डॉ. राममनोहर लोहिया आणि गोव्यातील चिंचणी गावचे डॉ. ज्युलियांव मिनेझिस एकमेकांना युरोपमध्ये भेटले होते व विचारांची तार एकमेकांशी जुळल्यामुळे मित्र झाले होते. जसे ब्रिटिशांविरुद्ध डॉ. लोहिया चळवळी करीत होते, तसेच डॉ. मिनेझिस पोर्तुगीज राजवटीविरुद्ध गोव्यामध्ये क्रियाशील होते. डॉ. लोहिया हे आधुनिक समाजशास्त्राचे डॉक्टर तर डॉ. मिनेझिस बहुतेक मेडिकलमधील डॉक्टर. दोघांनाही स्वातंत्र्य, समता, व्यक्तिस्वातंत्र्यावर निर्बंध नको होते. दोघे जवळचे मित्र व्हावयास हेच कारण होते.
१९४२ च्या क्वीट इंडिया चळवळीने भारत देश हादरून गेला होता. देशभरचा उद्रेक पाहून स्वातंत्र्य देण्याचा पक्का विचार इंग्रजांनी बोलून दाखविला होता. मोर्चा, प्रभातफेर्या, संघटनेसाठी सातत्याचा प्रवास, अनेकदा ब्रिटिशांनी त्यांना घडविलेला तुरुंगवास यामुळे डॉ. लोहियांची प्रकृती बिघडत असे. विश्रांती घ्यावयास व वेळ पडल्यास झटकन आपल्या देशामध्ये परतण्यास त्यांना गोवा हे ठिकाण फारच सोयीचे वाटले. दोन-तीन आठवडे विश्रांती घ्यावी म्हणून डॉ. लोहिया चिंचणी मुक्कामी १९४६ मध्ये आले. दोन-चार दिवसच विश्रांती घेतात न घेतात, तोच गोव्यातील चळवळ्या लोकांनी त्यांना भेटावयास धाव घेतली. गोवा मुक्त व्हावा व भारताप्रमाणे या भूमीमध्ये स्वातंत्र्य चळवळ सुरू व्हावी हा भेट घेणार्यांचा उद्देश होता.
गोव्याची वस्तुस्थिती ऐकून लोहियांची झोपच उडाली आणि त्यांनी लोकांना नागरी स्वातंत्र्य असावे म्हणून जाहीर सभा घेण्याचे ठरविले. आज लोहिया मैदान म्हटले जात असलेल्या जागी ती इतिहासप्रसिद्ध सभा झाली होती. त्यावेळी लोक कसे जमले, पोलिसांनी कसा अटकाव केला, पोलीस अधिकारी मिरांडा यांचा पिस्तूल घेतलेला हात शांतपणे डॉ. लोहियांनी कसा बाजूला केला या गोष्टी अनेक स्वातंत्र्यसैनिक १८ जून रोजी इतरांना सांगत असतात. आमच्यासारख्यांना आता त्यामध्ये काही नावीन्य राहिलेले नाही. पन्नास वर्षें ऐकतो आहोत, परंतु शाळा-कॉलेजातून मात्र त्या कथा सांगावयास हव्यात. गोव्याचा इतिहास वाढत्या वयाच्या विद्यार्थ्यांना माहीत नसणे हे शैक्षणिक अधोगतीचे लक्षण ठरेल.
१८ जूनचा कार्यक्रम प्रचलित सरकार शुष्क मनाने साजरा करणार, कारण स्वातंत्र्याबद्दल सरकारला चिंता नसते, नव्हतीही. चिंता सरकारला असते ती विकासाची. त्यामुळे खिसे गरम होत असतात. ज्या मूल्यांसाठी डॉ. लोहिया व डॉ. मिनेझिस लढत होते, ती मूल्ये आज समाज विसरत चालला आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर स्वातंत्र्यसैनिकही त्यांना जणू विसरले आहेत.
काही स्वातंत्र्यसैनिक आजही डॉ. लोहिया आपल्या घराच्या मागे राहत होते व आपण त्यांना पूर्ण ओळखत होतो अशा आवेशात भाषणे करतात. सांगणार्याचे वय असते ७५/७७ वर्षांचे. म्हणजे डॉ. लोहिया आले तेव्हा ते १४-१५ वर्षांचे होते. दळणवळणाच्या सोयी नव्हत्या. पूल स्वप्नातही नव्हते. पणजी – म्हापसा – पेडण्याहून मडगावला जाणे आश्चर्य होते. तरीही आम्ही स्वतः डॉ. लोहियांना बोलताना ऐकले, अशी सरळ फेकाफेकी करण्यात काही स्वातंत्र्यसैनिक मागेपुढे पहात नाहीत.
