वटवृक्षाच्या सावलीत…

0
187

डॉ. सोमनाथ कोमरपंत

साहित्यसंमेलन हे मराठी संस्कृतीचे एक वैभवसंपन्न लेणे आहे. मराठी भाषेच्या वाङ्‌मयीन संस्कृतीची काही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आहेत. त्या वैशिष्ट्यांपैकी प्रतिकूलतेतून अव्याहतपणे वाटचाल करणारे साहित्यसंमेलन हे एक व्यासपीठ. दुसरी परंपरा १०३ वर्षांपासून चालत आलेली नियतकालिकांच्या दिवाळी विशेषांकांची. या प्रमुख धारांमुळे संस्कृतिप्रवाहाला अखंडता लाभली. चैतन्य लाभले. जिवंत आणि रसरशीत अंकुरांचे पोषण झाले. साहित्यसृष्टी गजबजून उठली. नवविचारांना पृष्ठभूमी लाभली. ज्ञानदेवांच्या परिभाषेत प्रमेयांची उद्याने निर्माण झाली. कथाकल्पतरू वाढले. काव्याचे बागबगिचे फुललेबहरले. या ललित लेण्यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संचिताचे अभिसरण झाले. वरपांगी विभिन्नता असली तरी अंतरंगातील एकात्म अंतःसूत्राचा मंत्र गवसला. या मराठी मातीचे गायन निरंतर गायले जाऊ लागले. सह्याद्रीच्या कणखर कड्यांनी सक्षम होण्याचे सतत आवाहन केले. पश्‍चिम सागराची गाज सृजनात्मकतेच्या ऊर्मींना पल्लवित करीत राहिली. संस्कृतीचा संशोध घेताना निसर्ग आणि माणूस यांच्या अनुबंधांची जाणीव ठेवणे हे अत्यावश्यक असते. हे आत्मभान आणि समाजभान साहित्यसंस्कृती देत असते. ही धुनी प्रज्वलित ठेवण्याचे कार्य गेली १३५ वर्षे मराठी साहित्यसंमेलनाने केले. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे या श्रेष्ठ प्रज्ञावंताच्या प्रेरणेने ११ मे १८७८ मध्ये पहिले ग्रंथकार संमेलन भरविले गेले. साहित्यसंमेलनाची ही गंगोत्री. समाजमनस्क विचारवंत गोपाळराव हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांनीही या अधिवेशनात पुढाकार घेतलेला होता. महादेव गोविंद रानडे यांनी अशा प्रकारची साहित्यसंमेलने का आवश्यक असतात यासंबंधी विवेचन केले होते आणि उपस्थितांच्या शंकांना उत्तरे दिली होती असा उल्लेख आढळतो. दुसरे संमेलन कृष्णशास्त्री राजवाडे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यास २८ मे १८८५ रोजी भरले. तिसरे अधिवेशन मे १९०५ मध्ये भरले. त्याचे अध्यक्ष होते रघुनाथ पांडुरंग ऊर्फ दादासाहेब करंदीकर.

त्यानंतरची अधिवेशने पुण्यातच भरली गेली. या अधिवेशनांना गती मिळाली. मराठी भाषेची महत्ता आणि वाङ्‌मयाचे आपल्या जीवनातील स्थान विचारवंतांकडून आणि साहित्यिकांकडून अधोरेखित केले गेले.

बडोदे येथे १९०९ मध्ये भरलेल्या मराठी साहित्यसंमेलनात कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी मराठी भाषेचा यथोचित गौरव केला. देशी भाषांत ग्रंथनिर्मिती होऊन ज्ञानाचा प्रसार सामान्य जनांपर्यंत व्हायला पाहिजे हे त्यांनी आग्रहपूर्वक प्रतिपादन केले ः ‘‘जिची अखिल शब्दसृष्टी आपल्या मस्तकावर धारण करण्याची योग्यता आहे ती सहस्रवदन मराठी भाषा! अशा भाषेचा योग्य उपयोग करणे हे ग्रंथकाराचे कर्तव्य आहे,’’ हे त्यांनी निःसंदिग्धपणे सांगितले. या संमेलनांची फलश्रुती म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषदेची झालेली स्थापना. १९१२ पासून परिषदेने साहित्यसंमेलने ही संमेलने भरविली. त्याचाही शतकपूर्तीचा योग यंदा आहे. आधुनिक मराठी कादंबरीचे जनक हरी नारायण आपटे हे अकोला येथे भरलेल्या साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष झाले. साहित्याचा मानदंड मानल्या गेलेल्या या श्रेष्ठ कादंबरीकाराने अध्यक्षपदावरून वाङ्‌मयाची महती विषद केली ः

