>> मणिपूरने टाकले ९४ तर नागालँडने ४२
नागालँड व मणिपूरच्या मुलींच्या अंडर १९ संघात जिलगोरा (धनबाद) येथील नेहरू स्टेडियमवर बुधवारी झालेल्या सामन्यात तब्बल १३६ ‘वाईड’ चेंडूंची बरसात झाली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयोजित केलेल्या ईशान्य भारत-बिहार अंडर १९ क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात मणिपूरने ९४ तर नागालँडने ४२ वाईड चेंडू टाकले. नागालँडने हा सामना ११७ धावांनी जिंकून आपल्या खात्यात ४ गुण जमा केले.
नागालँडने प्रथम फलंदाजी करताना ३८ षटकांत सर्वबाद २१५ धावा केल्या. त्यांच्या मुष्कान (५४) व पोरी (२४) यांनाच दुहेरी धावसंख्या करता आली. प्रत्युत्तरादाखल खेळताना मणिपूरचा डाव २७.३ षटकात ९८ धावांत आटोपला. मणिपूरकडून सेतेरनी (१७ः व रोनिबाला थोकचोम (२४) यांना दहा धावांचा आकडा ओलांडता आला. नागालँडच्या पोरीने १६ धावांत ५ गडी बाद केले.
ईशान्य भारतातील राज्यांत क्रिकेटचा विकास व प्रसार करण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून यासारख्या स्पर्धांचा लाभ होणार असल्याचे मेघालय क्रिकेटचे सर्वेसर्वा नबा भट्टाचार्य यांनी सांगितले आहे. अनुभवानंतर ईशान्येतील राज्ये क्रिकेटशी जुळवून घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकार्यांनी मात्र उभय संघाच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राष्ट्रीय दर्जाची अंडर १९ क्रिकेट स्पर्धा खेळताना क्रिकेटच्या प्राथमिक ज्ञानापेक्षा अधिक चांगल्या कामगिरी गरजेची आहे, असेही या अधिकार्याने सांगितले.

