Home बातम्या वसुंधरा चित्रपट महोत्सव – पृथ्वीचे प्रेमगीत!

वसुंधरा चित्रपट महोत्सव – पृथ्वीचे प्रेमगीत!

0

– ऍड. सतीश सोनक

नुकत्याच गोव्यात झालेल्या ‘वसुंधरा चित्रपट महोत्सवा’त उपस्थितांना गाजलेले पारितोषिकप्राप्त लघुचित्रपट, माहितीपट पाहण्याची संधी लाभली आणि रसिकांनी, पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी, शालेय विद्यार्थ्यांनी तिचा भरपूर लाभ घेतला. या मेजवानीत पर्यावरण, वन्यजीवन, प्रकाश, हवा आणि पाणी या विषयांशी निगडीत चित्रपट-माहितीपट आयोजकांनी त्यांच्यासमोर ठेवले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मात्र या पक्वानांची चव फार अल्प प्रमाणात घेतली. ही अलिप्तता अनाकलनीय आहे.

या वर्षीच्या वाईल्ड स्क्रीन महोत्सवामधील उत्कृष्ट छायाचित्रणाचा पुरस्कार विजेता लघुपट ‘बर्डस’, निसर्गाच्या सान्निध्यात जबाबदारीने कसे वागायचे हा संदेश प्राणी कसा देतात हे दर्शविणारा ‘नेचर्स डिमांड’, जर आपण जंगल आणि त्यातील झाडे वाचवली तर नैसर्गिक आपत्तीपासून ती आपले संरक्षण करतील असा संदेश देणारा ऍनिमेशनपर ‘वुडी टेल’, एक मुंगी आणि छोटी अळी यांच्या नात्यावर बेतलेला ‘माय होम इज ग्रीन’, टांझानिया ते केनया हे प्राण्यांचे देशांतर चित्रित करणारी अनेक पुरस्कार विजेती चित्रफीत ‘सरेंगेटी’ इत्यादी चित्रपट म्हणजे मनोरंजन, प्रबोधनासोबत पर्यावरण रक्षणाचे ऊर्जास्रोत होते.

‘रेन वॉटर’मध्ये पावसाच्या पाण्याचा पुनर्भरण प्रश्‍न हाताळला होता. पावसाच्या पाण्यावर कोणा एकाची मालकी नाही. ते कसे साठवावे आणि वाटून घ्यावे यासंबंधी हा माहितीपट आहे. ‘दी लाईफ ऑफ वॉटर’मध्ये पृथ्वीवरील गोड्या पाण्याचे जीवनचक्र उलगडले आहे. ‘वॉटर वर्क्स इंडिया’ आजच्या आधुनिक तांत्रिक युगात सर्वसामान्य भारतीय माणसांनी पाणी व्यवस्थापनाचे पारंपरिक तंत्र काळास सुसंगत रीतीने जीवंत ठेवल्याचे दाखवतो. ‘लाइफ ड्रॉप्स’ यात पाण्याच्या प्रत्येक थेंबात जीवन आहे, म्हणून तो वाया घालवू नका, वापरा आणि जगा हा संदेश होता. ‘दी फायनल टाइड’ भारताच्या ७५०० कि.मी. लांबीच्या किनारपट्टीवर राहणार्‍या लाखो लोकांनी वाढत्या समुद्रपातळीशी कसे जुळवून घ्यावे हे सांगतो.

‘शिवालीक मान्सून’ने पॅरडाइज फ्लायकेचर पक्ष्याच्या जीवनाचे दर्शन घडवले व भूगोलाच्या पुस्तकात हरवलेल्या प्रदेशांना सजीव केले. प्रत्येक शिक्षकाने अशा प्रकारचे चित्रपट विद्यार्थ्यांना दाखवावे. पण त्यासाठी त्यांनी ‘इट्‌स यू’ बघायला हवा होता. यात शिक्षक मुलांच्या विचारप्रणालीला दिशा देतात. ‘दी जंगल गँग’ ही भारतातल्या मुलांसाठी बनविली गेलेली वन्यजीवनविषयक मालिका. गुहांविषयी असलेला ‘प्लॅनेट अर्थ’ हा सत्य किती अद्भुत असतं हे दाखवणारा माहितीपट ज्या शिक्षकांनी पाहिला त्यांचे विद्यार्थी नशीबवान ठरतील.

