काल शुक्रवारी सकाळी वाठादेव सर्वण येथे भाड्याच्या खोलीत एका बिगर गोमंतकीय महिलेचा खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. पोलीस तपासामध्ये सदर महिला, तिचा नवरा आणि ४ वर्षांच्या मुलीसह या भाड्याच्या खोलीत महिन्याभरापासून राहात होती. काल शुक्रवारी सकाळी तिचा नवरा आपल्या मुलीला घेऊन बाहेर जात असताना शेजीरच्या महिलेने पाहिले व त्याबाबत विचारले असता आपण मुलीला घेऊन फिरायला जातोय असे त्याने सांगितले.
त्यानंतर शेजारील लहान मुलाने खोलीच्या दाराच्या फटीतून आत डोकावून पाहिल्यानंतर सदर महिलेचा खून झाल्याचे उघड झाले. पोलिसांना घटनास्थळी एक तुटलेला मोबाईल सापडला. सध्या पती बलराम यादव हा त्याच्या ४ वर्षांच्या मुलीसह फरार आहे. त्यामुळे पोलीस त्या अनुषंगाने तपासात गुंतलेले आहेत. अजून शवविच्छेदनाचा अहवाल आलेला नाही. या प्रकरणी पोलीस बलरामाचा शोध घेत आहेत.