>> उत्तर गोव्यात 76.54 टक्के, तर दक्षिण गोव्यात 73.90 टक्के मतदानाची नोंद; ग्रामीण भागांतील मतदारांत दिसला उत्साह; शहरी भागांत निरुत्साह
राज्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी काल एकूण 75.20 टक्के मतदान झाले. उत्तर गोवा मतदारसंघात 76.54 टक्के, तर दक्षिण गोवा मतदारसंघात 73.90 टक्के मतदानाची नोंद झाली. गत 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळेस कमी मतदानाची नोंद झाली. ग्रामीण भागांत मोठ्या संख्येने मतदार बाहेर पडल्याने चांगल्या मतदानाची नोंद झाली, तर शहरी भागांत मतदानाचे प्रमाण कमी नोंद झाले. राज्यभरात मतदान शांततेत पार पडले. काही किरकोळ घटना वगळता कोणताही मोठा अनुचित प्रकार घडल्याची नोंद नव्हती. दोन्ही जागांवर प्रत्येकी 8 उमेदवार निवडणूक रिंगणात होते, त्यांचे भवितव्य काल ईव्हीएममध्ये सीलबंद झाले. दरम्यान, भाजप व काँग्रेस या पक्षांनी दोन्ही जागांवर आपलाच विजय होणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता उमेदवार आणि मतदारांना 4 जूनच्या निकालाची उत्कंठा लागली आहे.
राज्यातील दोन्ही मतदारसंघांत सकाळी 7 वाजता मतदानाला प्रारंभ झाला. सुरुवातीला मतदान संथगतीने सुरू होते. सकाळी 9 वाजल्यानंतर मतदानाला हळूहळू गती प्राप्त झाली. मतदानाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस गस्त सुरू होती. राज्यातील मतदारांना मतदान करताना उष्णतेच्या समस्येला तोंड द्यायला लागू नये म्हणून मतदार केंद्रांमध्ये कुलरची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच, मतदारांना शीतपेय, लिंबू पाणी, कोकम सरब उपलब्ध करण्यात आले होते. राज्यातील काही मतदान केंद्रांना पर्यावरणपूरक साज देण्यात आला होता. आमोण येथील मतदान केंद्रावर माटोळी बांधण्यात आली होती. महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून पिंक मतदान केंद्रावरील व्यवस्था हाताळण्यात आली. मतदान यंत्रांतील बिघाडाच्या किरकोळ घटना वगळता बहुतांश मतदान केंद्रावर सुरळीत मतदान झाले. सर्व ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान चालले.
उत्तर गोव्यात आमदार दिव्या राणे यांच्या मतदारसंघात सर्वाधिक 87.11 टक्के मतदानाची नोंद झाली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघात 86.5 टक्के मतदानाची नोंद झाली. वाळपई, डिचोली, मये या मतदारसंघात 80 टक्क्यांच्या आसपास मतदानाची नोंद झाली. पेडणे तालुक्यातील मांद्रे आणि पेडणे या दोन मतदारसंघांत जवळपास 75 टक्के मतदानाची नोंद झाली. बार्देशातील म्हापसा, थिवी, शिवोली, साळगाव, पर्वरी, हळदोणा या मतदारसंघात 70 टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद झाली. तिसवाडी तालुक्यात कमी मतदानाची नोंद झाली. तिसवाडीतील पणजी, ताळगाव, सांताक्रूझ, सांतआद्रे, कुंभारजुवा या मतदारसंघांत 70 टक्क्यांच्या आसपास मतदान झाले. प्रियोळात 75 टक्के मतदान झाले.
दक्षिण गोवा मतदारसंघात केपे, सावर्डे, सांगे, काणकोण या भागात 75 टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद झाली. फोंडा तालुक्यातील फोंडा, शिरोडा आणि मडकई मतदारसंघात 75 टक्क्यांच्या वर मतदान झाले. मुरगाव तालुक्यातील वास्को, दाबोळी, मुरगाव या मतदारसंघात 70 टक्क्यांच्या आसपास मतदान झाले. सासष्टी तालुक्यातील मडगाव, बाणावली, नावेली, कुंकळ्ळी, वेळ्ळी, फातोर्डा, कुडतरी आणि नुवे या मतदारसंघात 67 ते 70 टक्क्यांच्या आसपास मतदान झाले.
