वादग्रस्त पोस्ट प्रकरणी जुळ्या बहिणींची चौकशी

0
5

गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने इन्स्टाग्रामवर धार्मिकदृष्ट्या वादग्रस्त मजकूर प्रसारित करत हिंदूंच्या भावना दुखावल्या प्रकरणी काल जुळ्या बहिणींची दोन तास चौकशी केली.

उत्तर प्रदेशमधील राजकारणी आणि गुंड अतिक अहमद याची हत्या करण्यात आल्यानंतर दोन युवतींनी इन्स्टाग्रामवर हिंदूविषयी अपमानास्पद मजकूर प्रसारित केला होता. या मजकुराने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाने सदर दोन युवतींविरुद्ध गुन्हा नोंद केला होता. या दोन्ही युवती जुळ्या बहिणी असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. पोलिसांनी त्या युवतींना चौकशीसाठी बोलाविले होते. पोलीस चौकशी अधिकाऱ्याने त्या युवतींना विविध प्रश्न विचारून सुमारे दोन तास चौकशी केली. तसेच, मजकूर अपलोड करण्यासाठी वापरण्यात आलेला मोबाईल फोन ताब्यात घेतला.

या दोन्ही युवतींनी अटकपूर्व जामिनासाठी येथील जिल्हा न्यायालयात अर्ज केला आहे. त्या अर्जावर गुरूवारी सुनावणी होऊ शकली नाही. पोलिसांकडून न्यायालयात या प्रकरणी अहवाल सादर केला जाणार आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.