सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी वीज खात्याच्या अधिकाऱ्यांना विचारला जाब
मडगाव येथील वीज ग्राहकांवर वाढीव वीज दराचा भार टाकल्यानंतर आता त्यांच्यावर दंडात्मक कारवाई कारवाई होत असल्याबद्दल मंत्री दिगंबर कामत यांनी संताप व्यक्त करत वीज खात्याच्या अधिकाऱ्यांना काल जाब विचारला.
मडगाव मतदारसंघातील लोकांसह मंत्री दिगंबर कामत यांनी वीज खात्याचे अधीक्षक अभियंता राजीव सामंत यांची भेट घेऊन याविषयी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना वीज खात्याच्या कार्यपद्धतीवर कठोर शब्दांत टीका केली.
वीज ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक युनिटप्रमाणे पैसे भरलेले असताना आणि विजेची कोणतीही चोरी झालेली नसताना, कोणतीही थकबाकी नसताना त्यांच्यावर थेट दंडात्मक कारवाई करणे हा अन्याय आहे, अशा शब्दांत मंत्री दिगंबर कामत यांनी चर्चेदरम्यान वीज खात्याच्या अधिकाऱ्यांना सुनावले.
ग्राहकांनी आपला वीजभार वाढल्यास नियमानुसार अर्ज करून तो नियमित करणे अपेक्षित असते; मात्र त्यासाठी ग्राहकांना पूर्वकल्पना देणे, प्रत्यक्ष पाहणी करणे आणि आवश्यक मार्गदर्शन करणे गरजेचे होते. ही वीज खात्याची जबाबदारी आहे; पण तसे न करता अचानक ग्राहकांना भार वाढल्याचे दाखवून हजारो रुपयांचा दंड आकारणे योग्य ठरू शकत नाही. अनेक ग्राहकांचे मासिक वीज बिल यापूर्वी 700 रुपये येत होते. आता त्यांना दोन ते अडीच हजार रुपयांपर्यंत बिल आले आहे, असे दिगंबर कामत यांनी सांगितले.