‘‘वाङ्‌मय हे राष्ट्राच्या उन्नतीचे कारणही आहे आणि कार्यही आहे. राष्ट्राचा जसजसा उत्कर्ष होतो, तसतसा वाङ्‌मयाचा उत्कर्ष होतो; आणि वाङ्‌मयाला जितके उज्ज्वल व उन्नत स्वरूप येत जाईल, तितके तितके राष्ट्राच्या उन्नतीला व उज्ज्वलतेला ते कारण होते.’’

विसाव्या शतकाच्या प्रारंभकाली साहित्यसंमेलनाच्या व्यासपीठावरून झालेला हा नव्या विचारांचा उच्चार पुढच्या मराठी साहित्याच्या वाटचालीला प्रेरक ठरला. या गंगोत्रीचा शतकाच्या परिक्रमेनंतर आता गंगाप्रवाह झालेला आहे. या प्रगल्भ साहित्यप्रवाहाची विलोभनीय वळणे रसिकहृदयाला निरंतर आल्हाद देणारी ठरली आहेत. कथात्म साहित्यात आजमितीला मानवी जीवनाची विविधांगे रेखाटणारी आशयसूत्रे आलेली आहेत. मराठी कवितेतील प्रतिमाविश्‍व मनाला थक्क करणारे आहे. ललित वाङ्‌मय आणि ललितेतर वाङ्‌मय यांच्या सीमारेषा पुसट झालेल्या आहेत. महाराष्ट्राच्या सर्वदूर पसरलेल्या भौगोलिक प्रदेशांतील भाषा तेथील जीवनशैलीच्या सोलीव गाभ्याचे दर्शन घडविणारी आहे. माती आणि माणूस यांच्यामधील अतूट नात्याचा हा शोध आहे. मराठी मनाच्या हर्षामर्शांचे, स्पंदनांचे आणि वाङ्‌मयीन अंतःप्रवाहांचे दर्शन साहित्यातून होत राहिले. त्याविषयीच्या विमर्शाचे प्रकटीकरण शारदेच्या या व्यासपीठावरून होत राहिले. मराठी साहित्यशारदेला ललामभूत ठरलेल्या नामवंत साहित्यिकांनी आणि समीक्षकांनी आजवर या साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेले आहे. आपली ज्ञानसाधना आणि आयुष्याचे संचित आपल्या हृदयसंवादाद्वारे मराठी साहित्यरसिकांसमोर याच व्यासपीठावरून खुले केलेले आहे. या व्यक्तिपरत्वे केलेल्या चिंतनाला वाङ्‌मयीन मूल्य प्राप्त झालेले आहे. एका परीने मराठी जीवनसंचिताचा हा फार मोठा सांस्कृतिक दस्तऐवज आहे. १८७८ पासून २०१२ पर्यंत ८५ साहित्यसंमेलने आजमितीला झाली.

