वाटा भवितव्याच्या…

0
116

– प्रा. रामदास केळकर 

नितीन सुशिक्षित घरातील मुलगा. आई उच्च माध्यमिकमध्ये शिक्षिका, वडील सरकारी नोकरीत. विज्ञानात बरेच पर्याय उपलब्ध असल्याने नितीनने विज्ञान शाखा निवडावी असे आईचे म्हणणे, नवर्‍यानेही तसाच आग्रह धरलेला. अखेरीला नितीनची स्वारी विज्ञान शाखेत दाखल झाली. वर्ष संपेपर्यंत नितीनच्या अभ्यासातील तक्रारी वाढत राहिल्या. परिणामी शाखा बदलण्याचा निर्णय घ्यावा लागला. अशी अनेक उदाहरणे देता येतील. यातून ज्या विद्यार्थ्याला ज्या शाखेची आवड आहे तोच पर्याय अंतिम मानावा हा जगद्विख्यात नियम न पाळल्यास नितीनप्रमाणे सर्वांचे करियर भरकटत जाईल. आपल्या पाल्याच्या बाबतीत हे होऊ नये यासाठी हा लेख उपयोगी पडेल अशी अपेक्षा.

सर्वसाधारणपणे दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढच्या शाखेचा पर्याय शोधण्यासाठी बहुतेक पालक धडपड करीत असतात. खरे तर आपल्या पाल्याच्या करियरची बांधाबांध, पूर्वतयारी शालेय काळातच ठरविणे योग्य असते. १३ ते १८ या वयोगटात पाल्याच्या आवडी-निवडी निर्माण होत असतात. ही आवड-निवड शोधण्यासाठी आपण त्यांना जरूर मदत करायला हवी. पण आवड लादण्याचा गुन्हा मात्र कधी करू नये. त्यासाठी उपलब्ध पर्यायांची माहिती आपण त्यांना सांगू शकतो. त्याच्या आवडीच्या कोर्सला नाव टाकायला मदत करू शकतो. एकूण आपल्याला नियोजनबद्ध निर्णय घेता येतात. पण या सर्वांत प्राधान्य द्यायचे असते मुलाच्या आवडीला. आपल्याकडे काही पारंपरिक मानसिकता जोपासलेली असते, ज्याचा अनिष्ट परिणाम मुलाच्या/मुलीच्या चुकीच्या निवडीत होतो. एक म्हणजे करियरचा संबंध नेहमी नोकरीकडे लावला जातो आणि नोकरी न मिळाल्यास त्याचे करियर बिनउपयोगाचे मानले जाते. आता सुदैवाने सरकारतर्फे प्रत्येक शाळेत, उच्च माध्यमिक शाळेत समुपदेशक नेमले गेले आहेत. त्यांच्या मदतीने आपण या आवडी- निवडीचा गुंता सोडवू शकतो. इंजिनिअरिंग, मेडिकल, आयटी या संकल्पना वाचायला, ऐकायला आकर्षक वाटतात. त्यांना सामाजिक सन्मानाचे वलयही आहे. हे खरे असले तरी एखाद्या सिव्हिल इंजिनिअरला डांबरी रस्ते, इमारतीचे बांधकाम, मजूर-साहित्य आदीत रस नसेल तर…? एखाद्या डॉक्टर होऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्याला रुग्णाबद्दल कणव, शांतपणे दुसर्‍यांना ऐकून घेण्याची सवय नसेल तर…? असे विध्यार्थी त्या-त्या करियरमध्ये यशस्वी कसे होतील? काल परवाच एम.एस.सी. झालेल्या एका युवकाने नोकरीत आवडत नसल्याने आत्महत्या केल्याची बातमी वाचली. इथे आवडीचे स्थान महत्त्वाचे ठरते. अर्थात नुसत्या बातमीवरून आपण निष्कर्ष काढू शकत नसलो तरी आपल्या आवडीनुसार गोष्टी घडल्या नाहीत तर निराशा येणे स्वाभाविक. तेव्हा आपण जो पर्याय आपल्या आवडीचा म्हणून निवडतो त्यातील खाच-खळग्यांचाही विचार आपण करायला हवा. एवढेच नव्हे तर पर्यायी करियरचाही विचार मनात ठेवायला हवा. बर्‍याच वर्षांपूर्वी एका प्रसिद्ध साहित्यिकाच्या मुलाने एम.बी.ए.चे शिक्षण घेतले, परंतु पुढे त्याला शहर सोडून आपल्या गावी वडिलोपार्जित इस्टेट बघण्यासाठी यावे लागले. त्याने हा बदल स्वीकारून पर्यटनाचा पर्याय स्वीकारला. परिचितांपैकी आणखी एका हुशार मुलीचा अनुभव- तिने नोकरी आपल्या कर्तबगारीने मिळविली खरी, परंतु त्या कार्यालयाच्या जाचक नियमामुळे त्या नोकरीला तिने रामराम ठोकला. खरे तर आपण ज्या जागेसाठी अर्ज करतो त्याची पूर्वीच जर माहिती घेतली असती तर तिच्यावर हा प्रसंग ओढवला नसता. शालेय काळात आपण अभ्यास करत असतो. तीच अभ्यासूवृत्ती आपल्या पुढच्या वाटचालीत आपण शाबूत ठेवली नाही तर आपल्याला असेच प्रसंग अनुभवावे लागतील.