गोवाविषयक पर्यावरणीय जाणिवा चेतवणार्‍या लघुपटांचा या महोत्सवात खास विभाग होता. ‘गोवा गोवा गॉन’ ही कुरेश कॅन्टीनवाला यांची २५ मिनिटांची माहितीफीत गोव्यामध्ये खाण व्यवसायाने लावलेली विल्हेवाट दाखवीत धोक्याचा इशारा देते. गोव्यातील वास्तव किती भयानक झाले आहे याचा आरसा म्हणजे हा माहितीपट. त्याचा कालखंड पाचसहा वर्षांपूर्वीचा असला तरी त्यातील शोकांतिका जशी होती तशीच आजही आहे. बेकायदेशीर खाणींना विरोध करणार्‍या आंदोलकांवर पोलीस निर्यद लाठीमार करतात, पण गुन्हेगार खनिज व्यावसायिकांना हात लावत नाहीत हे गोव्याचे दाहक वास्तव त्यांनी समोर ठेवले. एका पोर्तुगीज माहितीपटात हीच खंत अनुभवायला मिळाली. जे दुर्दैव त्या माहितीपटात दाखविले जाते ते शंभर नाही तर एकशे एक टक्के खरे आहे. पोर्तुगालमधील लोक बघतील तेव्हा आपली मान लाजेने खाली जाईल इतकी स्वतंत्र गोव्यात पर्यावरणाची वाट लागली आहे. पण मी त्याला स्वातंत्र्याची विषारी फळे मानीत नाही. आपण अजूनही पर्यावरणशत्रूंनी जखडलेल्या पारतंत्र्यात आहोत हेच खरे.

महोत्सवात योगेश कापडी या गुणी दिग्दर्शकाचा ‘जागो गोवा’ होता. गोव्याच्या पर्यावरणीय जागृतीचे स्वप्न पाहणारा हा माहितीपट गोवा बचाव आंदोलन काळात जन्माला आला. त्यात गोव्याचा नकाशा अळी कुरतडते तेव्हा मन हादरते.

‘प्लास्टिक धोती’ हा राजेश कारेकरांचा लघुपट या महोत्सवात पाहता आला आणि त्याने मन जिंकून घेतले. टाकाऊ प्लास्टिक गोळा करून त्यातून टिकावू कलाकृती निर्माण करणारी छोटी गरीब मुलगी ‘जीवन’ या लघुपटाची नायिका आहे आणि खलनायक आहेत तिची उपेक्षा करणारे, तिला संधी न देणारे, तिला लुबाडणारे तुम्ही-आम्ही म्हणजे समाज. या लघुपटाची महती या लेखाच्या मर्यादेत मावणे शक्य नाही. या लघुपटास पारितोषिक मिळाले, पण सरकारकडून कुठलीच आर्थिक मदत मिळाली नाही हे धक्कादायक आहे. सरकारने या लघुपटास वेगवेगळ्या भाषांतील सबटायटल्स वापरून देश-विदेशांत प्रदर्शित करावा इतकी त्यात मानवता, मूल्ये व कलागुण आहेत. हा लघुपट शाळांमध्ये दाखविला तर पर्यावरण रक्षण, प्रेम हे परवलीचे शब्द बनतील. अनिता विश्‍वकर्मा, प्रीती, लक्ष्मी, दुर्मिता, गौरी, नितिन कोलवाळकर, ज्योती पांचाळ, अवधूत कामत, रेने व्हेली यांनी या लघुपटात सुरेख काम केले आहे. देवराज उपाध्ये, स्वप्निल शेटकर व राजेश भोसले यांचे संकलन तसेच शर्मद रायतूरकर यांचे छायाचित्रण या लघुपटास लाभले आहे. या सर्वांना प्रत्येकाने लाख लाख धन्यवाद द्यावेत असेच त्यांचे काम आहे.

