वानखेडेवरचे तुफान

0
23

कोणत्याही खेळासारखाच क्रिकेट हाही आशा-निराशेचा खेळ आहे. मैदानावर जे घडते, त्यानुसार प्रेक्षकही भावभावनांच्या हिंदोळ्यावर झुलत असतात. यशाकडे वाटचाल असेल तर जल्लोष करत असतात, पराजयाकडे वाटचाल असेल तर आसवेही ढाळतात. भारताचा सामना असेल तर भावना नुसत्या उचंबळून आलेल्या असतात. मात्र, मुंबईत वानखेडे मैदानावर परवाच्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान ह्या त्रयस्थ सामन्यात जे घडले, तो अनुभव प्रत्येक क्रिकेटचाहत्यासाठी तेथे आपला भारतीय संघ नसूनही थरारून टाकणारा होता. एखाद्या पराभवाच्या छायेत असलेल्या संघाला केवळ स्वबळावर विजयाकडे घेऊन जाणे हे काही नवीन नाही, अनेकदा असे तारणहार संघांना भेटत असतात. परंतु ऑस्ट्रेलियाच्या संघाला विजयाप्रत घेऊन जाताना ग्लेन मॅक्सवेलचे जे वादळ वानखेडेवर घोंगावले ते विस्मयकारी होते. अनेक विक्रमांना उलटेपालटे करीत मॅक्सवेलने चौकार, षटकारांची आतषबाजी करीत ज्या चौफेर तुफानी फलंदाजीचे दर्शन घडवले ते पुढची कित्येक वर्षे तरी विस्मरणात जाण्यासारखे नाही. खरे तर अफगाणिस्तान संघाने ह्या सामन्यावर आपली जबरदस्त पकड बसवली होती. ऑस्ट्रेलियाचा पाच वेळा विश्वचषक जिंकणारा संघ बघता बघता लडखडला होता. एकोणीस षटकांत सात बाद 91 ह्या धावसंख्येवर असलेल्या आणि एकूण 292 धावांना पार करण्याचे आव्हान समोर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला हा सामना जिंकता येईल आणि ह्या विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठता येईल अशी सुतराम शक्यता प्रेक्षकांना वाटत नव्हती. खुद्द ऑस्ट्रेलियाच्या संघानेही जणू आपला दारूण पराभव गृहित धरला होता. पण पुढे जे घडले तो खरोखरच चमत्कार होता. मॅक्सवेलने केवळ ऑस्ट्रेलियाच्या संघाला तारलेच नाही, तर क्रिकेट ह्या खेळाची चित्तथरारकता किती असू शकते तेही दाखवून दिले. सुरवातीचे आपले अर्धशतक गाठेपर्यंत त्याच्या फलंदाजीत सावधगिरीची झाक होती. मात्र, नंतर तो असा काही सुसाट सुटला की त्याने अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची पार दाणादाण उडवली. त्यातही कोणाला फटकावायचे आणि कोणाला नाही ह्याचे भानही त्याने कायम ठेवले होते हे विशेष. वर म्हटल्याप्रमाणे, पराभवाच्या छायेत असलेल्या संघाला विजयाकडे नेणारी कामगिरी काही नवी नाही. विश्वचषक स्पर्धेत अनेकदा असा रोमांच दिसला आहे. 1983 साली कपिल देवने 138 चेंडूंत तुफानी 175 धावा काढून भारताला असेच तारले होते आणि नंतर आपल्या संघाला विश्वचषकावर नाव कोरता आले होते. परंतु ज्या शारीरिक परिस्थितीत मॅक्सवेलने ही कामगिरी केली ती खरोखरच कौतुकास्पद होती. धावांमागून धावा काढताना दीर्घकाळ मैदानावर राहिल्याने त्याला तीव्र स्नायुुदुखीचा त्रास सुरू झाला. पाय हलवणेही कठीण बनले. मग धावून धावा घेण्याच्या फंदात न पडता त्याने चौकार, षटकारांचा असा काही धमाका उडवला की प्रेक्षकही थक्क होऊन मैदानावरील हा चमत्कार पाहत होते. फलंदाजीची नजाकत हरवू न देता ज्या तडफेने त्याने आपले द्विशतक झळकवले आणि संघाला विजयाकडे नेले ते कमालीचे होते. प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. आपल्या पहिल्या पन्नास धावा मोजूनमापून काढणाऱ्या मॅक्सवेलला पुढच्या पन्नास धावा काढायला मात्र एकवीस चेंडू पुरेसे होते. पुढे स्नायूदुखी सुरू झाल्यावर तर एकेक धाव घेऊन वेळ घालवण्याऐवजी आलेला चेंडू सीमापार फटकावण्याचा सिलसिलाच त्याने सुरू केला. खरे तर त्याला किमान तीनवेळा जीवदान मिळाले होते. एकदा तर पंचाने पायचित बादही घोषित केले होते, परंतु रिव्ह्यूमध्ये त्याने आपण नाबाद असल्याचे सिद्ध केले. शॉर्ट फाईन लेगला मुजीबुर रेहमानने त्याचा अगदी साधासोपा झेल सोडला, जो अफगाणिस्तानला कमालीचा महाग पडला. हा झेल पकडला असता तर 33 धावांवर असतानाच मॅक्सवेल तंबूत परतला असता, परंतु ते व्हायचे नव्हते. मग मैदानावर हे वादळ नुसते घुमत राहिले. नूर महंमदला रिव्हर्स स्वीपचे तडाखे देण्यासही त्याने मागेपुढे पाहिले नाही. पुढे तर त्याला लागोपाठ दोन षटकारही ठोकले. स्नायूदुखीमुळे पाय हलवणे अवघड बनले असताना एक पाय जागच्या जागीच ठेवून मॅक्सवेलने ही तुफानी फलंदाजी केली हे खरोखरच चक्रावून टाकणारे होते. मॅक्सवेलने आपल्या वादळी खेळीत एकूण 21 चौकार आणि 10 षटकार फटकावले. म्हणजे त्याच्या नाबाद 201 धावांपैकी तब्बल 144 धावा ह्या केवळ सीमापार फटकावलेल्या चेंडूंतून आल्या होत्या. संघाला विजयाप्रत नेतानाच स्वतःचे द्विशतक झळकवून त्याने वैयक्तिक विक्रमही साधला. असे चमत्कार क्रिकेटमध्ये घडतात म्हणूनच ह्या खेळाची रंजकता आणि अफाट चाहतावर्ग बेटिंग आणि मॅच फिक्सिंगच्या कलंकानंतरही टिकून आहे.