आजच्या टप्प्यात नंदन निलेकणी, मनेका गांधी, माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा, केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली, श्रीकांत जेना, सुप्रिया सुळे, लालूंच्या कन्या मीसा भारती हे काही नावाजते चेहरे मतदारांना सामोरे जातील. आजच्या टप्प्यात १७६९ उमेदवार रिंगणात आहेत तर १२१ मतदारसंघांत १६.६१ नोंदणीकृत मतदार आहेत.
आजच्या टप्प्यात कर्नाटकात २८ जागांवर, राजस्थानात २० जागांवर, महाराष्ट्रात १९ जागांवर, उत्तर प्रदेश व उदिशात प्रत्येकी ११ जागांवर, मध्यप्रदेशात १० जागांवर, बिहारमध्ये ७ जागांवर, झारखंडमध्ये ६ जागांवर, पश्चिम बंगालमध्ये ४ जागांवर, छत्तिसगढमध्ये ३ जागांवर तर जम्मू काश्मीरमध्ये आणि मणिपूरमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी निवडणूक होणार आहे.
कर्नाटकात आज निवडणूक होणार असलेल्या २८ जागांपैकी १८ जागा भाजपकडे, ८ कॉंग्रेसकडे आणि १ जनता दल -निधर्मी पक्षाकडे आहे.
महाराष्ट्रात आजच्या टप्प्यातील निवडणुकीत केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, गोपिनाथ मुंडे, शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे तसेच गोव्याला लागून असलेल्या राजापूर मतदारसंघात निलेश राणे या काही महत्त्वाच्या उमेदवारांचा समावेश आहे. आज १९ जागांवर निवडणूक होत आहे त्यापैकी कॉंग्रेसकडे ६, भाजपकडे २, शिवसेनेकडे ४, समाजवादी पार्टीकडे १ जागा आहे तर एका जागेवर अपक्ष आहे. महाराष्ट्रात १९ जागांसाठी ३५८ उमेदवार रिंगणात आहेत.
राजापूर मतदारसंघात आज मतदान
राजापूर मतदारसंघात कॉंग्रेस तिकीटावर निलेश राणे तर शिवसेनेतर्फे विनायक राऊत रिंगणात आहेत.राणे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार असले तरी सावंतवाडीचे राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांनी त्यांच्याविरोधात भूमिका घेतली असून शिवसेनेला पाठिंबा व्यक्त केला आहे. राणेंच्या पाडावासाठी आमदारकीचा त्यागही त्यांनी केला आहे.

