26.1 C
Panjim
Friday, June 25, 2021

वाङ्‌मयीन संस्कृतीच्या निस्सीम उपासक ः डॉ. विजया राजाध्यक्ष

  •  डॉ. सोमनाथ कोमरपंत

 

विजयाबाईंनी अनेक महत्त्वपूर्ण वाङ्‌मयीन प्रकल्प राबविले. एकोणसत्तर वर्षे व्रतस्थ वृत्तीने साहित्यसाधना करणे आणि वाङ्‌मयीन संस्कृतीला सातत्याने स्वतःला जोडून घेणे ही सोपी गोष्ट नव्हे. अंतर्निष्ठा आणि सत्त्वशील जीवनधारणा असते तेव्हाच अशी कार्ये सिद्ध होतात.

मराठी साहित्यविश्‍वात आपल्या पृथगात्म कर्तृत्वाने उठून दिसणार्‍या आणि अभिरुचिसंपन्न अशा जुन्या-नव्या दांपत्यांमध्ये राजाध्यक्ष दांपत्याची अग्रक्रमाने गणना करावी लागेल. अनिल-कुसुमावती, पु. य. देशपांडे- विमलाबाई देशपांडे, विश्राम बेडेकर- मालती बेडेकर, ह. वि. मोटे- कृष्णाबाई मोटे, प्रा. शंकर वैद्य- डॉ. सरोजिनी वैद्य, प्रा. वसंत आबाजी डहाके- डॉ. प्रभा गणोरकर आणि पु. ल. देशपांडे- सुनीताबाई देशपांडे यांच्या समृद्ध भावविश्‍वाचा संदर्भ या ठिकाणी आवर्जून लक्षात घ्यावा लागेल.
राजाध्यक्ष दांपत्याने मराठी साहित्याचा भव्य पट अनुभवला. ‘सत्यकथा’, ‘अभिरूची’ या वाङ्‌मयीन नियतकालिकांनी नव्या संवेदनशीलतेचा जो प्रवाह निर्माण केला तो त्यांनी आत्मसात केला. ‘छंद’, ‘वीणा’, ‘मौज’, ‘उत्तम’, ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’, ‘साहित्य’ आणि अन्य महत्त्वाच्या नियतकालिकांचा ऊर्जस्वल कालखंड त्यांनी पाहिला. त्यातून सातत्याने त्यांनी अव्वल दर्जाची साहित्यनिर्मिती केली. समीक्षात्मक आणि संशोधनात्मक लेखन केले.

आज येथे डॉ. विजयाबाई राजाध्यक्ष यांच्या प्रदीर्घ काळ केलेल्या वाङ्‌मयनिर्मितीकडे लक्ष केंद्रित करून संक्षेपाने लिहायचे आहे. १९५० मध्ये विजयाबाईंनी ‘कशाला आलास तू माझ्या जीवनात?’ ही कथा लिहून लेखनास प्रारंभ केला. त्यांच्या कथा ‘सत्यकथा’ मासिकात त्या काळात प्रसिद्ध होत होत्या. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव विजया आपटे. आजतागायत त्यांनी कसदार कथालेखन केले. चिकित्सक आणि आस्वादक समीक्षा लिहिली. संशोधनात्मक कार्य केले. विवेचक प्रस्तावनांसह महत्त्वपूर्ण संपादने केली. वाङ्‌मयीन कोशकार्यात त्या सहभागी झाल्या. अनेक महत्त्वपूर्ण वाङ्‌मयीन प्रकल्प राबविले. एकोणसत्तर वर्षे व्रतस्थ वृत्तीने साहित्यसाधना करणे आणि वाङ्‌मयीन संस्कृतीला सातत्याने स्वतःला जोडून घेणे ही सोपी गोष्ट नव्हे. अंतर्निष्ठा आणि सत्त्वशील जीवनधारणा असते तेव्हाच अशी कार्ये सिद्ध होतात.