समाजाच्या बदलत्या अभिरूचीनुसार ग्रंथकार, ग्रंथवाचक आणि ग्रंथव्यवहाराशी गुंतलेले अन्य घटक या तीन दिवसांत आनंदसोहळ्यानिमित्त एकत्र येतात. जीवन जगत असताना कितीही अडचणी आल्या तरी आपल्या वाङ्‌मयीन अभिरुचीच्या संवर्धनासाठी आणि परस्पर संवादासाठी वेळ देतात ही लक्षणीय बाब होय. अशा वाङ्‌मयीन उत्सवांमुळेच आपल्या सांस्कृतिक जीवनाला उभारी प्राप्त होत असते. साहित्यसंमेलनातून नव्या प्रतिभेच्या उन्मेषांचे दर्शन घडत असते. परिसंवादामधून समाजमानसात वेळोवेळी निर्माण झालेल्या ऐरणीवरील प्रश्‍नांची चर्चा होत असते. तिचे सादपडसाद प्रदीर्घ काळापर्यंत वाङ्‌मयीन जगतात आणि समाजात उमटत असतात. समाज आणि साहित्य यांच्या अनुबंधाची ही खूण आहे. भौतिक समृद्धीबरोबर नवे यक्षप्रश्‍न आजच्या समाजव्यवस्थेत निर्माण झालेले आहेत. अन्य प्रसिद्धीमाध्यमांचे अतिक्रमण साहित्यसंस्कृतीवर मोठ्या प्रमाणात होत आहे. उन्नयनशील समाजाचे प्रतिबिंब असलेल्या साहित्याकडे गौणत्वाने पाहिले जाते. त्याच्या निर्मितिप्रक्रियेकडे वृत्तिगांभीर्याने पाहिले जात नाही. हे जरी प्रत्यक्षातील चित्र असले तरी गतिमान समाजरचनेत ग्रंथप्रेमाचा ऊबदार कंद जोपासण्याचे व्रत मराठी साहित्यसंमेलनाच्या व्यासपीठावरून निष्ठेने व अव्याहतपणे पाळले जात आहे. मूल्यव्यवस्थेवर कितीही आघात झाले तरी जीवनातील मर्मबंध संवेदनशील माणसे सहसा सोडून देत नाहीत. किंबहुना साहित्याच्या अभिव्यक्तीसारखे आत्मिक विकासाचे प्रभावी माध्यम मुमूर्षू समाजाला संजीवक शक्ती प्राप्त करून देत असते, याचा प्रत्यय नव्याने यायला हवा. कारण असे सांस्कृतिक अराजक आपल्या अवतीभोवती आहे.

आजवर या व्यासपीठावरून झालेल्या विचारमंथनाचे विहंगमावलोकन केले तर ते प्रसंगोचित ठरेल. आजवरच्या साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षांनी मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती यांच्या संदर्भातील विविध समस्यांचा ऊहापोह आपल्या भाषणांतून केला. या तिहींमधील आंतरिक अनुबंध उलगडून दाखविले. ग्रंथसत्तेची महत्ता पटवून दिली. त्यात्या कालखंडातील वाङ्‌मयाचे समालोचन केले. वाङ्‌मयेतिहासाची संकल्पना मांडली. पुढे तिचा पाठपुरावा केला. ती योजना कार्यान्वित केली. वाङ्‌मयीन आदानप्रदान प्रक्रियेचे हे फलित होय. साहित्यसंमेलनांच्या काही अध्यक्षांनी साहित्यनिर्मितीच्या प्रक्रियेविषयी आणि समकालीन संवेदनशीलतेविषयी बोलताना स्वतःला उमगलेली वाङ्‌मयीन उपपत्ती मांडली. त्यामुळे मराठी वाङ्‌मयविचारात काही नव्या संकल्पना रुजल्या. काहींनी आपल्या वाङ्‌मयीन प्रवासाच्या पाऊलखुणांविषयी बोलताना समकालीन वाङ्‌मयीन पर्यावरणाचे चित्र साहित्यरसिकांसमोर ठेवले. आजवरच्या साहित्यसंमेलनांच्या अध्यक्षांच्या भाषणांवर दृष्टिक्षेप टाकल्यानंतर लक्षात येते की हरी नारायण आपटे, . चिं. केळकर, शि. . परांजपे, वि. . खांडेकर, आचार्य अत्रे, प्रा. श्री. . माटे, भा. वि. वरेरकर, प्रा. . . फाटक, आचार्य शं. . जावडेकर, कवी यशवंत, प्रा. . का. प्रियोळकर, प्रा. कृ. पां. कुलकर्णी, वि. . घाटे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, डॉ. शं. दा. पेंडसे, कवी अनिल आणि प्रा. श्री. के. क्षीरसागर यांनी समकालीन तथा प्राचीन कालखंडातील वाङ्‌मयीन वृत्तिप्रवृत्तींचे समालोचन केले. वाङ्‌मयीन स्थितिगतीचा वेध घेतला. त्यांनी जो कालखंड निवडला त्यातून त्यांच्या विवक्षित वाङ्‌मयीन व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब आढळते. या समालोचनाद्वारे त्यांनी वाङ्‌मयीन परिप्रेक्ष्य उभे केले.

