वाढदिवस

0
5
  • मीना समुद्र

वाढदिवस म्हणजे काय असतं? नुसतंच शरीरानं वाढणं नव्हे तर बुद्धीनं, ज्ञानानं, मनानं वाढणं असतं. त्यात कौतुक जरूर असतं. माया असते, प्रेम असतं, शुभेच्छा असतात, आशीर्वाद असतात आणि समाजाचं अंग बनलेल्या त्या विशिष्ट व्यक्तीला तिच्या जन्माचं मोल बाकीच्यांना किती आहे हे जाणीवपूर्वक सांगणं असतं.

‘तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो पचास हजार’ हे गाणं ऐकलं आणि एक आठवण झाली. बरेच दिवस रिकाम्या पडलेल्या सोसायटीच्या फ्लॅटमध्ये एक चौकोनी कुटुंब राहायला आलं. नवरा-बायको आणि त्यांच्या दोन छोट्या मुली. मराठी असल्यानं ओळख पटकन झाली. जिन्यातून जाता-येताना आईबाबांशी चाललेली मुलींची कुलकुल किलबिल कानाला गोड वाटायची. ‘आजी-आजी’ करत यायच्या. आईही छान बोलघेवडी. पदार्थांची देवाणघेवाण, आवडलं की आवर्जून कृती विचारून करणं, गप्पाटप्पा, मुलींच्या गमतीजमती सांगणं… वर्ष कधी सरलं कळलंच नाही आणि बदलीची ऑर्डर आली नवऱ्याला. छान बसलेलं बस्तान सोडून आता दूरच्या गावी जायचं आणि सासरच्या माणसांबरोबर राहायचं जिवावर आलं होतं तिच्या. पण काय करते बिचारी! शेवटी धाकटीच्या वाढदिवसानिमित्तानं सोसायटीतल्या सगळ्याच मुलांना आणि काकू, मावश्या, आजींना तिने घरी बोलावलं.

सुंदरसा झालरीचा घेरदार फ्रॉक तिने लेकीसाठी स्वतः शिवला होता. तो घालून ती छोटी सुंदर बाहुली दिसत होती. मोत्यांची फुलं असलेला हेअरबँड घातला होता आणि अगदी हौसेनं हातातल्या बांगड्या आणि पायातले पैंजण खुळखुळ वाजवत ती नाचत-बागडत होती. वाढदिवसाचा आनंद तिच्या चेहऱ्यावरून निथळत होता. तिच्या आईनं एरव्हीही नीटनेटकं असणारं त्यांचं घर छान सजवलं होतं. सगळीकडे रंगीबेरंगी फुगे टांगले होते. भिंतीवर ‘हॅपी बर्थडे’ अशी अक्षरं झळकत होती. टेबलवर डिशेस, पाण्याचा जग, ग्लास, चमचे नीट मांडून ठेवले होते. मुलांच्या डोक्यावर निमुळत्या टोप्या होत्या. कुणी रंगीत चष्मे, तर कुणी मुखवटे घातले होते. फुगे उडवत सगळे नाचत होते. टिवल्याबावल्या करत होते. हळूहळू मोठी माणसंही जमू लागली. पण केक घेऊन येणारे छोटीचे बाबा अजून आले नव्हते. तिचं सगळं लक्ष दाराकडे होतं. एकदोघांच्या हातातल्या चमचमत्या कागदात गुंडाळलेल्या भेटी तिनं दारातून आत येणाऱ्यांकडून घेऊन टेबलवर नेऊन ठेवल्या होत्या. ‘अगं येऊ दे तरी त्यांना आत’ अशा आईच्या म्हणण्याला हसून मान वेळावत होती. तेवढ्यात तिचे बाबाही भलामोठा खोका सावरीत आत आले. ती अगदी अधीर होऊन पुढे सरसावली, पण बाबांनी तो खोका अलगदपणे टेबलवर ठेवला आणि ते तयार होण्यासाठी गेले. तोपर्यंत छोटीच्या आईने केक खोक्यातून अलगदपणे बाहेर काढून फुलांनी सजवलेल्या टी-पॉयवर ठेवला. मेणबत्ती खोचली. हं, चौथा वाढदिवस. मेणबत्ती पाहून सगळ्यांच्या लक्षात आलं. तोपर्यंत छोटीने त्या सुंदर बाहुलीच्या आकाराच्या केकमधला घागऱ्याच्या घेरातला एक बचकभर केक काढून चाटला. पुन्हा क्रीमसाठी हात पुढे केला तेव्हा आईने तिच्या हातात गुलाबी रिबीन बांधलेली सुरी दिली. सगळी बच्चेकंपनी भोवती गोळा झाली होतीच. मेणबत्ती लावली आणि छोटीने केक कापताच सगळ्यांनी टाळ्या वाजवीत ‘हॅपी बर्थडे’ म्हटलं. सर्वांनी तिला उदंड आयुष्य चिंतिलं. केकचा घास आई-बाबा-ताईला भरवत स्वतःला त्यांनी भरवलेला घास तिने खाल्ला आणि खूप आनंदित होऊन सगळ्यांना खाऊ देण्यासाठी ती पुढे सरसावली. एकेक प्लेट आई-ताई भरून देत होत्या आणि सामोसे, चिप्स, केक खात मुले मजेत बसली होती. मग कप आइस्क्रीम खाताना तर त्यांना खूपच मजा आली. खाणंपिणं झाल्यावर कुणी नाच केला. छोटीनं ताईबरोबर गाणं म्हटलं. मोठ्यांच्या पाया पडणं झालं. कुणी डोक्यावरून, कुणी पाठीवरून, कुणी गालावरून मायेनं, कौतुकानं हात फिरवल्यामुळे ती सुखावली. जास्तच लाडे-लाडे बोलून सगळ्यांना तिने ‘थँक्यू’ म्हटलं आणि परतभेट म्हणून दिलेली खेळणी, फुगे घेऊन मुलं-माणसं आनंदानं घरोघर परतली.