आपल्या जीवनात वाङ्‌मयाला अनन्यसाधारण महत्त्व देणार्‍या डॉ. विजयाबाईंच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण कशी झाली असेल याविषयी आपल्या मनात कुतूहल जागे होते. ‘कदंब’ या ललितनिबंधसंग्रहात ‘दॅट इज अ बिगिनिंग’ आणि ‘माझे लेखन कशासाठी’ या लेखातून याचा प्रत्यय येतो. ‘पाठीवरचा हात’मधून राजारामपुरीतील ‘नंदादीप’मध्ये राहणार्‍या आणि नंदादीपाप्रमाणे तेवणार्‍या भाऊसाहेब खांडेकरांची संस्मरणे त्यांनी कृतज्ञतेने जागविली आहेत. ‘अनुबंध’मधील प्रा. श्री. शं. खानवेलकर (इशारा). आई (मायलेकी), प्रा. जी. ए. कुलकर्णी (औदुंबर मग्न बसला आहे…), प्रा. वा. ल. कुलकर्णी (आधारवड कोसळल्यानंतर…), रणजित देसाई (रणजित देसाई ः एक स्वगत), प्रा. अरविंद गोखले (एक ब्रह्मकमळ मिटले!), पंडित महादेवशास्त्री जोशी (संस्कृती नावाचा महावृक्ष), कुसुमाग्रज (कलशाध्याय), पु. ल. देशपांडे (पडद्यामागचे ‘पीएल’), प्रा. श्री. प. भागवत (लेखन श्री. पु.) ग. रा. कामत (ग. रा. कामत ः तीन रूपे), प्रा. के. ज. पुरोहित (के. ज. पुरोहित की शांताराम) यांच्यावरील लेख वाचावेत. त्यांच्या जोडीला ‘मंत्रपुष्प’ या लेखातील त्यांच्या आठवणींचा पट डोळ्यांसमोर पाहावा. ‘संवाद’मधील प्रा. वा. ल. कुलकर्णी आणि विंदा करंदीकर यांच्याशी हृयदसंवाद साधणार्‍या डॉ. विजयाबाईंच्या अभिरुचिसंपन्नतेचा, व्यासंगाचा आणि बहुश्रुततेचा शोध घ्यावा. ‘स्वच्छंद’, ‘अवतीभोवती’ आणि ‘तळ्यात-मळ्यात’ या ललितनिबंध संग्रहातील आत्मपरता शोधावी. विविध कलांशी नाते ठेवू पाहणार्‍या रसिकाग्रणी आणि संवेदनशील साहित्यिकाचे मन शोधावे आणि सहवासात आलेल्या प्रतिभावंतांच्या कर्तृत्वाच्या अज्ञात पैलूंचा धांडोळा घेण्याची वृत्ती पाहावी. त्यांनी आपल्या काव्यसमीक्षेतून कुुसुमाग्रज, अनिल, रा. श्री. जोग, ना. धों. महानोर, वसंत आबाजी डहाके इत्यादी कवींचा जुने कवी आणि नवे कवी असा भेद न करता मर्मदृष्टीने घेतलेला वेध न्याहाळावा. बहुपेडी विंदा करंदीकरांची त्यांनी केलेली मीमांसा, ‘आदिमाया’मधून विंदांच्या कवितेत मूलःस्रोत शोधण्याचा केलेला प्रयत्न आणि विंदांच्या समग्र लघुनिबंधांतून दिसून येणार्‍या त्यांच्या संपन्न व्यक्तिमत्त्वाचा शोध पाहावा. बा. सी. मर्ढेकरांच्या कवितेचा प्रबंधरूपाने डॉ. विजयाबाईंनी केलेले प्रचंड काम म्हणजे मराठी कवितेच्या एका महत्त्वपूर्ण पर्वाचा ध्यासपूर्वक केलेला अभ्यास आहे.

डॉ. विजयाबाई राजाध्यक्षांचे बालपण कोल्हापुरात गेले. बँच राजाराम हायस्कूलमधून त्या १९५० मध्ये एस.एस.सी. उत्तीर्ण झाल्या. राजाराम महाविद्यालयातून त्या बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. १९५६ मध्ये त्यांनी पुणे विद्यापीठाची एम.ए.ची. पदवी प्राप्त केली. लेखक आणि समीक्षक असलेल्या प्रा. मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यानंतर त्यांनी मुंबईला वास्तव्य केले. कोल्हापूरहून मुंबईला झालेले त्यांचे स्थलांतर त्यांच्या जीवनाला वेगळे किंवा व्यापक वळण देणारे ठरले. एल्फिन्स्टन महाविद्यालयात त्यांनी दीर्घकाळ मराठीचे अध्यापन केले. मराठीच्या नामवंत प्राध्यापिका म्हणून त्यांनी नावलौकिक प्राप्त केला. त्या विद्यार्थिप्रिय प्राध्यापिका म्हणून गणल्या गेल्या. १९८० मध्ये प्रा. वा. ल. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी बा. सी. मर्ढेकरांच्या कवितेवर प्रबंध लिहून मुंबई विद्यापीठाची पी.एचडी. पदवी मिळवली. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठात पदव्युत्तर मराठी विभाग प्रमुख या नात्याने त्यांनी काम पाहिले. अनेक चर्चासत्रे आणि वाङ्‌मयीन प्रकल्प त्यांनी तेथे राबविले. निवृृत्तीनंतर प्रोफेसर इमेरिट्‌स’ म्हणून त्यांची नियुक्ती झाली. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी पी.एचडी. आणि एम. फिल या पदव्यांसाठी समर्थपणे मार्गदर्शन केले.

