वारखंडे – फोंडा येथे ट्रक आणि स्कूटर यांच्यात झालेल्या अपघातात स्वाती ऊर्फ अनिष्का राठोड (32, कुर्टी) या महिलेचा मृत्यू झाला. अपघातानंतर स्थानिक लोकांनी अपघातस्थळावर मोठी गर्दी केली. वारखंडे येथे 4 रस्त्याजवळ ट्रक आणि स्कूटर यांच्यात हा अपघात झाला. सदर स्वाती राठोड, तिचा पती आणि त्यांचा अल्पवयीन मुलगा एकत्र प्रवास करत असताना हा अपघात झाला. यात डंपरच्या जोरदार धडकेत पत्नी स्वाती हिचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर पती आणि मुलगा गंभीर जखमी झाले. दोघांनाही त्वरित रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
फोंडा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला. अपघातस्थळावर वारंवार अपघात घडत आहेत. त्यावर उपाययोजना आखण्याची मागणी स्थानिकांनी यावेळी केली आहे. दरम्यान, या अपघातानंतर परिसरात स्थानिकांत प्रचंड संताप निर्माण जाला. स्थानिकांनी यावेळी आंदोलन करत इथून जाणाऱ्या इतर डंपर ट्रकची वाहतूक रोखली. स्थानिकांनी अपघातस्थळापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर पोलीस चौकी असतानाही पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यास विलंब झाल्याचा आरोप केला. यावेळी संतप्त जमावाने दोन डंपर ट्रकचे नुकसानही केले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

