डिचोलीत सुमारे ५० घरांची हानी झाली आहे. मोठ्या प्रमाणावर झाडे कोसळल्याने तसेच कवाथे, माडी लागवड नष्ट झाल्याने नुकसानाचा आकडा लाखोंच्या घरात असून सरकारी यंत्रणा मदतकार्यात गुंतलेली असली तरी वीज खंडित असल्याने तसेच आवश्यक सामुग्री व मनुष्यबळाचा अभाव असल्याने मदत कार्यात बरीच अडचड येत आहे.
डिचोली प्रतिनिधीने काल वन, मावळिंगे, कुडचिरे, लाखेरे, मये, हरवळे, साखळी या भागाची पाहणी केल्यावेळी नुकसान झालेले बागायतदार व वादळग्रस्त नागरिकांनी करुण कहाणी सांगितली. या सर्वांना सरकारने त्वरित मदतीचा हात देण्याची गरज आहे. अशोक सावईकर यांच्या बागायतीत कोसळलेल्या झाडांचा तसेच पोफळींचा खच पडलेला असून सारी पिके नष्ट झाली आहेत. मंदार सावईकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे ७५ आंब्याची कलमे यंदा भरभरून लागली होती. पुढच्या आठवड्यात काढायची होती. परंतु अस्मानी संकट कोसळले. त्याच्या घरासमोरील आंब्यांना भला मोठा वृक्ष चार चाकीवर कोसळल्याने व्हॅनचे लाखाचे नुकसान झाले.
दोघे जखमी
हरवळे येथे हरिजनवाडा येथील माली तुकाराम परवार (४५) व रुपेश परवार हे घरावर पडलेल्या झाडामुळे कौले कोसळल्याने जखमी झाले. त्यांना बांबोळीला उपचारांसाठी नेण्यात आले.
घरांची मोठी हानी
दिलीप विठू वरक, संजय पेडणेकर, नीलेश फाळे, गंगाराम मोरे, श्री. पेडणेकर व इतरांच्या घराची छप्परे (लाखेरे-डिचोली) उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे. लाखोरे येथे वादळाचा मोठा प्रभाव दिसून आला.
शंकर सदगो गावकर, मुकुंद गावकर, अशोक नाईक, पत डिचोलकर, रघुनाथ शिवराम पांढरे- कासारवाडा, पूनम पुतोग गावकर -पलतडवाडा-कुडचिरे, लाडू झिलगो गावकर, गोविंद गावकर, शंकर कृष्णा नाईक, लाडको गावकर, रुपेश गांवकर यांच्यासह सुमारे ५० हून अधिक घरांची व बागायतींची हानी झाली आहे. बाळकृष्ण सावईकर, प्रसाद उमर्ये, अशोक सावईकर यांच्याबरोबरच अनेकांच्या बागायतीतील मोठे वृक्ष तसेच सुपारीची झाडे पडल्याने मोठी हानी झाली आहे. एकूणच घरांची हानी व बागायतींच्या नुकसानाने लोकांच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत.
वीज पुरवठा खंडित
सर्वत्र वीज वाहिन्या कोसळल्याने, खांब मोडून पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. अग्निशामक दलाचे जवान अविश्रात कामात गुंतलेले असून वीज नसल्याने अडथळे निर्माण होत आहेत. अपुरा कर्मचारीवर्ग असल्याने ताण येत आहे. राज्यातील इतर भागातून त्वरित अग्निशामक जवानांना पाचारण करून मदत कार्यास हातभार लावण्याची मागणी होत आहे. तालुक्यात वादळामुळे मोठे नुकसान झालेले असून ऐन निवडणुकीची तारीख जवळ असल्याने सरकारी यंत्रणा कामात गुंतलेली असल्याने मदत कार्यात अडथळे येण्याची शक्यता आहे.
सत्तरीत नुकसान दीड कोटी रुपयांच्या घरात
सत्तरी तालुक्यात ठाणे, मोर्ले, केरी पंचायतींना सर्वात जास्त वादळाची झळ बसली आहे. सध्या फोंडा व वाळपई येथील प्रत्येकी दोन तर पणजी व पेडणे येथील प्रत्येकी एक अग्नीशामक दलाचे वाहन मदतकार्यात गुंतले आहेत. तालुक्यात वीज व पाणी पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान, काल दुपारी उपमुख्यमंत्री फ्रांसिस डिसोझा, डॉ. प्रमोद सावंत यांनी तसेच विरोधी नेते प्रतापसिंह राणे, कॉंग्रेस उमेदवार रवी नाईक, खासदार श्रीपाद नाईक यांनी वादळग्रस्त भागांची पाहणी केली.
आणखी काही दिवस वादळस्थिती
दक्षिण महाराष्ट्र व गोव्याच्या किनारपट्टीवर आणखी काही दिवस वादळी वार्यांचा वावर राहणार असल्याचे वेधशाळेचे संचालक के.व्ही.सिंग यांनी म्हटले आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री, उपसभापतींकडून पाहणी
उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसौझा यांनी पर्ये, केरी, वाळपई, हरवळे, साखळी भागांचा दौरा करून नुकसानाचा आढावा घेतला. यावेळी डॉ. प्रमोद सावंत तसेच भाजपा नेते उपस्थित होते. विरोधी पक्षेनेते प्रतापसिंह राणे यांनी पर्ये मतदारसंघाचा दौरा करून पाहणी केली.उपसभापती अनंत शेट यांनी सरपंच मधू नाईक, पंच पांडुरंग झोलकर, मदन गावकर, एकनाथ च्यारी आदीं समवेत वन, मावळिंगे, कुडचिरे, नातगिंणी, वाठादेव आदी भागाचा दौरा करून नुकसानाचा आढावा घेतला. आमदार नरेश सावळ, मिलिंद पिळगावकर यांनीही पाहणी केली.
डिचोली-सत्तरी तालुक्यांत तीन दिवस मर्यादित पाणी
वादळ व पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे पाणी प्रकल्पात शुद्धीकरण प्रक्रियेस व्यत्यय आला त्यामुळे दि. ५ एप्रिल ते ७ एप्रिलपर्यंत डिचोली व सत्तरी तालुक्यांतील काही भागांत पाणी पुरवठा मर्यादित असेल.
हे भाग असे – सत्तरी तालुक्यात पर्ये, ठाणे, नगरगाव, केरी. डिचोली पालिका क्षेत्र, लाटंबार्से, वन, मावळींगे, मये, पिळगाव, नार्वे, सुर्ल, वरचे हरवळे पाळे. तिसवाडी तालुक्यात चोडण. दरम्यान ७ तारखेनंतर पाणी पुरवठा सुरळीत होईल.

