भरारी पथकाची कामगिरी
कारवट लोटली येथील सॅबी वाज यांच्या घरावर उपजिल्हाधिकारी रेडकर यांच्या भरारी पथकाने धाड घालून २० पाण्याच्या टाक्या जप्त केल्या. आचारसंहिता चालू असताना मतदारांना खूष करण्यासाठी टाक्या वाटत असल्याची तक्रार केल्यानंतर ही कारवाई झाल्याचे कळते.
यावेळी सॅबी व तेथील गावच्या लोकांनी उपजिल्हाधिकारी रेडकर व संयुक्त मामलेदारांना तीव्र विरोध केला. आम्ही निवडणुकीसाठी टाक्या आणल्या नसून वारंवार पाणी पुरवठा खंडित होत असल्याने लोकांनी आपल्या खिशातील पैसे खर्च करून टाक्या खरेदी केल्याचे सांगितले व त्यावेळी तणाव निर्माण झाला. त्या लोकांकडे टाक्या खरेदी केल्याच्या पावत्या होत्या. तणाव झाल्यानंतर तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले. सध्या टाक्या भरारी पथकाने जप्त केल्या असून, तपास चालू आहे.
५० हजारांची फेणी धारगळ येथे जप्त
पेडणे अबकारी विभागाने आरोबा धारगळ येथील नंदा चोपडेकर यांच्या मालकीच्या गोदामावर छापा टाकून ५० हजार रु.ची काजू फेणी काल जप्त केली.
पेडणे अबकारी विभागाचे निरीक्षक राजेश नाईक यांनी माहिती दिली की, पेडण्याचे मामलेदार श्री. गावस यांच्याकडे तक्रार आली होती की आरोबा येथे मोठ्या प्रमाणात बेकायदा दारूचा साठा आहे. त्यानुसार फिरते पथक व अबकारी विभागाने आरोबा – धारगळ येथील त्या गोदामावर छापा टाकून फेणी जप्त करून गुन्हा नोंदवला आहे.
३३ कॅनमधून प्रत्येकी ३५ लीटर, ३ कॅनमधून ४५ लीटर, ३ मोठी बॅरल प्रत्येकी २०० लीटर एवढी काजू फेणी जप्त केली आहे.