पूर्वी घरातला एखादा कुठल्यातरी हुद्यावर किंवा कुठल्यातरी कार्यालयात नोकरीला असे, आणि सर्वजण त्याचेच उदाहरण देऊन ‘तू त्याच्यासारखा हो’ असा उपदेश करायचे. आपल्या नजरेने तो आयकॉन. त्यांचे हे उपदेश, सल्ले, आदेश मानून बहुतेकांचे करियर घडत (बिघडत) असे. आता अशी स्थिती राहिलेली नाही. आता ‘घेता किती घेशील दो करांने’ तद्वत ‘करशील किती करियर दो हातांनी’ अशी स्थिती प्रत्यक्षात आहे. तरीसुद्धा आपल्याकडून चुका होतात. आपण चुकीचा मार्ग निवडतो आणि नंतर डोक्यावर हात मारून बसतो. आजच्या माहितीच्या युगात शिकण्याच्या अनेक संधी आहेत. आरक्षणामुळे तुमची गोची होत असेल तर सरळ बॅग भरून तुम्ही परदेशातील शैक्षणिक संस्थेत नाव नोंदवू शकता. आर्थिक अडचणीमुळे अनेकांना यापूर्वी उच्च शिक्षण घेता येत नसे. आता बहुतेक बँकांनी आपली तिजोरी अक्षरशः खुली करून ठेवली आहे. त्यामुळे येणार्‍या काळात तुमच्या पाल्याच्या पुढच्या प्रवेशासाठी थोडासा गृहपाठ करण्याची तसदी घ्या, थोडीशी पायपीट करून माहिती जमवा आणि नंतरच योग्य तो निर्णय घ्या. आपल्या माहितीसाठी गोव्यात उपलब्ध असणारे मार्ग कोणते? याची माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहोत.
आपले पाल्य एसएससी परीक्षेत उत्तीर्ण होणार हे गृहीत धरून तो/ती पुढे कोणत्या शाखेकडे जाऊ शकते, त्याचा आलेख आपण पाहूया. आपल्या मुलाला/मुलीला किती गुण मिळाले आहेत यावर अनेक पालक पुढच्या शाखेचा विचार करताना दिसतात. सर्वसाधारणपणे कला, वाणिज्य, व्होकेशनल, विज्ञान, आयटीआय, पॉलिटेक्निक असे पर्याय गोव्यातील विध्यार्थी निवडू शकतात. दुर्दैवाने लष्करी ओळख देणारे एनसीसीसारखे विषय सोडल्यास लष्करात जाण्यास उपयुक्त ठरणार्‍या सैनिकी शाळा आपल्या गोव्यात नाही; अन्यथा तो एक चांगला पर्याय विद्यार्थ्यांना सुचविता आला असता. या पर्यायाशिवाय कौशल्य विकसित करणारे कोर्सेस आपण घेऊ शकतो. उदा. छायाचित्रणकला, पाककला, शिवणकला आदी कलांना भरपूर मागणी आहे आणि अशा कौशल्यामध्ये तुमची कला इतरांना अनुभवता येते. त्यामुळे असे कोर्सेस जाणकारांकडून शिकून घ्यायला हरकत नाही. ङ्गक्त सरकारी नोकरीत आपण हा कोर्स मान्यताप्राप्त संस्थेतून केला होता हे दाखविण्यासाठी पुरावा द्यावा लागतो. झाकीर हुसेनचा तबला ऐकताना असा दाखला विचारायचे धाडस कोण करेल काय? अनेकदा एखाद्या जाहिरातीला भुलून आपण त्या संस्थेत नाव नोंदवितो, पण नंतर या संस्था बेकायदेशीर असल्याचे लक्षात येते. खरेतर गोवा लहान असल्याने आपण थोडे जागरूक राहून अशा संस्थेत प्रवेश करण्यापूर्वी नीट चौकशी केली तर आपली ङ्गसवणूक रोखता येते. याचबरोबर परदेशात लोकप्रिय असलेला होम स्कूलिंग अर्थात घरच्या घरी शिक्षण हाही पर्याय गोव्यात काहींनी स्वीकारलेला आहे. तसेच ओपन स्कूलसारख्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात.
