लॉडर्‌‌स ‘नॉन ऑनर्स बोर्ड इलेव्हन’ संघ जाहीर

0
134

>> सचिन, सेहवाग, कोहलीचा समावेश

क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या लॉडर्‌‌स क्रिकेट मैदानाच्या मंडळाने आपली अकरा जणांची टीम निवडली आहे. जगातील विविध मैदानांवर आपले बॅटने मैदाने गाजवलेल्या तसेच गोलंदाजींत विविध मैदानांवर डावांत पाच किंवा अधिक बळी घेतलेल्या परंतु, लॉडर्‌‌सवर अपयशी ठरलेल्यांचा या संघात समानेश करण्यात आला आहे. ‘लॉडर्‌‌स नॉन ऑनर्स बोर्ड इलेव्हन’ असे नाव या संघाला दिले आहे. विशेष म्हणजे या संघात वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर व विराट कोहली या तीन दिग्गज भारतीयांचा समावेश आहे. या मैदानावर गोलंदाजी करताना ५ बळी किंवा शतक ठोकणार्‍या खेळाडूंचा लॉडर्‌‌सच्या ‘ऑनर्स बोर्ड’ मध्ये समावेश केला जातो. परंतु, आता कोरोनामुळे वेळ जात नसल्याने क्रिकेटप्रेमींच्या मनोरंजनासाठी ‘नॉन ऑनर्स बोर्ड इलेव्हन’ संघ निवडण्यात आला आहे.

लॉडर्‌‌स क्रिकेट मैदानाच्या ऑनर्स बोर्डमध्ये सामील न झालेल्या या खेळाडूंच्या संघाचा कर्णधार इंग्लंडचा माजी फलंदाज डब्ल्यूजी ग्रेस आहे. त्याने आपल्या २२ कसोटी सामन्यात १०९८ धावा केल्या आहेत. यात दोन शतके आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. यानंतर वीरेंद्र सेहवागचा क्रमांक लागतो. सेहवागने एकूण २३ कसोटी शतके ठोकली, पण लॉडर्‌‌सवर त्याला एकही शतक करता आलेले नाही. कारकीर्दीत तीन वेळा इंग्लंड दौर्‍यावर आलेल्या विराट कोहलीने अद्यापही या मैदानावर शतक झळकावलेले नाही. त्यामुळे त्यालाही या संघात स्थान देण्यात आले आहे. त्यापाठोपाठ सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा यांचा क्रमांक लागतो. सचिनने लॉडर्‌‌स येथे पाच सामने खेळले, परंतु तो येथे एका डावात ४७ धावांपलीकडे जाऊ शकलेला नाही. तर, दुसरीकडे लाराने लॉडर्‌‌सवर तीन कसोटी सामने खेळले आहेत. त्याची येथील सर्वाधिक धावसंख्या ही ५४ होती. यानंतर जॅक कॅलिसचे नाव येते. आधुनिक क्रिकेटमधील जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू असलेल्या कॅलिसने येथे कधीही शतक साजरे केले नाही किंवा त्याला डावात पाच बळीदेखील घेता आलेले नाहीत. ऑस्ट्रेलियाचा ऍडम गिलख्रिस्ट या संघामध्ये सातव्या क्रमांकावर आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दुसर्‍या क्रमांकाचे सर्वाधिक बळी घेतलेला शेन वॉर्न (७०८) व पाकिस्तानचा स्विंग सम्राट वसिम अक्रम (४१४ बळी) हे देखील लॉडर्‌‌सवर पाच विकेट घेण्यास असमर्थ ठरले. या संघामध्ये ऑस्ट्रेलियाचा डेनिस लिली आणि वेस्ट इंडिजचा कर्टली ऍम्ब्रोसचाही समावेश आहे.

‘लॉडर्‌‌स नॉन ऑनर्स बोर्ड इलेव्हन’ डब्ल्यूजी ग्रेस (कर्णधार), वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, विराट कोहली, जॅक कॅलिस, ऍडम गिलख्रिस्ट (यष्टिरक्षक), शेन वॉर्न, वसिम अक्रम, डेनिस लिली, कर्टली ऍम्ब्रोस.