वर्धानगरीत घुमला मराठीचा गजर

0
17
  • श्री. राजमोहन शेटये

अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे भव्यदिव्य असे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विदर्भ साहित्य संघातर्फे वर्धानगरीत नुकतेच पार पडले. 3, 4 आणि 5 फेब्रुवारी 2023 रोजी संपन्न झालेले हे संमेलन मराठीचे बलस्थान किती मजबूत आहे याची साक्ष देऊन गेले.

अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे भव्यदिव्य असे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विदर्भ साहित्य संघातर्फे वर्धानगरीत नुकतेच पार पडले. 3, 4 आणि 5 फेब्रुवारी 2023 रोजी संपन्न झालेले हे संमेलन मराठीचे बलस्थान किती मजबूत आहे याची साक्ष देऊन गेले. वर्धा ही राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पूज्य विनोबा भावे यांच्या विचारांनी आणि वास्तव्याने पावन झालेली भूमी. मोर्य, शुंग, सातवाहन, शक, गौतमी पुत्र सातकर्णी यांनी या प्रदेशावर राज्य केले होते. सातवाहनानंतर आलेल्या वाकाटक घराण्याचा राजा दुसरा प्रवरसेन याने प्रवरपूरची म्हणजेच आजच्या पवनारची स्थापना केल्याचा उल्लेख इतिहासात सापडतो.

सन 1934 मध्ये महात्मा गांधींनी सेवाग्राम येथे आश्रम स्थापन केला. पुढे सेवाग्राम हे ठिकाण राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरले. सन 1942 च्या ‘चले जाव’ आंदोलनाचा महत्त्वपूर्ण निर्णय याच आश्रमातून झाला होता. वर्धा नदीच्या नावावरूनच या जिल्ह्याला ‘वर्धा’ हे नाव पडले आहे. वर्धा शहरापासून दक्षिणेस 8 कि.मी. अंतरावर निसर्गाच्या कुशीत धाम नदीच्या तीरावर पवनार येथे आचार्य विनोबा भावे यांचा परमधाम हा आश्रम आहे. विनोबाजींच्या आध्यात्मिक साधनेचा प्रयोग, सत्याग्रह व सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी केलेल्या अभिनव आंदोलनाचा परमधाम आश्रम साक्षीदार आहे. या अशा महापुरुषांच्या विचारांनी आणि पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र अशा नगरीत हे संमेलन संपन्न झाले.

1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि 1961 मध्ये पुण्याची महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघ, औरंगाबादची मराठवाडा साहित्य परिषद, नागपूरचा विदर्भ साहित्य संघ या चार संस्था एकत्र आल्या आणि त्यांनी मराठी भाषेचे, मराठी वाङ्मयाचे आणि मराठी संस्कृतीचे काही समान प्रश्न सोडविण्यासाठी एक शिखर संस्था निर्माण केली. ती संस्था म्हणजे संमेलन आयोजित करणारे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ. या महामंडळात मराठीच्या अभिवृद्धीसाठी झटणाऱ्या महाराष्ट्राबाहेरील अधिक सहा संस्था सामील झाल्या. ज्यात मराठी साहित्य परिषद (हैदराबाद), गोमंतक साहित्य सेवक मंडळ (गोवा), कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद (गुलबर्गा), मराठी साहित्य परिषद (तेलंगण राज्य), छत्तीसगड मराठी साहित्य परिषद (बिलासपूर) आणि मध्य प्रदेश मराठी साहित्य संघ (भोपाळ) या अशा एकूण सहा सलग्न संस्था या शिखर संस्थेचा भाग आहेत.
गोमंतक साहित्य सेवक मंडळाशी मी जोडला गेल्याने, या अशा अखिल भारतीय पातळीवरच्या साहित्य संमेलनाचा मला भाग होता आले हे मुद्दाम सांगू इच्छितो.