डॉ. ज्युलिओ मिनेझिसांच्या घरी आलेल्या गोंयकारांनी सामाजिक व्यथा, अडचणी लोहियांना कथन केल्या. डॉ. लोहिया म्हणजे ज्वालामुखी! नागरिकांची होणारी घुसमट ऐकून डॉ. लोहियांचे रक्त सळसळले. आपण विश्रांतीसाठी आलो आहोत, हेही ते विसरले. १८ जून रोजी आपण जाहीर सभा घेऊन नागरी स्वातंत्र्याची चळवळ सुरू करूया असे त्यांनी आलेल्या मंडळींना सांगितले. कार्यकर्ते म्हणून आलेले लगेच मिळेल त्याच्या कानी हा निर्णय सांगू लागले. पणजी, वास्कोपर्यंत संदेश पोचले. मडगाव व आजूबाजूला लोक उत्साहित होऊन १८ जूनची वाट पाहत राहिले. ठरलेल्या वेळी डॉ. लोहिया आले. तडक व्यासपीठाकडे जाऊ लागले. ठरल्याप्रमाणे पोलिसांनी त्यांना अडविले. पिस्तूल घेऊन मिरांडा साहेब हुकूम सोडत होता. अजिबात विचलित न होता डॉ. लोहिया त्यास शांतपणे म्हणाले, ‘‘थोडा विवेक असू द्या. एवढा जमाव शांत आहे, त्यांना चीड येईल असे वागू नका’’. असे म्हणून आपल्या हाताने डॉ. लोहियांनी त्या पोलीस अधिकार्याचा हात सहजपणे पिस्तुलासह खाली केला. पाहणार्यांसाठी तो ऐतिहासिक प्रसंग होता. सर्वांच्या अंगावर रोमांच उभे राहिले होते. डॉ. लोहियांनी आपले भाषण संपविले आणि कोणतीही वाईट घटना न घडता तो प्रसंग संपला. दोन्ही डॉक्टरांना अटक करून मडगाव पोलीस ठाण्यात नेण्यात आल्यावर लोक बिथरले. जमावातील लोक पोलीस स्टेशनसमोर घोषणा देत राहिले. लोक निर्भय झाले होते. स्वातंत्र्याची ज्योत त्यांच्या हृदयात प्रखर प्रज्वलित होत होती. पोलीस घाबरले व त्यांनी डॉ. लोहिया व डॉ. मिनेझिस यांना पणजी पोलीस कार्यालयात नेऊन प्रक्षोभक जमावाकडून स्वतःची सुटका करून घेतली. पुढे १९ जूनला दुपारी ४ वा. डॉ. लोहिया व डॉ. मिनेझिस यांची सुटका झाली. २१ जून रोजी डॉ. लोहियांना भारतीय हद्दीमध्ये पोलिसांनी आणून सोडले.
१८ जूनच्या त्या ऐतिहासिक प्रसंगावर बोलल्यानंतर काही स्वातंत्र्यसैनिक म्हणतात की पं. नेहरूंमुळे गोव्याला आणखी १४ वर्षे स्वातंत्र्यासाठी वाट पहावी लागली. नाही तर भारताबरोबर गोवाही १९४७ साली स्वतंत्र झाला असता. असे विधान येथील स्वातंत्र्यसैनिक का करतात? हा खोडसाळ आरोप होय असे मी म्हणतो. तसा कोणता इतिहासाचा पुरावा त्यांच्यापाशी आहे? डॉ. लोहिया वैतागाने म्हणायचे, नेहरूंनी आता गोव्यासंबंधी का थांबावे? डॉ. लोहिया सैन्य पाठवून गोवा स्वतंत्र करण्याच्या बाजूने मुळीच नव्हते. त्यांचा लोकशाहीवर नितांत विश्वास होता. समाजवाद आणि लोकशाही या दोन विचारांवर डॉ. लोहियांचे जीवन उभे होते. त्यांना झटकन चळवळी उभारायच्या होत्या. त्याचवेळी देशाबरोबर गोवाही मुक्त व्हावा असे त्यांना वाटत होते. गोव्यामध्ये जेव्हा २९ सप्टेंबर १९४६ मध्ये दुसर्या वेळी पकडले गेले त्यावेळी पोर्तुगीज सत्ताधीशांनी त्यांना फार वाईट वागणूक दिली. हवा नाही आणि काळोख अशा कोठडीमध्ये डॉ. लोहियांना दहा दिवस कोंडण्यात आले होते. नंतर आग्वाद व इतर ठिकाणी ठेवून भारतीय नेत्यांशी पत्रव्यवहार करायलाही त्यांच्यावर बंदी घालण्यात आली होती. गांधीजींना हे वृत्त समजताच संताप आला व त्यांनी व्हॉइसरॉय व आंतरराष्ट्रीय नेत्यांना डॉ. लोहियांची सुटका करण्यासाठी अनेक वेळा विनंती केली. नेहरुंना त्याच दरम्यान काश्मीर प्रश्नी ब्रिटिशांनी अटक केली होती. त्यावेळीच काश्मीर भारताच्या हातून निसटला असता. नेहरुंचे जन्मगाव काश्मीर – परिणामी त्यांना काश्मीरचे आकर्षण होतेच. गांधीजी जरी नेतृत्व करीत होते, तरी प्रत्यक्ष कृती कार्यक्रम नेहरुंच्या पुढाकारानेच होत होते. लोहियांना गोवा मुक्तीबद्दल प्रेम होते, तसेच काश्मीर भारताबाहेर जाऊ न देण्यासाठी नेहरूंचा जीव तगमगत होता. त्यासाठी केलेल्या आंदोलनामुळे नेहरूंना तुरुंगात जावे लागले.(हा इतिहास आत्ताच्या केंद्र व राज्य सरकार व त्यांच्या खुषमस्कर्यांना माहीतही नाही) नेहरूंना डॉ. लोहियांची सुटका करण्याकडे खास लक्ष देता आले नाही. परंतु गांधीजींनी मात्र जे शक्य ते केले. परिणामी डॉ. लोहियांना बेळगावी आणून सोडण्यात आले.
देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात नेहरूंचे थोरपण डॉ. लोहियांना पूर्ण माहीत होते व डॉ. लोहियांची बौद्धिक चमक व त्यांचा मोठेपणा नेहरूंनाही पूर्णपणे माहीत होता. दोघेही कॉंग्रेसचे कर्तृत्ववान नेते होते. दोघांचीही लोकशाही आणि समाजवाद यांवर नितांत श्रद्धा होती. वैतागाने एकदा लोहिया म्हणाले होते ‘जवाहरलालला गोवा सीमेवर सत्याग्रहींना बंदी करण्याची गरज नव्हती. नाही तर असंख्य सत्याग्रहींनी गोव्यात घुसून पोर्तुगिजांना स्वातंत्र्य देण्यास भाग पाडले असते’. १९४६ साली दुसरे महायुद्ध नुकतेच सरत आले होते. युनोची स्थापना होऊन राष्ट्रे कशी चालवावीत याची मार्गदर्शक तत्त्वे नक्की झाली होती. नेहरू पंतप्रधान म्हणून त्यांना ती तत्त्वे झिडकारता येणे शक्य नव्हते. (भाजपा-संघ नेत्यांना आता आंतरराष्ट्रीय प्रवाहाची दखल घ्यावी लागतेच ना?) दुसर्याच्या देशात सैन्य पाठवू नका, दंडेलीने शिरकाव करू नका हे युनोचे म्हणणे होते. परिणामी पोर्तुगीज सत्तेचा भाग असलेल्या गोव्यात त्या काळात लगेच सत्याग्रही पाठविणे नेहरूंना त्रासाचे होते. डॉ. लोहियांना गोवा हा भारताचा अविभाज्य भाग असल्यामुळे त्या युनो तत्त्वांना बाजूस ठेवून गोवाही स्वतंत्र करावा असे आग्रहपूर्वक वाटे. त्यावेळचे आंतरराष्ट्रीय प्रवाह समजणे काही स्वातंत्र्यसैनिकांना जड जाते.
डॉ. लोहियांचे देशभक्त म्हणून कार्य व त्यांचे गांधी-नेहरूंशी असलेले संबंध यामुळे वैतागून ‘गोव्याच्या स्वातंत्र्याला नेहरूंमुळे उशीर झाला’, असा शेरा मारला जातो. त्यांच्या उंचीवर जाऊन कोणी नेहरूंना दोष देत असतील तर स्वातंत्र्याचा इतिहासच त्यांना समजला नाही, असे म्हणावे लागेल. ज्यांना हा इतिहास ज्ञात आहे त्या स्वातंत्र्यसैनिकांबद्दल आदर ठेवून हे लिहीत आहे.
इतिहास माहीत असणारे व जुने-जाणते स्वातंत्र्यसैनिक आपल्यातून गेले असल्यामुळे ज्यांना स्वातंत्र्यसैनिक म्हणून मान्यता मिळाली आहे, तेच नेहरूंमुळे १४ वर्षे गोव्याला स्वातंत्र्य मिळण्यास उशीर झाला अशी शेरेबाजी करतात. इतिहास माहीत असणार्या हयात व बुजुर्ग स्वातंत्र्यसैनिकांनी त्यांना आवरावयास हवे.
सरकारला अशा ऐतिहासिक दिनी काय घडले हे माहीत नसते. त्याची दृष्टी फक्त खुर्चीकडे लागलेली असते. परंतु आज हयात असलेल्या, तुरुंगवास भोगलेल्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांच्या नेहरू व लोहियांमध्ये गोव्याबद्दल मतभेद होते या कल्पनेला थारा देता कामा नये, असे मला वाटते. आपल्या देशाचे स्वातंत्र्य व आंतरराष्ट्रीय दुसर्या महायुद्ध काळातील वातावरण यामुळे १४ वर्षे अधिक काळ लागला. अखेर नेहरूंनीच भारतीय लष्कर आणून पोर्तुगीज सत्तेला गोव्यातून हद्दपार केले.

