निष्ठा आणि सत्ता यांच्यात निवड करायची वेळ येते, तेव्हा भले भले निष्ठेवर पाणी सोडून सत्तेकडे धाव घेतात हे भारतीय राजकारणात अगणित वेळा दिसून आले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा हाच खेळ सध्या रंगला आहे. हे ‘ऑपरेशन टायगर’ उद्धव यांच्या शिवसेनेच्या खासदारांच्या संदर्भात आहे. मागील लोकसभा निवडणुकीत ‘चारसौ पार’ची अतिमहत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारला अपेक्षेनुरूप जागा मिळू शकल्या नाहीत आणि भाजपला स्पष्ट बहुमतही मिळाले नाही. त्यामुळे तेलगू देसम आणि जेडीयूच्या कुबड्या घेऊन सरकार बनवावे लागले. ह्या परिस्थितीवर मात करण्यासाठी इतर पक्षांच्या खासदारांमध्ये फूट पाडून आपला पाठिंबा वाढवण्याचा प्रयत्न भाजपकडून चालला आहे. ह्याचाच परिणाम म्हणून पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडली आणि वीस खासदारांच्या एका गटाने वेगळा गट स्थापन करून भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा जाहीर केला. आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या खासदारांनीही बंडखोरी करून वेगळा गट स्थापन करण्याच्या हालचाली चालवल्या आहेत. उद्धवसेनेचे एकूण नऊ खासदार आहेत, त्यामुळे पक्षांतर बंदी कायद्यातून सुटका करून घेण्यासाठी किमान दोन तृतीयांशचे म्हणजे सहा खासदारांचे बळ ह्या गटाला लागेल. काल उद्धव यांनी बोलावलेल्या बैठकीस गैरहजर राहून ह्या बंडखोरांनी आपल्या पुढील पावलाची चाहुल दिली आहे. ह्या बंडाची कुणकुण लागताच उद्धव यांनी यापूर्वी जी बैठक बोलावली, तिला पाच खासदार अनुपस्थित होते, तर एकजण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. बंडखोर म्हणून परभणीचे खासदार संजय हरीभाऊ जाधव, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाक्चौरे, नागेश पाटील अष्टीकर आणि संजय दीना पाटील यांची नावे घेतली जात आहेत. मात्र, ह्यापैकी ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील आमच्यासोबत आहेत असे ठाकरे गटाने जाहीर केले होते, तर वाक्चौरे यांनी आपण उद्धव यांच्यासोबत असल्याचे जाहीर वक्तव्य केले होते. नाशिकचे राजाभाऊवाजे हे दिल्लीत झालेल्या संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेस हजर होते आणि त्यांनी व त्यांच्या वडिलांनी उद्धव यांच्याप्रती निष्ठा व्यक्त केली आहे. त्यामुळे बंडखोरांच्या दोन तृतीयांशसाठी आवश्यक संख्याबळाबाबत अनिश्चितता आहे आणि जोवर हे संख्याबळ प्राप्त होत नाही, तोवर त्यांना थोपवून धरण्यात आले आहे. बाळासाहेब ठाकरे असताना छगन भुजबळ यांनी शिवसेनेतील पहिली मोठी फूट पाडली. त्यानंतर नारायण राणे, राज ठाकरे यांनी सेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला. मात्र, चार वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला खरा मोठा दणका दिला. पक्षाच्या पंचावन्न आमदारांपैकी चाळीस आमदार तेव्हा फुटले. पक्षनेतृत्वाच्या कार्यपद्धतीबाबत तेव्हा गंभीर प्रश्न उपस्थित झाले. आता पुन्हा एकदा त्याच कारणाने ही फूट पडत असल्याचे दिसते आहे. ह्या बंडखोरांना सत्तेची आणि संपत्तीची आमिषे दाखवली गेल्याने ते फुटत आहेत असे कितीही म्हटले तरी शेवटी पक्षनेतृत्वाची कार्यपद्धती देखील कुठेतरी त्याला नक्कीच जबाबदार असेल. सेनेचे मुंबईबाहेरचे नेते विरोधकांच्या गळाला सहज लागतात असे दिसते. एकनाथ शिंदे यांनी तडाखा दिल्यानंतरही उद्धव हे आपल्याभोवतीचे कोंडाळे दूर करू शकलेले नाहीत, त्याची हे दुसरे बंड ही परिणती आहे. बंड केलेत तर राडा होईल वगैरे भाषा संजय राऊत बोलत असले, तरी एकनाथ शिंदेंनी उभी फूट पाडली तेव्हाही हीच भाषा त्यांनी केली होती, परंतु त्या बंडखोरांचा केसही कोणी वाकडा करू शकले नव्हते, त्यामुळे ह्या राड्याच्या भाषेने जाणाऱ्यांना थोपवता येणार नाही. शिवसेनेचा तो दरारा केव्हाच इतिहासजमा झाला आहे. उद्धव यांनी आता आत्मपरीक्षण करण्याची जरूरी आहे. आमदार, खासदार साथ सोडून जात आहेत. निदान पक्षकार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना तरी सांभाळण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. कार्यकर्ते सोबत असतील, तर त्यातून नवे नेते घडवणे आणि पुढील निवडणुकांत गद्दारांना धडा शिकवून पुन्हा यश मिळवणे कठीण नसते. परंतु नेत्यांबरोबरच कार्यकर्तेही जाणार असतील, तर त्याचा अर्थ पक्षाची कार्यपद्धती ढासळली आहे आणि पक्षनेतृत्वाचा पक्षावर अंकुश राहिलेला नाही असा होतो. मुंबईतील जवळची मोजकी मंडळी सोडता त्यापलीकडेही ह्या पक्षसंघटनेचे अस्तित्व टिकायला हवे ह्यासाठी त्यांनी कसोशीने प्रयत्न करणे जरूरी आहे. सत्ता हाती नसते तेव्हा संकटे चहुबाजूंनी येत असतात. परंतु त्यातून तारून जायचे असेल तर राखेतून नवे विश्व निर्माण करण्याची जिद्द आणि निष्ठा कार्यकर्त्यांत निर्माण करावी लागेल.