महामंडळाच्या स्थापनेपर्यंत मराठीची जी साहित्य संमेलने भरत होती ती पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने भरवली होती. साहित्य महामंडळाने काम सुरू केल्यानंतर दरवर्षी एक साहित्य संमेलन भरवावे असा निर्णय 1964 मध्ये मडगाव- गोवा येथे 45 व्या साहित्य संमेलनात ठरला आणि 1965 मध्ये हैदराबाद येथे झालेले 46 वे साहित्य संमेलन जे महामंडळाचे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठरले. अन्‌‍ आजपावतो ते अखंडपणे चालू आहे. मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी मराठीचा गजर आज जो घुमत आहे याचे श्रेय खऱ्या अर्थाने कुणाला जाते तर ते मराठी भाषेवर नितांत प्रेम करणाऱ्या मराठी भाषिकांना असे म्हणता येईल. दरवर्षी साहित्यिकांचा एक नवा विचार आणि एकंदर साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ पुढे जाण्यासाठी अशा संमेलनाचे महत्त्व निश्चितच आहे. संमेलने ही पुस्तके आणि वाचन संस्कृतीशी जरी निगडित असली तरी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून वाचक चळवळ वाढवण्यासाठी काय काय करता येईल याचा शोध घेणे हे प्रमुख उद्दिष्ट राहते. या वर्षीच्या या संमेलनात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे, युवा वर्गाची कमी उपस्थिती. साहित्य चळवळ जर अशीच पुढे उभारलेली हवी तर आजची युवा पिढी यात जास्त प्रमाणात समाविष्ट होण्याची गरज आहे. आणि हा बोध संमेलनाचा आढावा घेताना नक्कीच घेतला जाईल.
3 फेब्रुवारी रोजी परंपरागत अशा ग्रंथदिंडीने साहित्यसंमेलनाची सुरुवात झाली. या संमेलनाच्या अनुषंगाने वर्धानगरीतील नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला. ग्रंथदिंडीमध्ये विठ्ठल रखुमाई, संत रामदास, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ, चक्रधर स्वामी, महात्मा गांधी, तुकडोजी महाराज, संत जनाबाई, छत्रपती शिवाजी महाराज, माता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई, रजिया सुलतान, मदर तेरेसा आदी संत-महात्म्यांच्या वेशभूषेत विविध शाळांतील विद्यार्थी सहभागी झाले होते. महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांची प्रगल्भता संपूर्ण ग्रंथदिंडीत आढळून येत होती. ज्या विदर्भ साहित्य संघातर्फे हे संमेलन भरवले गेले, त्या विदर्भ साहित्य संघाची यावर्षी शताब्दीही आहे.

संमेलन परिसरात आचार्य विनोबा भावे मुख्य सभा मंडप, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ प्रदर्शन, ग. त्र्यं. माडखोलकर प्रकाशन मंच, मनोहर म्हैसाळकर सभा मंडप, प्रा. देविदास सोटे कवी कट्टा, कविवर्य सुरेश भट गझल कट्टा, वा. रा. मोडक बालसाहित्य मंच, मावशी केळकर वाचन मंच अशा विविध साहित्यिकांचा हे मंच गौरव करीत होते. मुख्य प्रवेशद्वार आकर्षक केले होते. महात्मा गांधींच्या चित्र-प्रतिकृतीतून बापूजी चरख्यातून सूत कातत आहेत हे दाखवले होते. प्रवेशद्वारावरच सार्थ तुकाराम गाथा, सार्थ ज्ञानेश्वरी, विनोबा भावे यांच्या पुस्तकांची मुखपृष्ठे अनेक साहित्यकांचे लक्ष वेधून घेत होती.

