- डॉ. मनाली महेश पवार
सध्या उष्णतेचा भरपूर त्रास होत आहे. बरेच रुग्ण सारखी तहान लागते, रॅश येते, डोळ्यांची जळजळ होते, ॲसिडिटी होते, केस गळतात- पांढरे होतात, लघवीला त्रास होतो, अशक्तपणा वाटतो, सारखी चिडचिड-राग येतो इत्यादी समस्या घेऊन येत आहेत. याचाच अर्थ तुमच्या शरीरातील उष्णता वाढली आहे किंवा पित्त वाढले आहे.
गेल्या काही दशकांपासून तापमान वाढतच आहे. प्रत्येक दशक आधीपेक्षा कडक उन्हाळा घेऊन येत आहे. यापुढील वर्षे बहुतेक तीव्र उन्हाळ्याचीच असणार आहेत. हवेतील वाढते कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर उष्णता धरून ठेवत आहे. वाढत्या वाहनांमधून सोडला जाणारा धूर, कारखान्यांचा धूर, विमानांद्वारे हवेत सोडला जाणारा क्लोरोफ्ल्युरो कार्बन सूर्याकडून येणारी उष्णता धरून ठेवतो व हवेचे तापमान वाढते. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात नष्ट होत चाललेली राने-वने म्हणजेच वृक्षतोड या सर्वांच्या एकत्रित परिणामांमुळे तीव्र उन्हाळा जाणवत आहे.
सध्या उष्णतेचा भरपूर त्रास होत आहे. बरेच रुग्ण सारखी तहान लागते, रॅश येते, डोळ्यांची जळजळ होते, ॲसिडिटी होते, केस गळतात- पांढरे होतात, लघवीला त्रास होतो, अशक्तपणा वाटतो, सारखी चिडचिड-राग येतो इत्यादी समस्या घेऊन येत आहेत. याचाच अर्थ तुमच्या शरीरातील उष्णता वाढली आहे किंवा पित्त वाढले आहे. आयुर्वेदानुसार पित्ताचे गुण पाहिल्यास ही लक्षणे तुमच्या शरीरात का उत्पन्न होत आहेत हे लक्षात येते. उष्ण, तीक्ष्ण, लघु, विस्र, सर आणि द्रव हे पित्ताचे गुण आहेत. हे पित्ताचे गुण जसे वाढतात तसे शरीरात वरील लक्षणांमध्ये वृद्धी होते. त्याचप्रमाणे काहींची जन्मजात प्रकृतीच पित्ताची असते. अशा लोकांना तर उष्णतेचा भरपूर त्रास होतो. काहींचा व्यवसाय किंवा जीवनशैलीच अशी असते की त्यामुळे उष्णता वाढते. शिवाय ग्रीष्म व शरद ऋतूंमध्ये तुमची प्रकृती कोणतीही असो किंवा व्यवसाय कोणताही असो, या दोन ऋतूंमध्ये उष्णतेचे विकार हे होतातच. बाह्य वातावरणामुळे, प्रखर सूर्याने, उन्हामुळे ही उष्णता आपोआप वाढते. मग ही उष्णता वाढल्यावर त्याचे दुष्परिणाम शरीर-मनावर होऊ नयेत म्हणून आपण काय करू शकतो हे पाहू…
उष्णता कमी करण्यासाठी उपाय
उष्णता कमी करण्याचे उपाय हे फक्त बाहेरून नसावे, ते आतून करावे. मार्च, एप्रिल व मे महिन्यांत शरीरातील पित्त नैसर्गिकरीत्या वाढते. त्याचे मुख्य कारण सूर्याची उष्णता. तीव्र उन्हाळा या काळात असतो. त्याने आपल्या शरीरातील ऊर्जा कमी होते. कारण काहीही असो, पण खालील काही उपायांनी आपण आपली या ऋतूबदलामध्ये काळजी नक्कीच घेऊ शकतो.
1) धण्याचा फाण्ट ः आपणा सर्वांनाच माहीत आहे की लघवीला त्रास होऊ लागला म्हणजे उन्हाळे लागले. लघवीला जळजळ, वेदना व्हायला लागल्या की धण्याचे पाणी दिले जाते आणि ते प्यायल्यावर बरे वाटते. मग हे धण्याचे पाणी नेमके कसे बनवायचे ते पाहू. काही धणे घ्यावे. ते मंद आचेवर परतावे. त्यानंतर ते कुटून किंवा मिक्सरला लावून त्याची भरड करून घ्यावी. ही भरड एखाद्या हवाबंद डब्यात भरून ठेवावी. धण्याचे पाणी बनवताना 1. चमचा ती धण्याची भरड एका ग्लासमध्ये टाकावी व वर गरम पाणी ओतावे आणि तो ग्लास झाकून ठेवावा. रात्रभर ते पाणी तसेच ठेवावे व सकाळी उठल्यावर गाळून प्यावे. यालाच आयुर्वेदशास्त्रामध्ये ‘धण्याचा फाण्ट’ म्हटले आहे. सकाळी परत तसेच 1 चमचा भरड एक ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवून रात्री हे पाणी प्यावे. असे केल्याने धण्याचे सर्व गुण त्या पाण्यात उतरतात.