महोत्सवात यापुढे गोव्यातील अधिक लघुपट- माहितीपटांचा समावेश व्हावा यासाठी हा महोत्सव दोन दिवसांऐवजी कमीत कमी चार दिवसांचा व्हायला हवा. ही वेळ वाढवता आली तर महोत्सवाच्या निमित्ताने गोव्यात येणार्‍या चांगल्या जाणकार मंडळीना खास कार्यशाळा आयोजित करून त्यात सहभागी करता येईल. वसुंधरा महोत्सवाची आयोजन समिती या दिशेने प्रयत्नशील आहे. त्यासाठी आर्थिक मर्यादेवर मात करावी लागेल. या वर्षी महोत्सव विनाशुल्क होता. पर्यावरणाचा घात करणार्‍यांकडून कुठल्याही स्पॉन्सरशीपची अपेक्षा नाही.

‘पर्यावरण माझ्या नजरेतून’ आणि ‘पाणी वाचवा’ या विषयांवरील छायाचित्र प्रदर्शन व सँक्चुरी एशियाचे ‘कॉल ऑफ द वाइल्ड’ छायाचित्र प्रदर्शन या महोत्सवाचा आकर्षण विषय ठरले. त्या अनुषंगाने घेतलेल्या स्पर्धांमधून छायाचित्रांची निवड करण्यात आली. या छायाचित्रांमध्ये एकीकडे निसर्ग ओरबाडणारे दुर्जन तर दुसरीकडे निसर्गाचे संवर्धन करणारे प्रेमी यांच्या प्रतिमा होत्या. नाग, सुसर, कॉपर हेडेड ट्रिकेट, सरडे, कोरल साप यांची चित्रे मन वेधून घेत होती. प्लास्टीक फेकून देण्याने निसर्गाची होणारी हानी, एकीकडे समुद्रतळाचे आरसपानी सौंदर्य दाखवणारे, किनार्‍यांना वाचवणार्‍या खारफुटीचे वैभव तर दुसरीकडे मानवनिर्मित कचर्‍याचा नि नद्यांचा श्‍वास कोंडणार्‍या जलपर्णींचा कलंक. घरं नाहीशी झाल्याने वाट चुकलेले वन्यजीव यांचा समावेश होता. ही सारी छायाचित्रे विचारत होती- ‘आपल्या जन्मदात्री वसुंधरेचा विचार करायचा कुणी?’

छायाचित्रांसोबतची घोषवाक्ये सारीच विचारप्रवृत्त करणारी आणि हृदयाला हेलावणारी होती. एका चित्रात जंगलातील रस्त्यावर अपघाताने मेलेली किंवा जखमी होऊन पडलेली विविध जनावरे दाखविली होती. त्या चित्राचे शीर्षक होते- ‘रस्ते करून आमची जंगले दुभंगलीत, आता निदान वाहने तरी सांभाळून चालवा!’ ‘वाघाची कातडी सोलणार, बिबट्यांना पकडून फोटो काढणार, गेंड्याची शिंगे कापणार, थकलेल्यांना फसवून मारणार हीच का तुमची मर्दानगी?’ या प्रश्‍नरूपी शीर्षकाने सगळ्यांनाच अस्वस्थ केले. ‘झाडांची बेसुमार कत्तल करायची, पण ती पुन्हा वाढतील याची जबाबदारी कुणी घ्यायची?’ हा प्रश्‍नही लाजवत होता.

पण सारेच काही निगेटिव्ह नव्हते. पर्यावरणविषयक जागृतीही होतेय… हा दिलासा देणारे फोटो जागोजागी विखुरलेले. त्यात प्लास्टिकच्या अतिवापराऐवजी पर्यावरणपुरक पिशव्या वापरण्याचा संदेश देणारे विद्यार्थी होते. बिबट्याला दूध पाजणारे, कोकणातील मंदिराजवळील कमळाचे तळे जपण्यासाठी प्रयत्न करणारे निसर्गमित्र, ग्रामस्थ यांच्या आश्‍वासक तस्विरी होत्या.

पर्यावरण छायाचित्र स्पर्धेत लुवाना फर्नांडिस, नेल्वीन डिसोझा व गोविंद गवडाल यांनी बाजी मारली. डॉ. पृथ्वी आमोणकर यांनी या स्पर्धेचे संयोजन केले.

रोटरॅक्ट व रोटरी क्लब म्हापसा यांनी ‘चित्रांगण’ स्पर्धा आयोजित करून महोत्सवात मोलाचे योगदान दिले. त्यात ईशा वायंगणकर, साहील दीपक पेडणेकर, काझीर तुल्ला, यश शेटकर, आरती अनगोल, सबिना खतीब, आयुष हळर्णकर यांनी बक्षिसे पटकावली.

