विद्यमान सरकारच्या कार्यपद्धतीविषयी श्री. वाघ सातत्याने अस्वस्थता व्यक्त करीत असून त्यांची पुढची पावले कुठल्या दिशेने पडतात त्याबाबत कुतूहल निर्माण झाले आहे. शैक्षणिक माध्यमाच्या प्रश्नावर विद्यमान सरकारने काहीही केले नाही, अशी टीकाही वाघ यांनी केली. आपला पक्षात कोंडमारा होत असला तरी दुसर्या पक्षात प्रवेश करणे हा त्यासाठी पर्याय नव्हे, असेही श्री. वाघ यांनी स्पष्ट केले. सर्व पक्ष एकाच सारखे असून फक्त ‘लेबले’ वेगळी असतात, असे उद्गार वाघ यांनी काढले.
सरकारकडून कोणत्याही प्रश्नावर आमदारांशी सल्लामसलत होत नाही. केवळ बैठका होतात. महत्त्वाच्या प्रश्नांवर सर्वंकष चर्चा होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. खाण व्यवसाय बंद झाल्यानंतर पर्याय शोधण्याची गरज होती, परंतु सरकारने वेगळ्याच गोष्टींना प्राधान्य दिले असल्याची टीकाही वाघ यांनी केली.
लोकसभा निवडणूक लढवण्याची आपली इच्छा होती. सध्या आपण आपल्या सांत आंद्रे मतदारसंघाकडेच लक्ष केंद्रित केलेले आहे. तेथे पाणी, वीज, रस्ते असे अनेक प्रश्न प्रलंबित असून हे प्रश्न सुटलेले नाहीत अशी खंत वाघ यांनी व्यक्त केली. विकासकामांच्या फायली अडवून ठेवण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोपही वाघ यांनी यावेळी केला. लोकसभा निवडणूक लढविण्यासंदर्भात कोणत्याही पक्षाकडून आपल्याला अद्याप प्रस्ताव आलेला नाही. तो आला तर त्यावर विचार करू असे वाघ यांनी एका प्रश्नावर सांगितले.
…तर तीन हजार कोटी रु. महसूल मिळेल
खाणी बंद पडल्यानंतर पर्यायी आर्थिक स्रोत निर्माण करण्याचा विचार झाला नाही. करमणूक हा उद्योग म्हणून विकसित केला तर वर्षाकाठी तीन हजार कोटी रुपयो उभे करता येऊ शकतील असे ते म्हणाले. धोरणात्मक निर्णयावर सत्ताधारी आमदारांत चर्चा घडवून आणली पाहिजे नुसत्या बैठका घेऊन उपयोग नाही. सनबर्नच्या नावाखाली अनिर्बंध करमणूक चालली आहे, त्याऐवजी आंतरराष्ट्रीय पाश्चात्य संगीताचे स्पर्धात्मक कार्यक्रम करून त्यातून आर्थिक प्राप्तीही करता येऊ शकते. गोवा मनोरंजन सोसायटीच्या अखत्यारित सर्व कार्यक्रम आणले तर महसूल निर्मिती करणे शक्य असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, अद्याप आपल्याला मनोरंजन संस्थेचे अध्यक्षपद मिळाले नसल्याचे त्यांनी एका प्रश्नावर सांगितले.