पाचजण गंभीर जखमी, जखमींना केले गोमेकॉत दाखल
विजय मरीन शिपयार्डमधील घटना, वेल्डिंग काम सुरू असताना स्फोट
रासई लोटली येथील विजय मरीन शिपयार्ड या जहाज बांधणीचे काम करताना भयंकर स्फोट होऊन दोन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेत पाच कामगार आगीत होरपळून गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना काल शुक्रवारी दि. 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7:30 च्या दरम्यान घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
या घटनेत सापडलेले सातही कामगार हे रोजंदारीवर काम करीत होते. या घटनेत जखमी झालेल्या पाच जणांपैकी चौघांची नावे मिळाली असून या जखमी झालेल्यांमध्ये अभिषेक कुमार (25, बिहार), मनीष चव्हाण (27, उत्तर प्रदेश), संतोष कुमार (27, उत्तर प्रदेश), मोहंमद बबलू (27, उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे. मृत्यूमुखी पडलेल्या दोन कामगार व जखमी झालेल्या एकाची माहिती मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
रासई लोटली येथील विजय मरीन शिपयार्ड या जहाजात वेल्डिंगचे काम सुरू होते. यावेळी अचानक ही आग लागल्याची माहिती पोलिसांनी दिली. हे काम सुरू असताना इलेक्ट्रिकल यंत्रणा जाळून स्फोट झाला.
या घटनेमुळे या शिपयार्डमध्ये काम करणारे इतर कर्मचारी घाबरून गेले आहेत.
वेल्डिंगचे काम सुरु असताना हा स्फोट झाला. त्यावेळी सूरक्षिततेची कोणतीही उपाययोजना त्याच्याकडे नव्हती . व्यवस्थापनाने कामगारांना सुरक्षेची उपकरणे न दिल्याने हे कामगार आगीत होरपळले. या कामगारांच्या मृत्यूला पर्यवेक्षक व व्यवस्थापक जबाबदार असल्याचे पोलिसांनी प्रथमदर्शनी तपासात दिसून आल्याचे सांगितले. व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे गरीब कामगारांना प्राण गमवावे लागले.
14 कामगारांना वाचवले
या घटनेची माहिती मिळताच वेर्णा अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी 14 कामगारांना बाहेर काढले. त्यामुळे ते सुखरूप बचावले. तरीही आत जाण्यास जहाजावरील पर्यवेक्षकांना वाट मोकळी करून दिली नाही असे दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जखमींना आधी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल केले पण प्रकृती गंभीर असल्याने त्यांना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल केले. यावेळी उपचार सुरू असताना दोन कामगारांचा मृत्यू झाला तर इतर पाच कामगारांची प्रकृती गंभीर आहे असे पोलिसांनी सांगितले.