घरगुती वाढदिवस आजकाल साधारणपणे अशाच पद्धतीने साजरे केले जातात. शाळेचा दिवस असेल तर वर्गासाठी केक, फुगे, भेटी अशा वस्तूही पाठवल्या जातात. पण काही शाळांत मात्र मुलांच्या मनात निर्माण होणाऱ्या चढाओढीमुळे ही पद्धत बंद केली आहे. खाऊ आणि भेटी या काही मुलांना देणे परवडत नाही आणि ज्यांना ते जमतं त्यांच्यात काहीतरी जास्त, महागडं देण्याची चुरस लागते. यामुळे मुलांच्या मनात स्पर्धा-चुरस निर्माण होते किंवा कमीपणाची भावना. साधारणपणे 15 एप्रिलनंतर शाळांना सुट्ट्या लागतात. शाळेच्या सुट्ट्या वाढदिवशी आल्या की ती मुलंही खट्टू होतात. मुलांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्यासाठी खाऊ तयार करायचं कामही काही शाळेत चालतं. केक हा मात्र अतिशय आवडता असतो लहान-मोठ्या सगळ्यांचाच. माझ्या एका नातीचा वाढदिवस 15 ऑगस्टला. ती लहानपणी खूपच नाराज असायची. मग तिची समजूत घालायची- “बघ, तुझ्या वाढदिवसाला झेंडावंदन असतं. छान कार्यक्रम असतात दिवसभर. बाकी कुणाला मिळते का अशी मजा?” तेव्हा थोडी समजूत पटायची तिची. स्वयंसिद्ध झाली की मुले बाहेर मित्रमैत्रिणींसाठी पार्ट्या अरेंज करतात.