संमेलनाच्या पूर्वसंध्येला 95 व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक भारत सासणे यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शन आणि प्रकाशन मंचाचे उद्घाटन करण्यात आले. साहित्यनगरीतील प्रमुख प्रा. राम शेवाळकर व्यासपीठावरून संमेलनाच्या उद्घाटनाचा मुख्य सोहळा पार पडला. वर्धा येथील स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावर आयोजित या संमेलनाच्या उद्घाटनाच्या सत्रात ज्येष्ठ विचारवंत, लेखक, न्यायमूर्ती व संमेलनाचे अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांनी मावळते अध्यक्ष भारत सासणे यांच्याकडून या संमेलनाची सूत्रे स्वीकारली. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, भाषामंत्री दीपक केसरकर, ज्येष्ठ हिंदी साहित्यिक डॉ. विश्वनाथ प्रसाद तिवारी, प्रसिद्ध हिंदी कवी डॉ. कुमार विश्वास, डॉ. डी. वाय. पाटील, अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे, उपाध्यक्ष रमेश वंसकर, स्वागताध्यक्ष दत्ताजी मोने, कार्याध्यक्ष प्रदीप दाते, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, विलास मानेकर, प्रकाश पागे, नरेंद्र पाठक, गिरीश गांधी व महामंडळाचे इतर सर्व पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. रेणुका देशकर यांनी सुंदर असे सूत्रसंचालन केले. संमेलनाचा मागील फलक 80 मीटर बारदानाचा वापर करून तयार करण्यात आला होता. त्यात 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शब्दबद्ध करण्यात आले होते. यासाठी जवळजवळ 100 मीटर खादीच्या दोरखंडाचा उपयोग केला होता. ग. त्र्यं. माडखोलकर यांचे चित्र कापसाच्या पेळेतून साकारले होते. कलाकुसरीचा आकर्षक नमुना त्यामुळे तयार झाला होता. उद्घाटन सत्रात संमेलनाध्यक्ष न्यायमूर्ती चपळगावकर यांनी व्यक्त केलेली खंत ही खूप बोलकी होती. ते म्हणाले, ‘साहित्य संमेलनाचे सरकारीकरण होता कामा नये. साहित्याचा संसार गरिबीत राहिला तरी चालेल पण तो सरकारच्या नियंत्रणेत येता कामा नये. साहित्यकारांच्या स्वतंत्र अभिव्यक्तीवर गदा येऊ नये.’ हे विचार थोडे परखड जरी असले तरी थेट होते. प्रेक्षकांमधून पूर्णतया त्याचे स्वागतच झाले होते. ‘समाजाला भेडसावणाऱ्या प्रश्नांना तोंड देण्यासाठी साहित्यिकांचा जन्म होतो,’ असे उद्गार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी काढले, तर ‘साहित्यिक आणि राजकारणी यात आणीबाणीची स्थिती कधीच उद्भवू नये’ अशी खंत भाषामंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केली. महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे यांनी वर्ध्याच्या साहित्याचे जुने नाते उलघडले आणि त्याचे महत्त्व विशद केले.
वेगळ्या विदर्भाची जी जुनी मागणी होती ती मुख्यमंत्र्यांचे भाषण चालू असताना केली गेली. त्यामुळे ती थोडा गोंधळ आणि गालबोट संमेलनाला लावून गेली. मात्र आयोजित केलेले परिसंवाद विचारांना चालना देणारे होते. बोलीभाषेपासून समाजमाध्यमातील अभिव्यक्तीपर्यंत व्यक्त होणारे हे परिसंवाद थेट व सरळ होते. आशावादी साहित्यकाला पूरक अशी स्फूर्ती किंवा प्रेरणा देणारे ठरले.

परिसंवादामध्ये कर्मयोगी गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि महाराष्ट्राची प्रबोधन परंपरा, आम्हा लेखकांना काही सांगायचे आहे, ललितेतर साहित्याची वाढती लोकप्रियता, डॉ. अभय बंग (गडचिरोली) यांची प्रकट मुलाखत असे अभ्यासपूर्ण विषय होते. नंतर भारतीय व जागतिक साहित्य विश्वात मराठीची ध्वजा फडकवणारे अनुवादक, कृषी जीवनातील अस्थिरता, प्रक्षोभ आणि मराठी लेखक, मराठी साहित्यातील उद्योग व अर्थविषयक लेखन, गांधीजी ते विनोबाजी वर्तमानाच्या परिपेक्ष्यातून असे परिपूर्ण व अर्थपूर्ण परिसंवाद होते. ‘गांधीजी ते विनोबाजी वर्तमानाच्या परिपेक्ष्यातून’ या परिसंवादात गोमंतकातील साहित्यिक, राजकारणी व कायदेतज्ज्ञ माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांचा सहभाग होता. गोव्याच्या साहित्याची उंची दर्शवणारा त्यांचा सहभाग ठरला. संमेलनात गोव्यातूनही मंडळी सहभागी झाली होती. गोमंत साहित्य सेवक मंडळाने खरे तर मला ही संधी दिली होती. जुन्या-नव्याचा ताळमेळ साधत गोमंतक साहित्य आणि साहित्यिक दर्जेदार व्हावेत व राष्ट्रपातळीवर असलेली साहित्याची उंची त्यांनी अनुभवावी यासाठी यासारखे व्यासपीठ नाही. संमेलनात कविसंमेलनाच्या वेळेचे नियोजन थोडे अवाक्याबाहेर गेले. तसे अशा मोठ्या संमेलनाला ते अपेक्षितच असते. तरी त्यात थोडा समतोल राखता आला असता तर प्रेक्षकांची उपस्थिती थोडी जास्त अनुभवता आली असती. तरी सुरेख असेच आयोजन आणि नियोजन म्हणावे लागेल.

