लोकसभेत सोनिया गांधी-स्मृती इराणी आमनेसामने

0
12

>> कॉग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्या राष्ट्रपतींबद्दलच्या वक्तव्यानंतर वाद

कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याने भाजपने काल लोकसभेत आक्रमक भूमिका घेतली. स्मृती इराणी यांनी लोकसभेत कॉंग्रेसवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर देखील टीका केली. लोकसभेत झालेल्या गदारोळानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. त्यानंतर लोकसभेत सोनिया गांधी आणि स्मृती इराणी आमनेसामने आल्या. मात्र सोनिया गांधी यांनी स्मृती इराणीना ‘तुम्ही माझ्याशी बोलू नका’, असे सुनावले असा दावा भाजपने केला आहे.

अधीर रंजन चौधरी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना राष्ट्रपतींचा उल्लेख ‘राष्ट्रपत्नी’ असा केला. आणि त्यावरुन सत्ताधारी भाजपने काल संपूर्ण सभागृह दणाणून सोडले. वातावरण इतके पेटले की, थेट सोनिया गांधींच्याच माफीची मागणी भाजपने केली. या मुद्यावरुन संसदेत गदारोळ झाल्यानंतर सभागृह तहकूब करण्यात आले. त्यानंतरही एक नाट्य घडले. सोनिया गांधी यांनी एक अनोखे पाऊल उचलले आणि जे भाजप खासदार निदर्शने करत होते, त्यांच्या बाजूला त्या गेल्या. आणि तिथे त्यांनी भाजपच्या खासदार रमा देवी यांना ‘माझे नाव यात का ओढले जाते आहे?’असा सवाल केला. शेजारीच स्मृती इराणीही होत्या. त्यांनी त्यावेळी बोलायचा प्रयत्न केला. स्मृती इराणी यांनी ‘मी तुमचे नाव घेतले’ असे सोनिया गांधी यांना सांगितले. त्यावर सोनिया गांधींनी ‘डोन्ट टॉक टू मी’ असे म्हटल्याचा भाजपचा दावा आहे. या वादानंतर अखेर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मध्यस्ती करत वाद मिटवला.