मराठी भाषेच्या अस्तित्वाच्या संदर्भात आणि अभिवृद्धीच्या योजनांच्या बाबतीत साहित्यसंमेलनांतून चर्चा होत राहिली. मराठी भाषा मुमूर्षू झाली आहे काय या संदर्भात श्रीपाद कृृष्ण कोल्हटकर, हरी नारायण आपटे यांनी विचारप्रकटन केले. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांच्यासारख्या प्रज्ञावंताने मराठी भाषा मुमूर्षू झाली आहे असे उद्गार काढले होते. त्यासंदर्भात झालेल्या तत्कालीन विचारमंथनाला त्यांनी वाट करून दिली. भाषाशुद्धी व शब्दशुद्धी यासंबंधी प्रामुख्याने माधवराव पटवर्धन आणि स्वातंत्र्यवीर सावकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणांमधून यासंबंधीचे विचार मांडले. बर्‍याच कालावधीपूर्वी विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी निबंधमालेतून भाषेच्या प्रदूषणाविषयी विचार मांडून या समस्येकडे लक्ष वेधले होते. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, हरी नारायण आपटे, शि. . परांजपे, प्रा. वा. . जोशी यांनीही संमेलनाच्या व्यासपीठावरून तत्संबंधी वेळोवेळी विचारप्रकटन केले. महाराष्ट्र विद्यापीठाचा पुनरुच्चार केला. याच व्यासपीठावरून ग. त्र्यं. माडखोलकरांनी संयुक्त महाराष्ट्राची मागणी केली. तिचा पुढे सातत्याने उच्चार होत राहिला. केवळ राजकीय समस्येची उकल करणे हेच या मागणीमागचे प्रयोजन नव्हते. भाषिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या मराठी समाज स्वातंत्र्योत्तर कालखंडात पहिल्यांदा एकात्म करण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. राष्ट्रीय नवनिर्माणाच्या प्रक्रियेत स्वायत्तपणे प्रादेशिक भाषा समर्थ होणे जरूरीचे होते. लोकशाहीने प्राप्त करून दिलेला तो मूलभूत हक्क होता.

साहित्यसंमेलनात प्रामुख्याने वाङ्‌मयीन चिंतन होणे क्रमप्राप्तच होते. हरी नारायण आपटे यांनी शब्दब्रह्म, नादब्रह्म आणि वागब्रह्म या संकल्पना मांडून त्यांतील आंतरसंबंध विशद करून सांगितला. ललित वाङ्‌मयाच्या वाचनातून होणार्‍या आनंदाची मीमांसा न. चिं. केळकर, प्रा. वा. . जोशी, ना. गो. चोपकर व शि. . परांजपे यांनी केली. . चिं. केळकरांनी १९२१ मध्ये बडोदा येथे भरलेल्या ११ व्या साहित्यसंमेलनात सविकल्प समाधीची उपपत्ती मांडली ः

‘‘वाङ्‌मयसेवनाने निर्माण होणार्‍या समाधीत स्वतःच्या मनोभूमिकेची जाणीव तर उरतेच, पण वर दर्शविलेल्या रीतीने इतर भूमिकाही तीत समाविष्ट होऊ शकतात. एवढेच नव्हे तर, तेच वाङ्‌मय अधिक उत्कृष्ट की ज्याच्या सेवनाने अधिकात अधिक कल्पना मनात एकदम उठतील व अधिकात अधिक भूमिकांचा मनाला अनुभव घडेल. या दृष्टीने पाहता सुंदर कल्पनाकल्लोळ ही वाङ्‌मयप्रेमी मनुष्याला इष्टापत्तीच होय. निवांत पाण्यात खडा टाकला असता एकाच मध्यबिंदूपासून एकामागून एक व एकाहून एक मोठी अशी तरंगवर्तुळे उठतात. पण ती इतकी जलद उठतात की त्यांतील अंतर मनःचक्षूंना दिसू शकत नाही व त्या वर्तुळांच्या कक्षा विश्‍वव्यापीही असतात. ‘साहित्यदर्पणकारांनी रसाला ब्रह्मस्वादसहोदरअसे विशेषण दिलेले आहे.’’

