Home बातम्या लो. टिळक आणि सार्वजनिक गणेशोत्सव

लो. टिळक आणि सार्वजनिक गणेशोत्सव

0

– प्रा. दिलीप बेतकेकर

टिळकांच्या स्मरणाशिवाय सार्वजनिक गणेशोत्सव होऊच शकत नाही. माजघरातील गणपती टिळकांनी सार्वजनिक ठिकाणी बसवला आणि आज केवळ महाराष्ट्रातच नाही तर अन्य प्रांतांतही मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने गणरायाची सार्वजनिकरीत्या पूजाअर्चा केली जाते.

१८९३ साली सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रारंभ झाला. सामान्यतः हिंदूंची उपासना वैयक्तिक वा कौटुंबिक पूजाअर्चा अशा स्वरूपाची होती. पण जनतेमध्ये जागृती करण्याच्या उद्देशाने लो. टिळकांनी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवास प्रारंभ केला आणि थोड्याच काळात केसरीतील लेख आणि व्याख्यानांद्वारे महाराष्ट्रात सर्वदूर लोकप्रिय केला. प्राचीन ग्रीसमधल्या ऑलिंपिक क्रीडामहोत्सवाचे आणि इतर देशांतल्या अशा महोत्सवांचे दाखले देत लोकांना गणेशोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन लो. टिळक करत असत.

काही मंडळींनी टिळकांच्या या कल्पनेचा उपहास केला. काहींनी तर गणपतीची मिरवणूक म्हणजे मुसलमानांच्या ताबुतांची नक्कल असेही म्हटले. अर्थात या टीकाकारांना लो. टिळकांनी आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या भजनी मेळ्यांची आठवण करून दिली. ‘‘मेलेल्या राष्ट्राचे पुनरुज्जीवन करण्यास धार्मिक उत्सवांचा फार उपयोग होतो व जिवंत राष्ट्रांना हे उत्सव म्हातारपणापासून निर्भय ठेवतात,’’ अशा शब्दांत उत्सवाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. धार्मिक चिंतन आणि भक्ती एकांतवासातही साधत असतील. तरीही जनतेत जागृती करण्याच्या दृष्टीने देखावा आणि थाटमाट यांनाही महत्त्व असतेच याचे भान लो. टिळकांना होतेच.

उत्सव मुख्यतः धार्मिक आणि सामाजिक स्वरूपाचा असला तरी त्याचा राजकीय फायदा उठवण्याचाही एक उद्देश होताच. तो त्यांनी लपवलाही नाही. ते म्हणतात, ‘‘ख्रिस्ती धर्मगुरू विवाद्य राजकीय समस्यांचा उल्लेख धार्मिक व्यासपीठावरून करू शकतात, हे माहीत असूनही भोवतालच्या राजकीय परिस्थितीविषयी दोनचार गोष्टी बोलण्याची बंदी का घालावी हे आम्हाला कळत नाही. धर्माच्या कक्षेत चपखल न बसणार्‍या एखाद्या विषयावरची गीते आम्ही हुडकून काढली तर त्यात तात्विकदृष्ट्या अर्थातच फारशी चूक नाही हे उघड आहे. निःसंशय धार्मिक स्वरूप असलेला हा उत्सव राजकीय शिक्षण देण्यासाठी घेतलेले अवगुठन आहे असे म्हणून झोड उठवणे शहाणपणाचे नव्हे.’’

लोकांमध्ये ऐक्यभावना रुजविण्यासाठी उत्सव खूप महत्त्वाचे हे त्यांनी नेमकेपणाने हेरले होते. ते एक उत्तम साधन आहे याची त्यांना जाण होती. एके ठिकाणी ते लिहितात- ‘‘राष्ट्राच्या अभ्युदयाकरिता असे उत्सव असणे जरूर आहे, असे कोणासही वाटल्यावाचून राहणार नाही. कोणत्याही लोकांत ऐक्याची वृद्धी होण्यास जी अनेक साधने असतात त्यांपैकीच एक उपास्यदैवत असणे हे एक कारण आहे… एका प्रांतातच का होईना, पण वर्षातून दहा दिवस तरी एकाच देवतेच्या भजन-पूजनात लोक निमग्न झाल्याने त्यांच्यात ऐक्याची वृद्धी होणार नाही असे कोण म्हणेल?’’