समारोह कार्यक्रम संध्याकाळी होता. त्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संध्याकाळी येणार होते. त्यांचा कार्यक्रम अचानक सकाळी केला गेला व त्यांच्या आगमनामुळे इतर कार्यक्रम काही वेळ बंद ठेवल्याने थोडी नाराजी साहित्यिक आणि प्रेक्षकांमध्ये जाणवली. साहित्यिकांच्या अभिव्यक्तीपुढे राजकीय सोयीने सदर कार्यक्रम बदलला तर साहित्यिकांच्या स्वतंत्र अस्मितेला धक्का पोहोचतो. निदान या गोष्टी यापुढे तरी टाळत्या येण्याजोग्या आहेत. समारोप सोहळ्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही उपस्थिती लक्षवेधी होती. संमेलनात वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनातून वर्धा प्रशासन कार्यरत होते. त्यामुळे तसे अनेक निर्बंध साहित्य संमेलनात जाणवले. विशेषकरून पोलिसांचा साहित्य मंडपात होणारा हस्तक्षेप अनेक साहित्यिकांना रूचत नव्हता. याव्यतिरिक्त तशा अनेक चांगल्या गोष्टींची नोंद करण्यासारखी होती, त्यातीलच एक म्हणजे बालसाहित्य कट्टा. पुढची पिढी घडविण्यासाठी राबवलेला हा उपक्रम स्तुत्यच म्हणावा लागेल. त्याला प्रतिसादही भरपूर लाभला. कवी कट्टा आणि गझल कट्टा हे दोन्ही कायम गर्दीत होते. त्यामुळे अनेक नव्या-जुन्या साहित्यिकांना ती पर्वणी ठरली. शालेय विद्यार्थ्यांसाठी उभे केलेले मराठी दालनसुद्धा अखंडपणे चालू होते. जेवणाची उत्तम सोय केली होती. मी जरी खास निमंत्रित होतो तरी इतर साहित्यिकांना व एकंदर कार्यकर्त्यांना उत्तम जेवणाची सोय होती, आणि हे विशेषच म्हणावे लागेल. साहित्याचा आनंद अनुभवणाऱ्या साहित्यिकांसाठी पुरेसे नियोजन संमेलनस्थळी होते. संमेलनाचा आवाका पाहता काही त्रुटी तशा अपेक्षित आहेतच. तरी एकंदर साहित्याची अनुभूती घेणाऱ्यांना पूरक व्यवस्था करण्यात आयोजक यशस्वी ठरले असे म्हणता येईल. खऱ्या अर्थाने आम्हा नव्या साहित्यप्रेमींना दिग्गज अशा साहित्यिकांना भेटण्याचा योग आला.

महाराष्ट्राच्या साहित्यात पूर्वीपासून गोव्याचे स्थान अढळ आहे. त्यामुळे गोवा-महाराष्ट्र कायम जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत, आणि याची प्रचिती आम्हाला आली ती म्हादई नदीसाठी घेण्यात आलेल्या ठरावातून. महामंडळाच्या बैठकीत जेव्हा हा ठराव श्री. रमेश वंसकर यांनी पुढे केला त्यास जवळजवळ सर्व साहित्यिकांनी आपली अनुकूलता दर्शवली. गोव्याच्या एकंदर अस्मितेच्या दृष्टीने म्हादईचे स्थान आणि साहित्यिकांनी यावर केलेला विचार म्हादई बचावसाठी बळ वाढवणार आहे. खुद्द गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनीसुद्धा याची दखल घेतली हे तसे महत्त्वाचे आहे. भविष्यात राष्ट्रीय पातळीवरच्या साहित्यकांनी या लढ्यात आपली भूमिका स्पष्ट केली, हे बळ मोठे आहे. गोमंतकीयांचा हा लढा किती जिव्हाळ्याचा आहे याची प्रचिती एक साहित्यिक म्हणून गो. सा. से. मंडळाचे अध्यक्ष श्री. रमेश वंसकर यांनी दाखवून दिले. मला या ठरावात म्हादईविषयी आपण किती संवेदनशील आहोत हे पटवून देण्याची संधी मिळाली व त्या ठरावास अनुमोदन करण्याची संधी मिळाली हे माझ्यासाठी मोठे भाग्याचे असे मी म्हणेन. एकंदर ही ऐतिहासिक घटना म्हणून इतिहासात नोंद राहील आणि या म्हादई लढ्याची व्यापकता वाढेल असे मला तरी वाटते. साहित्याची प्रखरता आणि धार किती मोठी आहे हे यावरून सिद्ध होते. संमेलन ऐतिहासिक राहिले हे मात्र खरे.