आपण जो काही पर्याय निवडाल त्याचे ङ्गायदे-तोटे या सर्व गोष्टींचा आलेख घेऊन जास्तीत जास्त ङ्गायदा देणारा पर्याय अर्थात आपल्या आवडीचा असेल तो निवडावा. आयटीआय तसेच व्होकेशनलसारख्या शाखेत प्रवेश घेताना आपल्या आवडीचा कोर्स ज्या उच्च माध्यमिक शाळेत उपलब्ध आहे ती शाळा निवडावी. ङ्गक्त आपल्या घरापासून जवळ आहे किंवा आपले मित्र, शेजारी ज्या शाळेत जातात तीच आपण निवडण्याची चूक आपल्या करियरला धोकादायक बनू शकते हे विसरू नका. काही कारणाने वरील पर्याय आपल्याला अडचणीचे असतील तर ओपन स्कूल हादेखील पर्याय आपण निवडू शकता. जो पर्याय आपण निवडू इच्छिता तो निवडण्यापूर्वी स्वतःला काही प्रश्‍न विचारले पाहिजेत. एक म्हणजे ज्या शाखेत आपण नाव देणार आहोत त्या शाखेची वैशिष्ट्ये काय? याची माहिती घ्या. उदा. कला शाखेत जे विषय आपण शालेय स्तरावर शिकत होता तेच विषय पुन्हा शिकायची संधी त्याला मिळणार. शिकवणी घ्यायची गरज त्याला लागणार नाही. खेळ तसेच इतर अतिरिक्त छंद जोपासण्यासाठी त्यात सहभागी होण्यास भरपूर वाव मिळेल. सर्वसाधारणपणे या शाखेत येणार्‍या विद्यार्थ्याला भाषा, साहित्य, शब्द यांची मनापासून आवड हवी, अशी अपेक्षा असते. कमी गुण असणार्‍यांनी कला शाखा निवडावी आणि जास्त गुण असणार्‍यांनी विज्ञानाकडे वळावे ही मानसिकता योग्य नव्हे. काही विद्यार्थी अशा चुकीच्या विचारांमुळे विज्ञान शाखा निवडतात व नंतर त्यांच्या लक्षात येते की आपण चुकीच्या शाखेची निवड केली आहे. यात त्यांचे एक वर्ष नाहक ङ्गुकट जाते.
आपल्याला जी शाखा निवडायची आहे त्यामध्ये कोणते विषय आपल्याला अभ्यासावे लागणार आहेत याची माहिती पालक- विध्यार्थ्यांनी अगोदरच घेणे आवश्यक आहे. खरेतर आता निकाल हाती येईपर्यंत (२० मेला शालान्त निकाल अपेक्षित आहेत) पुढच्या शाखेच्या विषयांची माहिती तुम्ही इतर त्या-त्या शाखेतील विद्यार्थ्यांकडून किंवा थेट जवळच्या उच्च माध्यमिक शाळेमधून घेऊ शकता. आपली आवड आणि जी शाखा आपण निवडणार ते विषय यांची सांगड झाल्यास त्याला पसंती देणे उचित ठरेल. कुठच्या शाखेला पुढे अधिक संधी आहे यावर निवड करायला हरकत नाही. परंतु संभाव्य संधी आणि तुम्हाला झेपणारा विषय हे गणित जुळले पाहिजे. डॉक्टरी व्यवसायाला कुठेही संधी असते, परंतु मेडिकलचा अभ्यास सर्वांनाच झेपेल असे नाही. कला शाखेप्रमाणे इतरही शाखांची वैशिष्ट्ये सांगता येतील, परंतु जागेअभावी सर्व सांगता येत नाही. पण आपण माझ्या संकेतस्थळावरून (ुुु.लरीशशीसेर.ळपषे) ही माहिती घेऊ शकता. अनेक विद्यार्थी एकदा प्रवेश घेतला की थेट वर्ग सुरू झाल्यानंतर पुस्तकांना हात लावतात. काहींकडे नोट्‌स दिलेले असतात त्यावर गुजराण करतात. तेही परीक्षा जवळ आल्यानंतर. आपण तसे करू नये, ज्या पुस्तकांची शिङ्गारस केलेली असते ती पुस्तके वाचनालयातून आणून किंवा माजी विध्यार्थ्यांकडून मागवून चाळून पाहावी. विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना तर नियमित अभ्यासासाठी कैकदा शिकवणी घ्याव्या तर लागतातच, शिवाय व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी प्रवेश परीक्षांची वेगळी तयारी करावी लागते. त्यासाठी खास वर्ग घ्यावे लागतात. कुठल्याही शाखेचा विद्यार्थी असो, आपण पुढे कुठला पर्याय स्वीकारणार याचा अंदाज मनात ठेवून अभ्यासाचे नियोजन विद्यार्थ्याने करायला हवे. अनेकांना अकरावी म्हणजे रिलॅक्स व्हायचे वर्ष असे वाटते, पण त्यामुळे या एका वर्षात तुम्ही जी तयारी करू शकता तो अमूल्य वेळ तुम्ही नाहक ङ्गुकट घालविता. करियरबद्दल बोलावे, लिहावे तेवढे थोडेच. नित्य वर्तमानपत्र, स्पर्धात्मक मासिके, रोजगार समाचार, इंटरनेटवरील विविध संकेतस्थळे यांसारखे साहित्य सतत वाचनात असेल तर आपल्या भवितव्याची वाट तुम्हाला निश्चितच गवसेल. तुमच्या प्रगतीला शुभेच्छा!