नाहीतरी वाढदिवस म्हणजे काय असतं? नुसतंच शरीरानं वाढणं नव्हे तर बुद्धीनं, ज्ञानानं, मनानं वाढणं असतं. त्यात कौतुक जरूर असतं. माया असते, प्रेम असतं, शुभेच्छा असतात, आशीर्वाद असतात आणि समाजाचं अंग बनलेल्या त्या विशिष्ट व्यक्तीला तिच्या जन्माचं मोल बाकीच्यांना किती आहे हे जाणीवपूर्वक सांगणं असतं. मोठ्यांच्या, थोरांच्या जबाबदारीची जाणीव किंवा आठवण, त्याच्या कार्यकर्तृत्वाचं गुणगान कानी पडलं की थोर संस्कारांचं बीज लहानांच्याही मनात रूजतं. त्या दिवशी त्या मुलांच्या हस्ते आश्रमात दान केलं जातं.
पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंबात घरी प्रचंड प्रमाणात माणसांची गर्दी. पण प्रत्येक नवजात बाळाचा जन्मोत्सव त्याच उत्साहाने, कौतुकाने साजरा होई. ‘लक्षात कशी राहात असेल बरं प्रत्येकाची जन्मतिथी वा तारीख?’ असं वाटे. पण वटवृक्षासारखा संसार विस्तारलेल्या घरात प्रत्येकाच्या जन्माची, लग्नतिथीची नोंद ठेवणाऱ्या आणि कुटुंब विभक्त झाल्यावरही कौतुकाने त्या प्रसंगी सर्वांना मुद्दाम एकत्र आणणाऱ्या गृहिणीही मला माहीत आहेत. भलेही आजच्यासारखे जंगी वाढदिवस होत नसतील साजरे; पण वाढदिवशी सकाळीच तेल लावून आंघोळ घालणे आणि देवाला नमस्कार, मोठ्यांना नमस्कार आणि आशीर्वाद घेणे असे. घरगुतीच शिरा-पुरी, खीर-पुरीसारखं साग्रसंगीत, पण त्या व्यक्तीच्या आवडीचं असं गोडधोड बनवलं जाई. रांगोळी काढलेल्या पाटावर बसवून सुपारीसारखा टणक, कापसासारखे पांढरे केस होईपर्यंत दीर्घायुष्य लाभावं म्हणून आणि दुर्वांच्या वर्धिष्णू पसाऱ्यासारखी संतती-संपत्ती लाभावी म्हणून पवित्र नाम लावून, अक्षता डोक्यावर टाकून त्या अंगठी-सुपारीने आणि उजळलेल्या निरांजनाच्या स्निग्ध ज्योतींनी त्या व्यक्तीचे औक्षण केले जाई. नवेकोरे नसले तरी ठेवणीतले कपडे परिधान केलेले असत. त्या-त्या व्यक्तीचा तो एक स्वतंत्र महत्त्वाचा कौतुकसोहळा होई. थोर महात्मे किंवा सणवार असेल तर विशेषच कौतुकाचे अस्तर लाभे. पूर्वी भेटकार्ड-पत्राद्वारे अभीष्टचिंतन होई.

आजकाल फोन, व्हॉट्सॲपमुळे वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश देणे सोपे झाले आहे. काहीवेळा नेमके त्या दिवशी विसरायला होते तेव्हा ‘वाढता वाढदिवस’ हा पर्याय असतो. सोयीनुसार, सुट्टी, सवडीनुसार पण अतिशय धूमधडाक्यात वाढदिवस साजरा करण्याचे प्रमाण आजकाल वाढले आहेत. बाळाचा वर्षवाढदिवस अतिशय दणक्यात साजरा होतो. लाऊडस्पीकर, खेळ, सजावट, फोटो, पाहुण्या-परिचितांची गर्दी, मनोरंजनासाठी गाणी असे इव्हेंट-मॅनेजमेंट असते. चित्रपटातील केक फेकाफेकीचे, चेहऱ्याला बरबटण्याचे प्रकार अतिशय हीन दर्जाचे वाटतात. वाढदिवस विसरला म्हणून रुसणं, बराच काळ अबोला धरणं हे प्रकारही मोठ्यांना शोभत नाहीत. रौप्यमहोत्सवी, सुवर्णमहोत्सवी, अमृतमहोत्सवी, हीरक महोत्सवी असे वाढदिवस वयाप्रमाणे साजरे केले जातात. 80 व्या वर्षी सहस्रचंद्रदर्शन सोहळा केला जातो. शंभरी गाठणारे कमीच, पण त्यांना गौरविले जाते. ‘जीवेत्‌‍ शरदः शतम्‌‍’ हीच इच्छा व्यक्त केली जाते.