अशा उत्सवासाठी खर्च होणारच. त्यासंबंधी ते म्हणतात, ‘‘आठ-दहा दिवस उत्साहाने जर काढता येत नाहीत व त्या उत्सवाप्रीत्यर्थ थोडकेसे द्रव्य खर्चण्याचे जर सामर्थ्य नाही, तर ते राष्ट्र जिवंत असून मेल्यासारखेच आहे. या गोष्टीला उधळपट्टी म्हणणारे म्हणोत; पण कष्टमय संसाराची यात्रा सुखाची व शांतीची होण्यास असले खर्च आवश्यक आहेत.’’

गणेशोत्सवाच्या निमित्ताने व्याख्याने, कीर्तने, प्रवचने होत असत. नाटकाचे प्रयोगही सादर केले जात असत. अत्यंत खुशीने लोकजागृतीसाठी आणि इंग्रजांचे अन्याय, अत्याचार लोकांसमोर ठेवण्यासाठी याचा उपयोग होत असे. शासनकर्त्या इंग्रजांनाही याची कल्पना येऊ लागली. हे उत्सव म्हणजे केवळ धार्मिक नसून त्यामागे अंतस्थ हेतू वेगळा आहे हे चिरोलसारख्या चाणाक्ष इंग्रजाच्या नजरेतून निसटले नाही. ‘इंडियन अनरेस्ट’ या पुस्तकात व्हॅलेंटाइन चिरोलने लिहिलेय- ‘‘नाटकाचे प्रयोग करायला आणि धार्मिक गाणी गायला या उत्सवामुळे संधी मिळे. या नाटकांतून आणि गाण्यांतून हिंदूंच्या पौरार्णिक कथांचा विदेशी राज्यकर्त्यांविषयीचा द्वेषभाव प्रदीप्त करण्यासाठी मोठ्या कौशल्याने उपयोग केला जातो. म्लेंच्छ ही उपाधी मुसलमान आणि युरोपीयन दोघांनाही सारखीच लागू असे. मुसलमान आणि पोलीस यांच्याशी संघर्ष व्हावा या हेतूनेच वरील उत्सवांतल्या मिरवणुकी योजनापूर्वक आखलेल्या असत. अशा संघर्षातून उद्भवणार्‍या खटल्यांमुळे निषेधाचा गदारोळ उडवून बचावासाठी ज्वलजहाल व्याख्याने द्यायला निमित्त सापडे. टिळकांच्या प्रचाराचे क्षेत्र गणेशोत्सवाबरोबरच विस्तारत गेले.’’

गणराय हे सर्वांचेच लाडके दैवत. त्याच्या स्वागतासाठी लहानथोर सर्वच आसुसलेले असतात. मोठ्या उत्साहाने सर्व कुटुंब तयारीला लागते. त्याच्या सान्निध्यात दिवस कसे निघून जातात कळतच नाही. आणि मग विसर्जनाचा दिवस येतो. विसर्जनाची मिरवणूक निघते. १८९९ साली गणपती विसर्जनाची मिरवणूक निघाली होती. टिळक मिरवणुकीत चालत होते. रस्त्यावर एक मुलगा मोठ्याने रडत होता. ‘‘बाळ, काय झालं?’’ टिळकांनी विचारले. ‘‘माझा गणपती मिरवणुकीतून का नाही न्यायचा?’’ त्या मुलाने रडवेल्या स्वरात विचारले. मुलगा अस्पृश्य होता. टिळकांनी त्याचा गणपती पालखित आपल्या गणपतीजवळ ठेवला व त्या मुलाचा हात धरून मिरवणुकीत आपल्याबरोबर नेले. १९०७ च्या गणेशोत्सवात पुण्यात शुक्रवार पेठेतल्या व्याख्यानात ते म्हणाले, ‘‘पुुरुषसुक्तात वर्णन केल्याप्रमाणे जर राष्ट्रपुरुष हा एक-देहधारी पुरुष आहे, तर अंत्यज म्हणजे पाय याचा जर वरच्या हाताला स्पर्श झाला, तर तो वरचा भाग विटाळला असे कोणालाही म्हणता येणार नाही.’’