- धणे हे गुणाने शीत (थंड), पचायला हलके, अग्नी दीपन व पाचन करणारे असतात.
- मूत्रविकारावर हे धणे उपयुक्त आहेत.
- दाहनाशक व तृष्णानाशक आहेत. शरीरातील कोरडेपणा, आग, जळजळ व परत लागणारी तहान कमी करण्यासाठी ते उपयुक्त ठरतात.
- धणे हे नेत्र्य आहेत म्हणजे डोळ्यांसाठी हितकारक आहेत. उन्हाळ्यामध्ये डोळ्यात आग, जळजळ, खाज, पाणी येणे यांसारख्या लक्षणात हे धणे उपयुक्त आहेत.
- उलटी, अतिसार, आम्लपित्त या विकारातदेखील हा ‘धण्याचा फाण्य’ उपयुक्त ठरतो.
- काळ्या मनुका ः रात्री 15-20 काळ्या मनुका चांगल्या धुवून थोड्याशा पाण्यात भिजत ठेवाव्या. सकाळी त्या चांगल्या कुस्करून पाण्यासकट खाव्या. धण्याच्या फाण्टाबरोबर या खाऊ शकता.
काळ्या मनुका म्हणजे काळी द्राक्षे सुकवून बनवलेला सुकामेवा.
- द्राक्षे ही फळांमध्ये श्रेष्ठ मानलेली आहेत. काळ्या मनुका या रक्तवर्धक असतात. वाढलेल्या उष्णतेने येणारा थकवा दूर करायला मदत करतात.
- खूप तहान लागत असेल तर ती कमी होते.
- उष्णतेने शरीरातील कोरडेपणा वाढतो व त्यामुळे मलावरोध होऊ शकतो. अशावेळी या काळ्या मनुका मृदुरेचक म्हणून उपयुक्त ठरतात. शरीरातील उष्णता, कोरडेपणा, पित्त बाहेर काढण्यासाठी यांचा उपयोग होतो.
- मनुका सौम्य गुणाची आहे, ॲन्टीऑक्सिडन्ट आहे म्हणून शरीरातील टॉक्सिन हळुवारपणे बाहूर काढण्यास या उपयोगी ठरतात.
- सब्जा ः सब्जा म्हणजे वनतुळशीच्या बिया. या गुणाने शीत असतात. या दुधात किंवा पाण्यामधून घेतल्या जातात. शरीरातील वात-पित्तदोष कमी करण्यास मदत करतात. कफदोषाचा सौम्यपणा स्थापित करतात. उष्णता झाली की तोंड येणे, जळजळ होणे, लघवीला त्रास होणे, बारीक ताप येणे, अंगावर पित्त उठणे अशा सगळ्या तक्रारींवर सब्जाचा खूप फायदा होतो.
1 चमचा सब्ज्याच्या बिया दुधात किंवा सरबतात भिजत ठेवाव्या. साधारण या 1 तास तरी भिजत ठेवाव्या. भिजल्यानंतर त्या फुगतात व साधारण जेलसारख्या बनतात. या बिया दुधातून किंवा सरबतातून साधारण तीन-चार वाजता, जेव्हा उष्णता तीव्र वाटते तेव्हा खाव्यात.
- सब्जाच्या पिश्चिल गुणामुळे शरीराची झिज भरून येण्यास मदत होते. सांधे-स्नायू यांना वंगण मिळते.
- ज्यांना उन्हाळ्यामध्ये म्हणा किंवा इतर वेळीही पित्ताचा त्रास होतो त्यांच्यासाठी सब्जा खूपच फायदेशीर आहे.
- आवळा चूर्ण ः उष्णता वाढली म्हणजे एजिंग प्रोसेस सुरू होते म्हणजेच वार्धक्य लवकर येऊ लागते. म्हणूनच पित्तप्रकृती असणाऱ्यांमध्ये केस लवकर पिकतात, चेहऱ्यावर सुरकुत्या लवकर दिसतात, वांग येणे यांसारख्या समस्या निर्माण होतात. अशावेळी गुणाने थंड व रसायन औषधे आयुर्वेदशास्त्रात सांगितली आहेत आणि यात आवळा हे अग्रद्रव्य आहे.
- शरीरातील तिन्ही दोषांना संतुलित ठेवणारे असे हे द्रव्य आहे. जीवनसत्त्व ‘सी’ प्रचुर मात्रेमध्ये असणारे असे हे रसायन आहे. सप्तधातू म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा व शुक्र या सातही धाजूंना पोषण देणारे द्रव्य आहे.
- त्वचेचे विकार, केसाचे विकार, उष्णता, डोळ्यांचे विकार, पित्त कमी करण्यासाठी आवळा सर्वोत्तम आहे.
