‘लॉकडाऊन’ संपल्यानंतर काय …?

0
156
  • प्रज्वलिता गाडगीळ

 

आम्ही घरी कोणतेही कार्य करतो… वाढदिवस, साखरपुडा, केळवण, मुंज, लग्न, पूजा, अगदी धुमधडाक्यात करतो, मिळवतो काय? आशीर्वाद? अन्नदानाचं पुण्य? मला वाटतं हे सर्व कार्य आपल्यापुरतं मर्यादेतच करावं. अनाठायी खर्च टाळावा.

 

आज आपण अनेक दिवसांपासून म्हणजे गेल्या दोन महिन्यांपासून एक कोरोना विषय चघळतोय. डोळे उघडताच नवनवीन बातम्या कोरोनाविषयी ऐकू येतात. काळजात धडकीच भरते. मग मनात, स्वप्नात, डोक्यात, आजुबाजूला ङ्गक्त तोच आणि तोच विषय! मन हेलावून जातं. आज तीन आठवडे उलटून गेलेत, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं बघताना भकास आणि शांत वाटतंय. पण आता वाटतंय, बस झालं. यात ङ्गार मोठं नुकसान आहे. उदा. मुलांचं शिक्षण! आम्हा जाणत्यांचं बरं आहे हो, जास्तशे दिवस जगून संपलेत, पण तरुण मंडळी आणि उद्याचे राज्य घडवणारे.. त्यांना ङ्गार जड जातंय. प्रत्येकजण मोबाईलवर सतत खेळत असतो. वन-रुम-कीचन फ्लॅट. मग त्यात ती काय आणि किती म्हणून कामं करतील? खाऊन खाऊन वजन वाढलं, साखर वाढली, प्रेशर वाढलं आणि घरात चौघं. मग घरातली बाई ओरडते… ङ्गक्त मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप आणि खाणे?? पण त्यांनी बिचार्‍यांनी काय बरं करावं?

मला असं वाटतंय- आम्ही जेव्हा पोपट, पक्षी, ससा असे अनेक पक्षी- प्राणी सांभाळतो, तेव्हा ते पिंजर्‍यात आणि आम्ही मात्र मुक्त. तसंच आज हे उलट झाल्यासारखं वाटतंय. आम्ही आत आणि ते मुक्त. करावे तसे भोगावे… असं तर नसेल ना? हे आजचे असे हे लॉकडाऊन गेल्या १०० वर्षांत ऐकलेही नव्हते आणि पाहिलेही नव्हते. खरं असं वाटतंय की करतो कोण आणि भोगतोय कोण? कोण होता तो कोरोनाचा रुग्ण..त्या एकामुळे जग हादरलं. जसं की रामायण कुणी घडवलं? त्यातलाच एक प्रकार वाटतोय. लॉकडाऊनमुळे तुम्हाला-आम्हाला खूप समस्या अनुभवायला मिळाल्या. आम्ही स्त्रियांनी खूप काम केले आणि वेळ निभावून नेली. पुरुष मात्र कंटाळले. मग काय… त्यांनाही कामाला लावले. गोवर्‍या थापल्या, चूडतं विणली, शिलाई केली, वाळवणं केली,उडदाचे पापड, मिरची भरणे, कुरड्या-सांडगे. पत्ते खेळले, लेखन केले, भगवंताची आराधना केली. थोडक्यात काय महिलांनी लॉकडाऊनमुळे मिळालेल्या वेळेचा योग्य सदुपयोग केला. हे सगळं जरी खरं असलं तरी पुढे हा लॉकडाऊन संपला की अजून ङ्गार मोठी समस्या निर्माण होऊ शकते. ती कशी.. असा प्रश्‍न तुम्हाला पडला असेलच ना? तर उत्तर देणं तेवढंच गरजेचं आहे.

एक म्हणजे अनेक जणांच्या नोकरीवरही गदा येऊ शकते. एखादेवेळी त्यांचा पगारपण कमी होऊ शकतो. एखाद्याची नोकरी गेली तर दुसरी मिळणे ङ्गार कठीण होईल हो. आज आम्ही आराम- आनंद भोगला तो पुढे भविष्यात मिळेलच असे नाही. लॉकडाऊन संपल्यानंतर जीवनात, घरात, नोकरीच्या ठिकाणी सर्वकाही सुरळीत होण्यास काही काळ वाट बघावी लागेल. यात कुणी आणि का केलं असं म्हणायला शासनाची चूक नसेल. आमचं स्टँडर्ड ऑङ्ग लिव्हींग डूऊनही होऊ शकते. एखाद्या वेळेस आपले मन उदासही होऊ शकते. मग आपण काय बरं करुया? तर संयम घट्ट धरून ठेवू या. खचायचं तर मुळीच नाही, पण डोकं लढवायचं. जे जे काम आपल्यासमोर येईल ते ते मनापासून करुया. लाज धरून बसणे नाही. मी एकेकाळी श्रीमंत, नोकरदार आणि आता हे काम करू?… असं मनातसुद्धा आणू नये. समजा आपल्याकडे गरजेपेक्षा ज्यादा गाड्या आहेत तर त्यावर नियंत्रण घालू या. जवळच जायचं असेल तर स्कूटरने जाऊया. चालणे शक्य असेल तर चालू करू या. यातून खूपच ङ्गायदा होईल- जसे साखर नॉर्मल; बी.पी. नॉर्मल, निरोगी आणि तंदुरुस्त. पेट्रोल, पैसा आणि वायू प्रदूषणही कमी होईल. सांगायला गेलं तर यादी ङ्गार लांब आहे. महिलांबद्दल बोलायचं तर – तीस दिवसांचे तीस ड्रेस, मॅचिंग पर्स, चप्पल, इयरींग, ब्युटी पार्लर… वगैरे.. सर्वांना बघते ना. ते जरा कमी व्हावे असे वाटते. आहे ते जपून वापरा. कारण या लॉकडाऊनच्या काळात करोडोंनी नव्हे तर अब्जांनी नुकसान झालंय. त्यामुळे सगळ्यांवर परिणाम होणारच यात शंका नाही.

आम्ही घरी कोणतेही कार्य करतो… वाढदिवस, साखरपुडा, केळवण, मुंज, लग्न, पूजा, अगदी धुमधडाक्यात करतो, मिळवतो काय? आशीर्वाद? अन्नदानाचं पुण्य? मला वाटतं हे सर्व कार्य आपल्यापुरतं मर्यादेतच करावं. अनाठायी खर्च टाळा. माणुसकी जपा. गरिबांना मदत करा. तुमच्या मदतीची त्यांना गरज असेल. काळजी घ्या.