वाङ्‌मयातील वास्तवतेसंबंधी प्र. के. अत्रे, प्रा. . . फाटक, वि. . खांडेकर आणि भा. वि. वरेरकर यांनी विचार मांडले. अनिलांनी कवितेच्या अभिव्यक्तीसंबंधी विचार मांडताना नव्या युगमानसाशी सुसंवादी अशा मुक्तछंदाचा मुक्तकंठाने पुरस्कार केला. काव्य निश्‍चित अर्थवाही व्हावे, प्रगत प्रज्ञेचा आणि प्रतिभेचा विलास त्यात प्रकट व्हावयाला छंदांतील कृत्रिम बंधनांची अडचण नसावी हा हेतू त्यांनी मनात बाळगला होता. आचार्य अत्रे यांनी विनोदी वाङ्‌मयाची कैफियत मांडली. इचलकरंजी येथे भरलेल्या सुवर्णमहोत्सवी साहित्यसंमेलनात पु. . देशपांडे यांनी जो जें वांछिल तो तें लिहोया शब्दांत अभिव्यक्तिस्वातंत्र्याची द्वाही फिरविली. भा. वि. वरेरकरांनी समकालीन जीवनप्रवाह आणि साहित्यनिर्मिती यांमधील परस्परसंबंध उलगडून दाखविला. हेच सूत्र प्रा. श्री. . माटे, वि. . खांडेकर आणि आचार्य अत्रे यांच्या वैचारिक भूमिकेत आढळते. सामाजिक दायित्वाची जाणीव साहित्यिकांनी ठेवायला हवी असे त्यांनी प्रतिपादन केले. प्रा. श्री. . माटे यांनी हा विचार ठामपणे अधोरेखित केलेला आहे. प्रतिभावंतांचा मोहरा स्वकीयांकडे वळला पाहिजे हे त्यांनी आवर्जून सांगितले.

‘‘गेल्या शेपाऊणशे वर्षांत ही जागृती या समाजाला आलेली आहे हे मात्र खरे. परंतु या जागृतीचा उपयोग करून सर्व वाङ्‌मयसेवकांनी आपापली जिवंत वाङ्‌मये निर्माण करावी म्हणजे ममत्व, जागृती आणि समत्वबुद्धी ही समाजभर खेळत राहतील आणि मग आठ दिशांचे अष्टदिग्गज हर्षभरित होऊन त्या भावी हिंदुस्थानच्या शासनसंस्थेवर मोर्चे टाळण्यासाठी आपापल्या शुंडा उभारून धावत येतील असा भरवसा वाटतो.’’

स्वातंत्र्योन्मुख समाजातील साहित्यिकांच्या विचारांचा अवलंब कुणीकडे झुकायला हवा यासंबंधीचे भान आणि दूरदृष्टी त्यांच्याकडे होती. आचार्य जावडेकरांनी विज्ञाननिष्ठेचा व जीवननिष्ठेचा मूलमंत्र आपल्या अध्यक्षीय भाषणातून दिला. आजच्या आधुनिक युगास साजेल अशी सत्याग्रही क्रांतिनिष्ठा आपण जनतेत फैलावली पाहिजे असे आवाहन त्यांनी साहित्यिकांना उद्देशून केलेले आहे.