जलसंवर्धन विषयासंबंधी मॉडेल मेकिंग स्पर्धा या महोत्सवामुळे गोव्यात प्रथमच झाली. त्यात श्री गणेश विद्यामंदिर म्हापसा, सेंट मेंरी हायस्कूल म्हापसा, पीपल्स हायस्कूल पणजी व डॉनबॉस्को यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. रोटरी क्लब पणजी रिव्हेरातर्फे महोत्सवात शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘पाणी’ या विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात डिचोली, म्हापसा, मडगाव, वास्को, शिरोडा, तसेच पणजीतील ३० शाळांमधून २३५ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. क्लबच्या अध्यक्षा माधवी बांदेकर शेट्ये यांनी ही उत्साहवर्धक परीक्षा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. रोझरी मिरामारचा तीर्थ सुधीश, चाइल्ड केअर स्कूल मडगावची इशानी पै काणे, हेडगेवार हायस्कूलची त्रिशा वेर्णेकर, विद्याभवनची नेली वाझ, मुष्टिफंडचा ऍडव्हिल मुद्रस, विद्याभारतीची मंजिरी डुकले, रोझरीचा अथन न्यूननस, विद्याभारतीची राधिका कुडतडकर, महालक्ष्मी विद्यालयाची क्षितिजा नाईक व किड्‌स वर्ल्ड विद्यालयाच्या व्हान्स परेरा यांनी त्यात पारितोषिके प्राप्त केली.

२५ ऑगस्टला मनपाचे आयुक्त संजीत रॉड्रिग्स यांच्या हस्ते ‘ओव्हरकमिंग निंबे’ या प्रोजेक्ट फिल्म केलेल्या शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. पीपल्स हायस्कूलची शिक्षिका शीतल परेश गायतोंडे यांनी विद्यार्थ्यांना कौतुकास्पद मार्गदर्शन करून बनविलेली ही फिल्म शिकणोतील कार्यशाळेत झळकली होती. पणजी महानगरपालिकेने या फिल्मबाबत सहकार्य दिले, त्याची कृतज्ञतेने नोंद केलीच पाहिजे. कचरा प्रकल्पाच्या व्यवस्थापनाचे धडे या १२ मिनिटांच्या फिल्ममध्ये अभ्यासता आले.

याच दिवशी आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या टिमने ‘पाणी- नागरीकरण’ याविषयीसादरीकरण केले. युवकांना संधी दिली तर ते त्या संधीचे सोने करतात हे या सादरीकरणातून लक्षात आले. आपण त्यांना वाव देत नाही आणि उगाचच म्हणतो की युवकांना पर्यावरणाचे देणेघेणे नाही. माझ्या मनातील युवकांविषयीचे आरोप खोटे ठरविणारे ही सादरीकरणे पाहून मला चुकल्याचा अत्यानंद झाला.

गोवा सायन्स सेंटरच्या सहकार्याने महोत्सवात पर्यावरणविषयक प्रश्‍नमंजूषा आयोजित करण्यात आली. त्यात नितिश फातर्पेकर, क्रेग रॉड्रिग्ज व वरुण टिपणीस यांना पारितोषिके प्राप्त झाली.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशोनोग्राफीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रमय्या यांनी जैविक वैविध्याच्या विषयावर मुलांशी त्यांना समजेल अशा सोप्या भाषेत रंगतदार संवाद साधला व शंकानिरसन केले. आपली वसुंधरा व तिच्या अंगाखांद्यावर खेळणारे विविध जीव यांच्याविषयी त्यामुळे आपल्या मनात निश्‍चितच प्रेम वाढीस लागेल.