अध्यापनक्षेत्रावर त्यांनी जशी आपली मुद्रा उमटविली तशाच वाङ्‌मयनिर्मितीच्या क्षेत्रात त्या निरंतर मग्न राहिल्या. कथाकार म्हणून त्यांचे स्वतंत्र स्थान आहे. व्यक्तिमनाचे विविध पापुद्रे त्यांनी सूक्ष्मतेने उलगडून दाखविले. त्यासाठी मनोविश्‍लेषणाचा आधार घेतला. पण ही कथा भावनातिरेकानं पिंजून काढली जात नाही. स्त्रीविश्‍वाचे नाजूक धागे उलगडणारी ही कथा आहे. स्त्रीजाणिवेतील दुःख-संवेदनेला येथे केंद्रवर्ती स्थान असते. वीसांहून अधिक कथासंग्रह त्यांनी प्रसिद्ध केले आहेत. आणि आता त्या कादंबरीलेखनाकडेही वळलेल्या आहेत. त्या कथासंभारातून मोजक्याच कथांचा उल्लेख करणे शक्य नसले तरी ‘अंतराळ’, ‘जन्म’, ‘कवच’, ‘शो-रूम’, ‘विदेही’, ‘कमळ’, ‘देह मृत्यूचे भातुके’ आणि ‘ऋतुचक्र’ या कथांचा येथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. या कथांतून स्त्रीची वेगवेगळी रूपं रेखाटली गेली आहेत. विजयाबाईंच्या कथेत एकाकीपणाची भावना आणि मृत्यूची जाणीव देणार्‍या काळाची, अंधाराची जाणीव असते. बाह्य संघर्षापेक्षा अंतर्मनात चालणार्‍या संघर्षाचे चित्र या कथांतून अधिक आढळते. हे मन अभिरुची असलेले आणि संस्कारित आहे. स्त्रीजाणिवेच्या परिघाबाहेर जाऊन पुरुषपात्रांचेही कथा चित्रण करते. या संदर्भात ‘गुणाकार’, ‘अंधाराचा अर्थ’, ‘ईश्‍वर मृतात्म्यास शांती देवो’, ‘सुरक्षित’, ‘वंशवृक्ष’, ‘क्षितिज’, ‘दिशा’ व ‘कमान’ या कथा वाचाव्यात. निराळ्या प्रकारच्या व्यक्तिरेखा आणि निराळ्या पातळ्यांवरील त्यांचे चित्रण येथे आढळते.

‘कदंब’मध्ये उद्धृत केलेल्या ‘झाडापलीकडे लुकलुकणार्‍या दिव्याइतके…’ या कवितेपलीकडे डॉ. विजयाबाई काव्यलेखनाकडे फारशा वळल्या नाहीत. त्यांच्या कथांमध्ये काव्यात्म चिंतन आढळते. कविता हा वाङ्‌मयप्रकार त्यांना अत्यंत आवडतो. म्हणूनच त्या काव्यसमीक्षेकडे वळलेल्या आहेत. ‘कवितारती’, ‘जिव्हार स्वानंदाचे’, ‘वेध कवितेचा’ आणि ‘कवितेपासून कवितेकडेे’ या पुस्तकांत काव्यसमीक्षा आहे. तो त्यांचा मर्मबंध आहे हे सहज लक्षात येते.

अनिल, कुसुमाग्रजांइतकाच केशवकुमार (प्र. के. अत्रे), बी. रघुनाथ, मंगेश पाडगावकर, रमेश तेंडुलकर, उषा मेहता, मलिका अमरशेख, ज्ञानेश्‍वर मुळे, दासू वैद्य, प्रज्ञा लोखंडे-पवार या कवी-कवयित्रींविषयीचा डॉ. विजयाबाईंनी सविस्तर आणि ममत्वाने परामर्श घेतला. महानोर आणि डहाके यांच्या नंतरच्या काव्यप्रवासाविषयी त्यांना आत्मीयतेने लिहावेसे वाटले. त्यानंतरच्या पिढीतील अनेक महत्त्वाच्या कवींच्या कवितेचे समालोचन त्यांना करावेसे वाटले. त्यांच्या काव्यसमीक्षेमधून मराठी कवितेचे विस्तीर्ण क्षितिज त्याच्या गुणवैशिष्ट्यांस दृग्गोचर होते. दोषदिग्दर्शनापेक्षा सामर्थ्यचिन्हे आणि सौंदर्यस्थळे रसज्ञतेने टिपण्यात त्या मग्न आहेत असे सहज लक्षात येते.

