काँग्रेस व गोवा फॉरवर्ड या पक्षांमध्ये युतीसाठीची बोलणी चालू असून आम आदमी पक्ष व रेव्ह्युलेशनरी गोवन्स पार्टी असे सगळेच विरोधी पक्ष या विरोधी पक्षांच्या आघाडीत सहभागी होतील, असा विश्वास काल विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी दै. नवप्रभाशी बोलताना व्यक्त केला. गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख व फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांच्यात युतीसाठी झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर काल दै. नवप्रभाशी बोलताना आलेमाव यांनी वरील विश्वास व्यक्त केला.
विरोधी पक्षांतील मतविभागणीचा सत्ताधारी भाजपला फायदा होतो हे आता सगळ्यांनाच कळून चुकलेले आहे. विरोधी पक्षांची आघाडी व्हावी ही विरोधकांची तर इच्छा आहेच. शिवाय राज्यातील लोकांचीही तशीच इच्छा असल्याचे आलेमाव हे म्हणाले. विरोधी पक्षांची युती व्हावी यासाठी बरेच काम करावे लागणार असून ते केले जाईल, असे स्पष्ट करताना त्याचसाठी या युतीसाठीची चर्चा गंभीरपणे केली जात असल्याचे आलेमाव यांनी नमूद केले. त्यासाठी स्वतंत्र अशा समितीची स्थापना करण्यात आलेली असून समितीने आपले काम सुरू केले असल्याची माहिती त्यांनी दिली. आपण युतीचा पुरस्कर्ता असून आपण सदैव विरोधी पक्षांच्या युतीचे समर्थन केले असल्याचे ते म्हणाले. यंदाची निवडणूक ही आमच्यासाठी निर्णायक अशी असेल. आणि विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. युती झाल्यानंतर योग्य अशा उमेदवारांची निवड करणे व उमेदवारी जाहीर करण्यास विलंब न करणे याकडे लक्ष देण्यात येणार असल्याचेही आलेमाव यांनी स्पष्ट केले.