मतदानानंतर मुख्यमंत्री काय म्हणाले?
मतदानानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील मतदारांचे आभार मानले आहेत. गोव्यातील मतदारांनी विकसित भारत, विकसित गोव्यासाठी मतदान केल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. राज्यात उष्णता वाढलेली असताना मतदारांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडून लोकशाहीच्या उत्सवात सहभाग घेतला. देशात लोकसभेसाठी आत्तापर्यंत 72 टक्के सर्वाधिक मतदानाची नोंद झाली होती. काल तिसऱ्या टप्प्यात गोव्याने सर्वाधिक 75 टक्के मतदानाची नोंद केली, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर घरी जाऊन हात धुतल्यानंतर बोटावर लावलेली शाई पुसली, अशी तक्रार काही मतदारांकडून करण्यात आली. सोशल मीडियावर याबाबतचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. त्यामुळे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी या प्रकरणी चौकशी केली. त्यानंतर सदर तक्रारीत कुठल्याही प्रकारचे तथ्य नसल्याचा खुलासा जिल्हा निवडणूक यंत्रणेने केला. मतदान करणाऱ्या मतदारांच्या बोटाला लावण्यात आलेली शाई दर्जेदार आणि दीर्घकाळ टिकणारी आहे, असे स्पष्टीकरण निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले.
मतदानानंतर सर्वेक्षण
कॉलमुळे मतदार हैराण
1 जूनला शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे कल (एक्झिट पोल) जाहीर होणार आहेत. त्यासाठी आतापासूनच या वृत्तवाहिन्या व संस्थांनी विविध मतदारसंघांतून कोण निवडून येणार याचा कल जाणून घेण्यास सुरुवात केली असून, त्यांनी मतदारांना फोन करून भंडावून सोडले आहे. काल गोव्यातील दोन्ही जागांवरील मतदान पार पडल्यानंतर त्या ठिकाणी कोणत्या पक्षाचा उमेदवार विजयी होणार हे जाणून घेण्यासाठी या विविध वृत्तवाहिन्या व संस्थांनी मतदारांना दिवसभरात अनेक फोन करून हैराण केले.
साळजिणीतील केंद्र क्र. 43 वर 100 टक्के मतदान
सांगेतील साळजिणी या डोंगराळ भागातील मतदान केंद्र क्र. 43 वर काल 100 टक्के मतदानाची नोंद झाली. साळजिणी हा गाव कर्नाटकच्या सीमेला लागून आहे. या मतदान केंद्रात सर्वच्या सर्व म्हणजे 190 मतदारांनी मतदान केले.
काँग्रेस नेत्यांनी कधी व कुठे मतदान केले?
काँग्रेस पक्षाचे उत्तर गोव्याचे उमेदवार ॲड्. रमाकांत खलप यांनी सकाळी 8.30 वाजता सेंट मेरीज स्कूल, आल्तिनो म्हापसा येथील मतदान केंद्रावर मतदान केले.
काँग्रेस पक्षाचे दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी सकाळी 8 वाजता रेजिना मूंडी स्कूल, चिखली येथे मतदान केले.
गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी सकाळी 8 वाजता कुडचडे रवींद्र भवन येथील मतदान केंद्रावर मतदान केले.
गोव्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सकाळी 9 वाजता केगदीकट्टो, कुंकळ्ळी येथील सरकारी प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर मतदान केले.
भाजप नेत्यांनी कधी व कुठे मतदान केले?
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सकाळी 8.30 वाजता कोठंबी येथील मतदान केंद्र क्रमांक 47 येथे मतदान केले.
प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी थिवी मतदारसंघातील पिर्ण येथील मतदान केंद्र क्रमांक 20 वर सकाळी 8.30 वा. मतदान केले.
भाजपचे उत्तर गोव्याचे उमेदवार श्रीपाद नाईक यांनी पणजी मतदारसंघातील सांपेंद्रू-रायबंदर येथील मतदान क्रमांक 1 वर मतदान केले.
भाजपच्या दक्षिण गोव्याच्या उमेदवार पल्लवी धेंपो यांनी पणजी मतदारसंघातील आल्तिनो येथील मतदान केंद्र क्रमांक 15 वर सकाळी 7.45 वाजता मतदान केले.