वादळी वार्‍यासह राज्यात पावसाचे थैमान

0
63
नावेली, सुरावली, चिंचोणे, शिरवडे, वेळ्ळी येथे घरांवर झाडे पडून घरांची नुकसानी झाली. काल दुपारपासून अग्नीशामक दलाचे जवान ती कापून काढण्याच्या कामात गर्क होते. कोलवा फोर्त वाडो येथे वृक्ष वीजेच्या खांबावर पडून खांब कोसळले व तारा तुटून रात्रीपासून वीजपुरवठा खंडित झाला. पांजरखाणी, पेड सुरावली, नेसाय, आकें, धर्मापूर येथे झाडे रस्त्यावर पडून वाहतुकीस अडथळा झाला. मडगाव नगरपालिकेजवळ, जुन्या बाजारात वीजेच्या खांबावर स्फोट होऊन तारा तुटून पडल्या. त्यामुळे दुपारपर्यंत वीज पुरवठा खंडित होता.

नगरपालिकेने पावसाळ्यापूर्व कामे मंदगतीने सुरू केल्याने कित्येक ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहत होते. आके, खारेबांध, कोंबा, मालभाट येथे गटारे केरकचरा व चिखलाने भरल्याने पाणी, चिखल व केरकचरा रस्त्यावर पसरला होता तर कित्येक ठिकाणी गटारे उपसून चिखल रस्त्यालगत ठेवला होता. तो परत गटारात पडला तर रस्त्यावरून वाहत सखल भागात गेला. त्यामुळे अनेकाना त्रास झाले. आकें, मालभाट, मडगाव शहराच्या मध्यभागी भुयारी गटार व भुयारी वीज वाहिन्यासाठी खोदली होती. त्यामुळे सर्व रस्ते खराब झाले. कॅनरा बँकेसमोर, विर्जीनकर पंप, टेलिफोन इमारत, साबीना हॉटेल, पोलीस स्टेशन जवळ रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले. कित्येक दिवसांपासून ते दुरुस्त करण्याची मागणी करूनही दोन्ही खात्यानी दुर्लक्ष केल्याने हे खड्डे पडले. त्यामुळे पावसात कित्येक ठिकाणी वाहनाचे अपघात झाले आहेत. कार्मेलाईट चर्च ते आके आल्त, पांडवा चॅपेल, मालभाट येथे भुयारी गटारामुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे. त्या रस्त्याने वाहने सोडाच पायीसुध्दा चालत जाता येत नाही. तात्काळ दुरुस्ती न केल्यास पावसाअगोदर पूर्णपणे रस्ते खराब होतील. मडगाव पालिकेची बेपर्वायी तसेच सेनिटरी विभागाच्या निष्काळजीपणामुळे मडगाव बाजारात सर्वत्र केरकचरा पसला होता.

डिचोली तालुक्यातही मोठी हानी

सोमवारी मध्यरात्री वीजेच्या कडकडाटासह वादळी वार्‍याने थैमान घातल्याने डिचोली तालुक्यात अनेक ठिकाणी पडझड झाली. काही घरांची हानी झाली असून सुमारे १ लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. डिचोली अग्निशामक दलाच्या जवानांनी अविश्रांत मदत कार्य करताना अडथळे हटवले.
कुंभारवाडा-मये येथील रमाकांत शिरोडकर यांची संरक्षण भिंत, भीवा परब यांच्या कुंपणावर वृक्ष कोसळून हानी झाली. तारमाट-चोडण येथील शाणू वैझ, पोपकरवाडा सुर्ल येथील उत्तम सुर्लीकर यांच्या घरांवर वृक्ष कोसळल्याने नुकसान झाले. कुळण येथे झाड पडल्याने हानी झाली. अनेक भागात रस्त्यावर तसेच काही घरांवर झाडे पडल्याने हानी झाली. विविध ठिकाणी रस्त्यावर वृक्ष कोसळल्याने काही वेळ वाहतुकीवर परिणाम झाला. वीज खात्याच्या इमारतीवर वृक्ष कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला.
डिचोली अग्निशामक दलाचे अच्युत धावस्कर यांच्यासह भारत गोवेकर, अशोक परब, संकीत परब, जयेश कांदोळकर, फटू नाईक, विनायक उगवेकर, सुधा गावकर, संतोष म्हापसेकर, आनंद नाईक, अजय खोलकर, मिनेश आगवाडेकर, मनोज साळगांवकर, विलास गावस यांनी मदत कार्य केले. पावसामुळे तुंबलेल्या गटारात पाणी शिरल्याने घाण रस्त्यावर आली. हल्लीच हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्यानांही पावसाचा फटका बसला आहे. मान्सूनपूर्व कामात व्यस्त असलेल्यांना पावसाने अडथळा आणल्याने धांदल उडाली.

फोंडा तालुक्याला चक्रीवादळाचा तडाखा

काल रात्री झालेल्या चक्रीवादळात फोंडा, कवळे, ढवळी, बेतोडा, निरकाल, कोनसे कोडार, सावईवेरे, केरी, मडकई, कुंडई, शिरोडा आदी भागात झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने नुकसान झाले.
काही घरे, इमारतींच्या भिंती कोसळल्या तर काहीं घरात पाणी गेल्याने सामानाची मोठ्या प्रमाणात हानी झाली. वीजेवर चालणार्‍या उपकरणाची हानी झाली. जवळ जवळ दोन तास वीज गायब झाली. काही घरांवर घातलेले पत्रे उडून गेले. फोंडा व कुंडई येथील अग्निशामक दलाच्या जवानांनी मदत कार्य केले.