स्वातंत्र्यपूर्व कालखंडात साहित्यिकांनी, समीक्षकांनी आणि विचारवंतांनी साहित्यसंमेलन हे प्रभावी विचारांचे ऊर्जाकेंद्र मानून सर्वंकष स्वातंत्र्याच्या प्राप्तीच्या दृष्टीने जीवनरस पुरविला. ही धुनी प्रज्वलित ठेवली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या संकल्पनेत स्वाभाविकपणे फरक पडला. स्वातंत्र्योत्तर कालखंडात साहित्याच्या अभिव्यक्तीच्या अनेक वाटा चोखाळल्या गेल्या. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी लेखनवाचन करणारा वर्ग मर्यादित होता. आता मनू बदललेला आहे. वाढत्या अभिसरणप्रक्रियेमुळे समाजाचे तळ ढवळून निघालेले आहेत. त्यांच्या आशाआकांक्षांना नवे पल्लव फुटलेले आहेत. त्यामुळे समाजाच्या सर्व स्तरांमधून लेखककवींचा नवा वर्ग जन्मास येत आहे. प्रा. श्री. . माटे यांनी त्या काळात व्यक्त केलेले भाकीत आता वास्तव रूपात अवतरले आहे, ही स्वागतार्ह घटना आहे. साहित्यसरितेचे पाट समाजाच्या सर्वांगांमध्ये काढून त्याच्या अभिसरणाचे कार्य मोठ्या प्रमाणात होत आहे. स्वातंत्र्याने प्राप्त करून दिलेली ही सनद आहे. लोकशाहीच्या नव्या गतिमान कालखंडात नव्या समाजाच्या निर्मितीसाठी आणि उभारणीसाठी रचनात्मक कार्य चाललेले आहे. या नव्या प्रयोगांचा उद्गम आणि विकास आजकालच्या वाङ्‌मयातील आशयसूत्रांमधून प्रकट व्हायला लागला आहे. त्यामुळे पूर्वकालीन वाङ्‌मयीन निकषांचा पुनर्विचार व्हायला लागलेला आहे. जीवनप्रवाहाशी समांतर अशा विचारधारांचे प्रकटीकरण आता सर्जनशील साहित्याद्वारा व्हायला लागलेले आहे. त्या अनुषंगाने निर्माण झालेला अंतःप्रवाहांचा धांडोळा घेणे ही समकालीन समीक्षेच्या दृष्टीने अटळ बाब ठरलेली आहे. आंतरराष्ट्रीय जगतात निर्माण झालेले नवे विचारप्रवाह, वाङ्‌मयीन अभिरूचीत झालेले बदल, देशात आणि मराठी समाजात निर्माण झालेली स्थित्यंतरे यांमुळे वाङ्‌मयीन संवेदनशीलतेतही फरक पडत चाललेला आहे. या सर्व बदलांची नोंद या कालखंडातील साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षांनी घेतलेली आहे. या बदलाचे सुजाण आकलन कुसुमावती देशपांडे यांच्या अध्यक्षीय भाषणात आढळते ः

‘‘या संकुचित सौंदर्यवादाची कोंडी फोडून बाहेर पडण्यासाठी कोणत्याही परकीय कलाकोविदाकडे जाण्याची गरज नाही. नुसते थोडेसे सिंहावलोकन केले तरी मराठी साहित्यातील उंचवटे आणि गिरिशिखरे दिसू लागतील. समीक्षादृष्टी स्वच्छ होईल. साहित्यसमीक्षा ही अखेर साहित्यशरण असते. अभिजात साहित्याचे निरीक्षण, विश्‍लेषण करूनच तिची मूल्ये तिला लाभतात. असे केल्यावर दिसून येते की अभिजात साहित्यकृतीमध्ये निर्मात्याचे मन केवळ व्यक्तिमनाच्या क्षणिक छटांच्या चित्रणाच्या पलीकडे जाऊन काही श्रद्धांचा शोध घेत असते. ते रेषांचा घाट आणि लयबद्ध आकृती यात निमग्न राहत नसून जीवनातील सुसंगती वा विसंगतीचा मागोवा घेत असते. आणि हे कार्य करीत असताना ते स्वतःला विसरते. त्याला जीवनातील सौंदर्याचे दर्शन घडते म्हणून त्याची निर्मिती सुंदर बनते.’’ स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या कालखंडात जनमानसाने उराशी बाळगलेली स्वप्ने विफल झाली. प्रखर वास्तवाची जाणीव संवेदनशील मनांना अधिकाधिक बोचणारी होती. या भ्रमनिरासाचे, विसंवादाचे चित्र साहित्यातून दृग्गोचर व्हायला लागले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समतेसाठी दिलेला सर्वंकष लढा आणि सांघिकरीत्या केलेला बौद्ध धर्माचा स्वीकार हे स्वातंत्र्योत्तर कालखंडातील महत्त्वाचे पर्व होय. आजवर दबल्या गेलेल्या दलित आणि शोषित वर्गांचा हुंकार साहित्यातून मुखर झाला. त्यांच्या वेदनेला उद्गार लाभला. सामाजिक व्यथा आणि विद्रोह यांमधून दलित साहित्याचा उदय झाला.