माझ्या भावजीवनात प्रा. मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष आणि डॉ. विजयाबाई राजाध्यक्ष यांना आगळेवेगळे स्थान आहे. त्या आठवणी स्मृतिपटलावरून पुसल्या जात नाहीत. ‘गोमंत विद्या निकेतन’ने १९८३ मध्ये दिवाळीच्या सुटीत कथाशिबीर आयोजित केले होते. या दांपत्याचे मार्गदर्शन त्यावेळी लाभले. अभ्यासाच्या निमित्ताने मी उपस्थित होतो… मी कुठेच नव्हतो… डॉ. प्रल्हाद वडेरसरांचा विद्यार्थी हीच माझी कमाई होती… डॉ. विजयाबाईंसह ते राजाराम कॉलेजमध्ये सहाध्यायी होते- त्यांनी मला ‘मराठी नवकथेची वाटचाल’ या विषयावर एका सत्रात बोलण्याची संधी दिली… प्रोत्साहनाचा हात पुढील आयुष्याला अभ्यासाची दिशा कसा देऊ शकतो याचा ऊबदार अनुभव मला त्या दोघांच्या बाबतीत आला… या भेटीत प्रा. राजाध्यक्षसरांनी मला ममत्वाने त्यांचे ‘खर्डेघाशी’ हे पुस्तक दिले अन् डॉ. विजयाबाईंनी त्यांचे ‘कदंब’ हे आत्मपर लेखांचे पुस्तक दिले. आजही अनेक कारणांमुळे वांद्य्राच्या साहित्यसहवासमध्ये मी जात असतो. सुलेखनकार अच्युत पालव त्यांना ‘अक्षराई’ का संबोधतात याचा आल्हाददायी प्रत्यय दरवेळेला येतो. त्यांच्या पाठीवरच्या हातामुळे ‘अभंग; साहित्य सहवास’ हे माझे विसाव्याचे ठिकाण झाले आहे.

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

सुस्तावाल तर पस्तावाल!

कोरोनाची अत्यंत प्राणघातक ठरलेली दुसरी लाट हळूहळू ओसरत असल्याचे आशादायक चित्र एकीकडे दिसत असतानाच दुसरीकडे कोरोना विषाणूचे ‘डेल्टा प्लस’ हे नवे व...

आता कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’चा धोका

>> केंद्र सरकारचा महाराष्ट्रासह केरळ, मध्यप्रदेशला इशारा >> देशभरातील २८ पैकी महाराष्ट्रात २१ रुग्ण कोरोनाच्या दुसर्‍या...

लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश द्यावा : लोबो

गोव्यात एकदा संचारबंदी हटवल्यानंतर राज्यात पर्यटन उद्योग सुरू होणार आहे. अशावेळी कोविड लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना तसेच कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्यांना राज्यात...

सीबीएसई, आयसीएसईच्या १०वी/१२ वीच्या परीक्षा रद्दच

>> सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय...

राज्यात कोरोना बळींची संख्या तीन हजारांपार

>> चोवीस तासांत ११ मृत्यू, ३०३ नवे बाधित राज्यात कोरोना विषाणमुळे काल मंगळवारी ११ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात...

ALSO IN THIS SECTION

हिमालयाच्या सर्वोच्च शिखराचे मापन कुणी केले?

दत्ता भि. नाईक ‘हिमालयन माऊंटेनियरिंग इन्स्टिट्यूट’ ही साधीसुधी संस्था नाही. तिच्याच अध्यक्षांनी हा विषय काढल्यामुळे तो आता चर्चेचा...

ख्याल गायकीचे अनभिषिक्त सम्राट पं. राजन मिश्रा

गो. रा. ढवळीकर बुलंद आवाजाने व भावपूर्ण गायकीने जगभर मैफिली गाजवणारे पं. राजन मिश्रा एवढ्या लवकर जातील असे वाटले...

कर्जदार मृत्यू पावल्यास वसुलीचे काय?

शशांक मो. गुळगुळे सध्या कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. बर्‍याच चालत्या-बोलत्या व्यक्ती अचानक जाण्याचे अनुभव येत आहेत. अशा...

सख्य

गिरिजा मुरगोडी फ्रेण्डशीप-डे हा सर्व सर्व स्तरांवरचा मैत्री दिवस, तर हा खास सख्य उजागर करणारा मैत्र दिन. संकल्पना...

परीक्षांचं करायचं काय?

दिलीप वसंत बेतकेकर खरं तर शिकणं म्हणजे काय तर जाणून घेणं; व जाणून घेण्याची क्रिया ही जन्मापासून मृत्यूपर्यंत...