेच्या विरुद्ध जात असून, त्यांना वाटणाऱ्या असुरक्षिततेच्या भाननेमुळे त्यांना किंवा विरोधी पक्षाच्या कोणत्याही प्रतिनिधीला पुतीन यांना भेटू दिले जात नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.