संमेलनाच्या व्यासपीठावरून अनेक साहित्यिकांनी आणि समीक्षकांनी या नव्या प्रवाहाचे स्वागत केले. डॉ. वि. भि. कोलते यांनी मराठी साहित्याच्या कक्षा व्यापक होत असल्याचे नमूद केले. त्याविषयीचे समाधान व्यक्त केले. वामनराव चोरघडे यांनी मराठी भाषकांनी दलित साहित्याची कदर करावी हे त्यांचे कर्तव्यच नसून तो त्यांचा धर्म होय असे उद्गार काढले. गो. नी. दांडेकरांनी दलित साहित्यिकांकडे अनुभवांचा प्रचंड साठा आहे. त्याचा नीटस आविष्कार व्हावा. या साहित्याने याहून संपन्न रूप प्रकट करावे अशी अपेक्षा बाळगली. शंकरराव खरात यांनी दलित समाजाचे सुखदुःख स्वतः अनुभवले असल्यामुळे या साहित्यात प्रकट झालेल्या प्रखर जीवनानुभवांशी ते समरस झाले. पु. . देशपांडे, प्रा. गं. बा.सरदार, शंकर पाटील, प्रा. वसंत कानेटकर, प्रा. के. . पुरोहित, डॉ. यु. . पठाण, मधु मंगेश कर्णिक, रमेश मंत्री आणि नारायण सुर्वे या साहित्यिकांनी आपल्या अध्यक्षीय भाषणांतून दलित संवेदनशीलतेचे आणि तिच्यातून निर्माण झालेल्या नव्या आविष्काराचे स्वागत केलेले आहे.

स्वातंत्र्योत्तर कालखंडात मराठी वाङ्‌मय बहुशाखांनी पल्लवित झाले. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात ज्या दिग्गजांनी कविता, कथा, कादंबरी, नाटक, लघुनिबंध आणि विनोदी साहित्य या वाङ्‌मयप्रकारांची वाढ केली त्यांचा विकास आणि विस्तार स्वातंत्र्योत्तर कालखंडात झाला. या काळात काय काय घडले? नववाङ्‌मयीन प्रवृत्ती आल्या. प्रयोगशीलता आली. विशेषतः १९६० पासून नवप्रवर्तनाचा टप्पा मराठी साहित्यात सुरू झाला. योगायोगाने संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती १९६० मध्ये झाली. यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या धुरंधर व्यक्तीकडे महाराष्ट्राचे नेतृत्व आले. आपल्या सद्भिरूचिसंपन्न, सुसंस्कृत नेतृत्वाखाली त्यांनी भाषा, साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रात नवे पायंडे सुरू करून चैतन्य निर्माण केले. ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृतिमंडळाची स्थापना हा महत्त्वपूर्ण टप्पा होय. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या कुशल संपादनाखाली २० खंडांच्या विश्‍वकोशाची कोनशिला याच कालखंडात बसविली गेली. यंदा यशवंतराव चव्हाण यांची जन्मशताब्दी, हाही एक सुयोग आहे.

साहित्याचा प्रवाह आता गतिमान झालेला आहे. मराठीच्या वाग्धनाचा आस्वाद मुक्त मनाने आणि निखळपणे घेण्याची संधी आजच्या साहित्यरसिकांना प्राप्त झालेली आहे. या वाङ्‌मयीन अभिरूचीच्या निगराणीसाठी काय करायला हवे हे प्रगल्भ जीवनदृष्टी असलेल्या डॉ. विजया राजाध्यक्ष, प्रा. के. . पुरोहित, प्राचार्य म. . हातकणंगलेकर, प्रा. रा. . जाधव आणि प्रा. वसंत आबाजी डहाके यांच्यासारख्या निर्मितिप्रक्रियेत व्यग्र असलेल्या आणि सुजाण समीक्षादृष्टी असलेल्या साहित्यिकांनी या व्यासपीठावरून सांगितले आहे.

सर्वज्ञः माधवः|’ असलेल्या महादेव गोविंद रानडे यांनी मराठीच्या प्रांगणात लावलेले हे रोप आता वर्धिष्णू झालेले आहे. त्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्याच्या सावलीत सर्वांना वाटचाल करायची आहेहे व्यासपीठ निरंतर वर्धिष्णू राहोहा दीप असाच तेवता राहो.