वादविवादातून वास्कोत युवकाचा खून

0
9

>> संशयितास पोलिसांकडून त्वरित अटक

दाबोळी – नवेवाडे येथील हाऊसिंग बोर्ड कॉलनीत राहणाऱ्या अँथनी फर्नांडिस या तरुणाने पूर्ववैमनस्यातून छातीत चाकू भोसकल्याने मेहबूब शेख (27, रा. नवेवाडे) हा तरुण जागीच ठार झाला.
अँथनी फर्नांडिस व मेहबूब शेख यांच्यात प्रथम वादविवाद झाला. त्यानंतर अँथनी याने आपल्या जवळील चाकूने मेहबूब याच्यावर चाकूने वार केला. त्यामुळे मेहबूब हा जागीच ठार झाला. या घटनेमुळे नवेवाडे भागात प्रचंड खळबळ माजली. पोलिसांनी या प्रकरणी खून करणारा संशयित आरोपी अँथनी जुझे फर्नांडिस याला ताब्यात घेऊन अटक केली.

नवेवाडे येथील हाउसिंग बोर्ड कॉलनी राहणारे मेहबूब शेख (27) व त्याचा शेजारी अँथनी फर्नांडिस (23) या दोघांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून वाद सुरू होते. त्यांच्यात दरवेळी काहीनाकाही कारणाने बाचाबाची होत होती. काल रविवारी (दि. 6) दुपारी पावणेचारच्या दरम्यान, मेहबूब व अँथनी यांच्यात बाचाबाची सुरू झाली. हे प्रकरण नंतर हातघाईवर आले. दोघांचे भांडण सुरू असतानाच अँथनीचा लहान भाऊ सांतान याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला यश आले नाही. अखेर अँथनी याने आपल्या जवळील चाकू काढून मेहबूब याच्या छातीत खुपसला. यात मेहबूब गंभीर जखमी झाला. सांतान याने मेहबूब याला त्वरित आपल्या दुचाकीवरून दाबोळी चिखली उपजिल्हा इस्पितळात दाखल केले. तेथे डॉक्टरनी मेहबूबला मृत घोषित केले.

संशयितास लगेच अटक
वास्को पोलिसांनी तातडीने कारवाई करत या प्रकरणातील संशयित आरोपी अँथनी फर्नांडिस याला ताब्यात घेतले.
मेहबूब हा सुतारकाम करीत होता. तर अँथनी हा खासगी कारचालक म्हणून काम करतो.