दहावीनंतर उपलब्ध पर्याय

कला, वाणिज्य, विज्ञान शाखेची निवड अथवा आय.टी.आय., व्होकेशनल, पॉलिटेक्निक आदी पर्याय उपलब्ध.

बारावीनंतर उपलब्ध पर्याय

कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतून पदवीधर अथवा ङ्गाइन आर्ट, संगीत, कायदा, आर्किटेक्चर, बी.बी.ए., बी.सी.ए., होम सायन्स, चार्टर्ड अकौंटन्ट, वैद्यकीय महाविद्यालयात – एम.बी.बी.एस. (ऍलोपॅथिक डॉक्टर), बी.ए.एम.एस.(आयुर्वेदिक डॉक्टर), डी.एच.एम.एस. (होमिओपॅथिक डॉक्टर), बीडीएस (बॅचलर ऑफ डेन्टिस्ट्री), बीपीएचटी (बॅ. ऑ. फिजिओथेरपी), बीओटी (बॅ. ऑ. ऑक्युपेशनल थेरपी), ऑर्थोसिस-प्रोस्थेसिस, मायक्रोबायॉलॉजी, फार्मसी, पॅथॉलॉजी (डीएमएलटी), नर्सिंग, वैद्यकीय व्यवस्थापन, इंजिनिअरिंग- आय.आय.टी., बी.ई., बी.आर्क. (आर्किटेक्चर), सी.ए. (कॉस्ट अकौंटन्ट), कंपनी सेक्रेटरी, ग्रंथपाल, जर्नालिझम, पर्यटन व्यवस्थापन, डी.एड्., हॉटेल कोर्स, संगणकीय कोर्सेस, अभिनय, शास्त्रीय संगीत, नृत्य कोर्सेस, बी.एस.डब्ल्यू. (सोशल वर्क), विविध भाषा (देशी-विदेशी) इत्यादी.