- उन्हाळ्यामध्ये 1 चमचा आवळ्याचे चूर्ण पाण्याबरोबर रोज सेवन करावे. याने शरीरातील उष्णता खूप लवकर कमी होते व आवळ्याचे इतर फायदेही मिळतात. जसे की, आवळा हा उत्तम रसायन आहे, मुदू रेचकही आहे. त्यामुळे पित्ताचे रेचन करून झिज भरून आणण्यास आवळा सर्वोत्तम आहे.
- कोकम ः आपल्या शरीरात सर्रास वापरले जाणारे हे औषधीय व आहारीय द्रव्य. यालाच आमसूल म्हणतात व फळाला रातांबा. कोकम सरबत किंवा सोलकढी ही पित्तशामक आहे. कोकम हे दीपन, पाचन व रूचिवर्धन (तोंडाला चव आणणारे) आहे. काहीजणांचे चिंच, दही, लिंबूसारख्या आंबट पदार्थांच्या सेवनाने पित्त वाढते. कोकम मात्र याला अपवाद आहे. कोकम हे शीत आहे. तोंडाला चव आणणारे असते. याने उष्णता व पित्त कमी होते.
- इतर शीतपेये पिण्यापेक्षा कोकम सरबत हा एक उत्तम पर्याय आहे. रेडिमेड कोकमसिरपमध्ये भरपूर प्रमाणात साखर असते. त्यामुळे कोकम सरबत बनवताना आगळ किंवा सुकलेल्या आमसुलांचा वापर करता येतो.
सुकलेली आमसुले (3 ते 4) एका ग्लासात पाण्यामध्ये भिजत ठेवावी. तासाभराने ही आमसुले पाण्यात कुस्करून घ्यावीत. यात किंचित साखर घालून, किंचित सैंधव मीठ घालून हे पाणी गाळून प्यावे. हे पाणी उत्तम दाहनाशक व पित्तनाशक आहे.
बाहेर फिरायला जाताना बाहेरची सरबते, शीतपेये विकत घेण्यापेक्षा हे कोकमचे सरबत किंवा पाणी बनवून न्यावे व थोडे थोडे पित राहावे म्हणजे उन्हामुळे होणारा त्रास कमी होतो.
अशा या पाच उपायांनी उन्हाळ्यातील वाढणारी उष्णता मुळापासून कमी करता येते.
त्याचबरोबर अजून काही काळजी आपण घेऊ शकतो. पित्तप्रकृती असणाऱ्यांनी- ज्यांना उष्णतेचा त्रास होतो त्यांनी- आंघोळीसाठी गरम पाणी वापरू नये. जागरण करू नये. दिवसा काम नसताना उगाच उन्हात फिरू नये. जाणे अपरिहार्य ठरल्यास डोक्यावर टोपी, छत्री असावी.
- आहारांमधील चहा, कॉफी, तेल, मिरची, गरम मसाला, लसूण, मांसाहार, दारू, तंबाखूजन्य हे सगळे उष्णता वाढवणारे पदार्थ आहेत. त्यामुळे यांचा वापर करू नये.
- धान्यांमध्ये बाजरी उष्ण असल्याने गहू, तांदूळ, ज्वारी यांचा वापर करावा.
- कडधान्यांमध्ये मुगाचा वापर करावा.
- भाज्यांमध्ये भोपळा, राजगिरा, तांदूळवजा, कोहळा, काकडी, कारली, दोडका, ओला नारळ यांचा वापर करावा. याने उष्णता नियंत्रणात राहण्यास मदत होते.
- फळांमध्ये अंजीर, डाळिंब, द्राक्षे, केळी, आवळा ही फळे उष्णता कमी करतात. आंबा, पपई किंचित उष्णता वाढवतात. आंबा खाताना तो 1 तास थंड पाण्यात भिजत ठेवून मग खावा किंवा आमरस तुपासोबत खावा.
- काजू, पिस्ता, अक्रोड हा सुकामेवा उष्ण आहे. पचायला जड व पित्तकर असतात, त्यामुळे सेवन करू नयेत. त्याऐवजी मनुका, जर्दाळू, अंजीर ही पचायला हलकी व उष्णता कमी करणारी आहेत.
- हाताला थंड लागणारी आईस्क्रीम, कोल्ड्रिंग्स ही गुणाने उष्ण आहेत. त्यांना चांगला पर्याय म्हणजे कोकम सरबत, शहाळ्याचे पाणी, उसाचा रस किंवा कैरीचे पन्हे.
- माठातील पाणी हे थंड पाण्याला उत्तम पर्याय आहे. त्यामध्ये वाळ्याची पुरचुंडी टाकली तर हे पाणी उत्तम पित्तनाशक, दाह कमी करणारे व तहान भागवणारे ठरते. वाळ्याचा शीतल गुण शरीर व मनाला प्रसन्न ठेवतो.
- देशी गुलाब व खडीसाखर वापरून तयार केलेला गुलकंद खावा.
- त्याचप्रमाणे मोरावळाही उष्णतेमध्ये एक चांगला पर्याय आहे.
अशाप्रकारे वरील पाच पदार्थांचे सेवन करून व थोडासा आहार-विहारामध्ये बदल करून आपण उष्णतेशी दोन हात करू शकतो.