दिवंगत रवी नाईक यांचे थोरले पुत्र रितेश नाईक यांनी आपल्या वडिलांचा वारसा पुढे नेण्याचा निर्णय घेतला असून, मतदारसंघातील लोकांची कामे करण्यासाठी तसेच त्यांची गाऱ्हाणी ऐकून घेण्यासाठी त्यांनी रवी नाईक यांच्या फोंड्यातील कार्यालयाचा काल ताबा घेतला.
या पार्श्वभूमीवर आपल्या पुढील वाटचालीविषयी बोलताना रितेश नाईक म्हणाले की, आपल्या वडिलांचा वारसा आम्हा दोघांना (बंधू रॉय नाईक) पुढे न्यायचा असून, त्यासाठी राजकारणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. रवी नाईक यांनी काय काम केले आहे याची जाणीव लोकांना आहे. वडिलांचा वारसा पुढे नेताना त्यांनी राज्यातील जनतेसाठी ज्या प्रकारे काम केले तोच वारसा पुढे नेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काल एका स्थानिक न्यूज पोर्टलकडे संवाद साधताना त्यांनी वरील मत व्यक्त केले.
उमेदवारीविषयी विचारले असता रितेश नाईक म्हणाले की, त्याबाबत योग्य तो निर्णय भाजप घेणार असून, त्याबाबत आपण जास्त काही बोलू शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्ष जो काही निर्णय घेईल, तो आम्हा दोघा भावांना मान्य असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