आपल्या घरातील ओला-सुका कचरा कोणता, तो कसा वेगवेगळा ठेवायचा, तसं न केल्यास नगरपालिकेच्या कामगारांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो याविषयी मुलांना श्री. रिचर्ड डायस यांनी मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम पुन्हा टीव्ही वाहिन्यांवर प्रसारित झाला तर ती गोव्याची फार मोठी सेवा ठरेल. पणजी महानगरपालिकेच्या पुढाकाराने हा कार्यक्रम झाला. त्याचवेळी राजतिलक नाईक यांनी कार्यशाळा घेतली. रोटरी मीड टाऊन पणजीने ‘वॉक फॉर वॉटर’ हा उपक्रम राबवला. त्याचे संयोजन डॉ. विनयकुमार रायकर यांनी केले. डॉ. रायकरांच्या आयोजन कौशल्यामुळे हा वॉक फारच सुखद झाला. पण तरीही क्षणोक्षणी आठवण जागी होत होती ती खेडोपाडी पाण्यापायी आयाबहिणींना कराव्या लागणार्‍या पायपिटीची. डॉ. रायकर यांच्याकडून माझ्या फार अपेक्षा आहेत. कधीतरी ‘पाण्यासाठी दाहीदिशा आम्हा फसविशी जगदिशा’ ही बिकट हालाची परिस्थिती सुधारण्यासाठी डॉक्टर व त्यांचा रोटरी क्लब निश्‍चितच काहीतरी करेल असा विश्‍वास वाटतो.

पर्यावरण वाचवण्यासाठी ज्या कार्यकर्त्यांनी आणि संस्थांनी जिवाचे रान केले त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसुंधरा महोत्सवात त्यांना पुरस्कार दिले जातात. वसुंंधरा वाचवा, जगवा आणि टिकवा हा संदेश जगणार्‍यांचा त्यावेळी सन्मान केला जातो. महोत्सवात उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘पर्यावरण मित्र’ पुरस्कार देण्यात आला. श्री. निर्मल कुलकर्णी यांना तो प्राप्त झाला. तसेच फोंडा येथील निर्मल विश्‍व संस्थेतर्फे वास्तुविशारद के. डी. साधले, रेखा जोशी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. महोत्सवाच्या समारोप सोहळ्यात समुद्र विज्ञान संस्थेचे डॉ. नकवी यांच्या हस्ते श्री. राजेंद्र केरकर यांना वसुंधरा सन्मानाने गौरविण्यात आले.

यावेळी जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंते संदीप नाडकर्णी यांचे व किर्लोस्कर उद्योग समूहाचे प्रतिनिधी श्री. प्रशांत कामत यांचे समयोचित भाषण झाले.

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार डॉ. सुबोध केरकर यांचे पाण्याच्या थेंबाचे इन्स्टॉलेशन वसुंधरा महोत्सवाचे हायलाईट होते. फायबर ग्लासच्या माध्यमातून ते साकारण्यात आले. कुणाला त्यात गोव्यात पसरलेल्या प्रदूषणाचे प्रतिबिंब दिसले तर कुणाला पर्यावरणाच्या थेंबे थेंबे साचत जाणार्‍या जाणिवा दिसल्या. ‘दृष्टी तशी सृष्टी’ असे म्हणतात त्याचा या इन्स्टॉलेशनमध्ये प्रत्यय आला.

स्वतःच स्वतःची पाठ शाबासकीने थोपटावी असे प्रामाणिकपणे वाटणारे, कृतार्थ करणारे क्षण आयुष्यात क्वचितच येतात. २४ व २५ ऑगस्ट रोजी वसुंधरा महोत्सवाच्या निमित्ताने ती अनुभूती सातत्याने आली. हा महोत्सव किलोस्कर, वसुंधरा क्लब व गोव्यातील कलाकृती एक्सप्रेशन ऑफ आर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. महोत्सवाचे शिवधनुष्य पेलणार्‍या कलाकृतीची प्रेरणा असणार्‍या प्रेरणा पावसकर-माईणकर यांनी मला त्यात सहआयोजक होण्याची अनमोल संधी दिली. डॉ. लक्ष्मी भरणे, वास्तुविशारद रिटा जोशी, डॉ. विनय कुमार रायकर, डॉ. पृथ्वी आमोणकर, श्री. रिचर्ड डायस, राज सुतार, फेबीयन डी कॅस्ट्रो आणि सुनिता रॉड्रिक्स या पर्यावरण प्रेमाने झपाटलेल्या टिममध्ये खारीचा वाटा उचलायला मला पुन्हा पुन्हा आवडेल. पुढील वर्षी पुन्हा पृथ्वीचे प्रेमगीत गायला आपणही सज्ज व्हावे!