या उत्सवाच्या निमित्ताने होणार्‍या कीर्तन-प्रवचनासारख्या समाजप्रबोधनात्मक कार्यक्रमातून राम-कृष्ण यांची चरित्रे मांडली जात असत. पण त्यासंबंधी लो. टिळकांची एक वेगळी दृष्टी होती. वाईचे सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार डॉ. दत्तात्रय विनायक पटवर्धन यांनी एक आठवण सांगितली. श्रीरामनवमीच्या उत्सवासाठी ते पुण्यात गेले होते. ते लोकमान्यांच्या दर्शनासाठी केसरी वाड्यात गेले. टिळकांनी त्यांना विचारले, ‘‘बुवा, श्रीरामचरित्र कीर्तनात तुम्ही काय सांगता?’’ आणि पुढे म्हणाले, ‘‘राम देव होता असे सांगत जाऊ नका. कारण श्रीरामाचे चरित्र अत्यंत यत्नप्रधान आहे. आमच्या लोकांना राम, कृष्ण हे देव होते, आम्ही पामर. आमच्या हातून काय होणार? असे म्हणण्याची सवय अनेक जन्म हाडीमांसी खिळून गेली आहे. पण ही दुर्बल विचारसरणी राष्ट्राचा घात करते; म्हणून श्रीरामचंद्रांचे चरित्ररहस्य ‘यत्न तोचि देव’ अशीच रामदासस्वामींची शिकवणूक आहे असेच नेहमी प्रतिपादित जावे.’’

गणपती विसर्जन करून परतल्यावर घरातल्या रिकाम्या मखराकडे बघवत नाही. एक प्रकारची खिन्नता मनात दाटून येते असा बर्‍याच जणांचा अनुभव. एकदा टिळकही गणपती विसर्जन करून घरी परतले. भोजन करून ते आरामखुर्चीत विसावले होते. इतक्यात प्रो. कौशाम्बी त्यांच्याकडे आले. त्यांनी चर्चेसाठी काही तात्त्विक विषय काढले. एरवी चर्चेमध्ये आनंदाने भाग घेणारे टिळक फार उत्सुक दिसले नाहीत. प्रो. कौशाम्बींच्या लक्षात आल्यावर त्यांनी विचारले, ‘‘आज आपली प्रकृती बरी नाही का?’’ तर चटकन लोकमान्य म्हणाले, ‘‘छे, तसं काही नाही. माझी प्रकृती ठीक आहे. पण गणपती विसर्जन करून मी घरी आल्यावर मला नेहमीच असे चुकल्याचुकल्यासारखे होते. चैन पडत नाही. यामुळे मनास थोडी अस्वस्थता आली आहे.’’

कौशाम्बी आश्‍चर्याने म्हणाले, ‘‘एकूण आपल्यासारख्या ज्ञानी पुरुषावरही अशा लौकिक गोष्टीचा परिणाम होतोच म्हणायचा!’’ लोकमान्य म्हणाले, ‘‘अहो, संस्कारांचा परिणाम हा. काही नाही म्हटले तरी कोणावरही थोडा तरी व्हावयाचाच. शिवाय भक्तीच्या पोटातून निघालेले ज्ञान हेही अखेर भक्तीतच विलीन झाल्याशिवाय झाल्यास तीही एक आनंदाची अवस्था आहे, हे सूक्ष्म विचारांती तुमच्याही लक्षात येईल.’’

सार्वजनिक गणेशोत्सवामागचा हेतू विसरून तो साजरा करणारे एका टोकाला तर असे उत्सव म्हणजे श्रम, धन आणि वेळ यांचा अपव्यय असे मानणारे दुसर्‍या टोकाला असे चित्र आज पाहायला मिळते. पण लो. टिळकांनी या उत्सवाच्या मर्मावर बोट ठेवले होते. १ एप्रिल १९०१ च्या अग्रलेखात ते लिहितात- ‘हे उत्सव काही सद्यःफलप्राप्ती मिळविण्याकरिता करीत नसतात. वैद्यकशास्त्रातील दृष्टांत घ्यावयाचा असल्यास असल्या उत्सवाची गणना ताप, खोकला, दमा वगैरे रोगांवरील औषधात न करता सामान्य आयुर्वर्धक किंवा शक्तिवर्धक उपायात करावी लागेल. राष्ट्रात अशा प्रकारचे जितके उत्सव असतील तितके चांगले.’

ही दृष्टी घेऊन सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची शक्ती, बुद्धी आणि प्रेरणा आम्हाला गणरायाने द्यावी हीच प्रार्थना!