डी. डी. कोसंबी विचार महोत्सव
मुक्त उद्योजकतेमुळे आर्थिक वाढीला चालना मिळते व त्यामुळेच लोकशाहीत मुक्त उद्योजकतेला वाव मिळायला हवा. पाश्चिमात्य राष्ट्रे समृध्द बनली, कारण तेथे मुक्त उद्योजकतेला तसेच मुक्त बाजारपेठेत वाव मिळाल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी काल येथे बोलताना उद्गार काढले. कला अकादमीत काल डी. डी. कोसंबी विचार महोत्सवात ‘लोकशाही आणि मुक्त उद्योजकता : फायदे आणि तोटे’ या विषयावर ते बोलत होते.समाजात सर्वांना समान संधी मिळायला हवी. विकासाची फळे सर्वांना चाखायला मिळायला हवीत. जर तसे झाले नाही व समाजात असमानता निर्माण झाली तर मुक्त बाजारपेठ कोसळण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. मुक्त उद्योजकतेसाठी असे वातावरण पोषक नसल्याचे ते म्हणाले, अशी परिस्थिती निर्माण झाली तर लोकशाही व मुक्त उद्योजकता यात तणाव निर्माण होऊ शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
सशक्त सरकार, कायद्याचे राज्य व जबाबदार लोकशाही महत्वाची आहे. हे तीन स्तंभ असल्याचे ते म्हणाले. सशक्त सरकार म्हणजे ज्याकडे प्रचंड लष्करी ताकद आहे ते सरकार नव्हे. बहुतेक हुकुमशहांकडे तशी ताकद होती. पण म्हणून त्यांना सशक्त सरकार म्हणता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हिटलरचे उदाहरण देताना ते म्हणाले की हिटलरकडे भरपूर ताकद होती. पण देशाला त्याचा फायदा झाला नाही. उलट देश घोर संकटातच सापडला. मुक्त उद्योजकतेचा समाजातील सर्व घटकांना फायदा मिळायला हवा. पण तसे होताना दिसत नसल्याचे ते म्हणाले.
शिक्षणाविषयी बोलायचे झाल्यास समाजातील गरीब घटकाना शिक्षणाच्या योग्य त्या संधी प्राप्त होत नाहीत. चांगल्या शैक्षणिक संस्थांत जाऊन चांगले शिक्षण घेणे हे देशातील गरिबांना परवडत नसल्याचे ते म्हणाले. समृध्दीसाठी शिक्षण हे महत्वाचे असल्याने सर्वांना शिक्षणात समान संधी मिळायला हवी, असे त्यांनी स्पष्ट केले. पण असे असतानाही आता बरेच लोक चांगले शिक्षण घेतात व त्यामुळे आर्थिक वाढीलाही चालना मिळत असल्याचे ते म्हणाले.
एखादे सरकार काही चांगल्या योजना तयार करू शकते असे सांगून त्यांनी मोदी सरकारच्या जनधन योजनेचे उदाहरण दिले. मात्र, बर्याचशा योजना या देशाच्या कानाकोपर्यात पोचू शकत नसल्याचे ते म्हणाले. आर्थिक वाढ ही सर्वसमावेशक असायला हवी. लोकांना चांगल्या नोकर्या मिळायला हव्यात. आणि लोक त्या मिळण्याच्या योग्यतेचे होतील याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे, ते म्हणाले.
बदलणार्या समाजासाठी लोकशाही चांगली आहे. या लोकशाहीत कायद्याचे राज्य हवे व चांगले प्रशासन हवे. भारतासारख्या देशात जाती व्यवस्थेमुळे समाज विभागला गेला. परिणामी सर्वांना समान संधी मिळण्याच्याबाबतीत या व्यवस्थेमुळेही अडचणी निर्माण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समृध्दीसाठी सशक्त सरकारची आवश्यकता असते असे ते म्हणाले. पाश्चिमात्य राष्ट्रे समृध्द बनली कारण तेथे उद्योजकतेला वाव मिळाला. मुक्त बाजारपेठ व मुक्त उद्योग तेथे मूळ धरू शकल्याचे ते म्हणाले.

