पर्ये सरकारी विद्यालयातील घटना
पर्ये सत्तरी येथील सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या नुकत्याच दुरुस्त करण्यात आलेल्या वीजकामांतर्गत वर्गामध्ये असलेला पंखा अचानक कोसळून विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली. तिच्या कानाला व इतर ठिकाणी दुखापत झालेली आहे. सध्या तिला म्हापसा येथील आझिलो रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
पर्ये सत्तरी येथील सरकारी प्राथमिक शाळेमध्ये वर्ग सुरू असतानाच वर्गातील पंखा तुटून तो एका विद्यार्थिनीच्या अंगावर पडला. त्यामुळे तिच्या कानाला जबर जखम झाली. त्याचप्रमाणे इतर सर्वांगावर जखम झाली. याची माहिती स्थानिकांना मिळाल्यानंतर अनेक पालकांनी शाळेमध्ये धाव घेतली. रक्तबंबाळ अवस्थेत सदर विद्यार्थिनीला 108 रुग्णवाहिकेतून प्रथम साखळीत व नंतर आझिलो इस्पितळात दाखल केले आहे.
आमदारांची दिलगिरी
स्थानिक आमदार डॉ. दिव्या राणे यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेण्याचे आश्वासन दिले. तसेच घडलेल्या या घटनेबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. गेल्या तीन वर्षांतील विकास कामांचा पुन्हा एकदा आढावा घेण्यात येणार असून दर्जाहीन काम झाल्यास सदर कंत्राटदारावर कारवाई करण्याची शिफारस संबंधित खात्याला करणार असल्याचे आमदारांनी स्पष्ट केले.

