लुथरा बंधूंना न्यायालयाकडून दिलासा नाहीच

0
19

बर्च बाय रोमियो लेन नाईटक्लबमधील अग्नितांडवानंतर अटक चुकवण्यासाठी रविवारी भल्या पहाटे भारतातून पलायन करुन थायलंडला गेलेल्या लुथरा बंधूंनी अटकपूर्व जामिनासाठी दिल्लीतील रोहिण्ाी न्यायालयात अर्ज केला होता. काल झालेल्या सुनावणीवेळी लुथरा बंधूंचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.

गोवा पोलिसांनी सुनावणीवेळी लुथरा बंधूंच्या अटकपूर्व जामिनाला जोरदार विरोध दर्शविला होता. त्यांनी अटक चुकवण्यासाठी भारतातून थायलंडला पलायन केल्याचे तसेच तपासकामात कोणतेही सहकार्य केले नसल्याचे गोवा पोलिसांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
लुथरा बंधून थायलंडला पळून गेले नव्हते, तर त्यांच्या व्यावसायिक कामासाठी गेले होते, असा दावा त्यांच्या वकीलाने न्यायालयात केला. तो दावा गोवा पोलिसांनी खोडून काढला. थायलंड येथे आपला व्यवसाय असल्याचे सिद्ध करणारे कोणतेही कागदोपत्री पुरावे लुथरा बंधू सादर करू शकले नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

भारतातून पलायन केल्यानंतर लुथरा बंधू थायलंड येथे लपून बसले होते. आणि भारतीय तपास यंत्रणांच्या विनंतीवरुन थायलंड पोलिसांनी त्यांना फुकेत येथे ताब्यात घेतल्याचे गोवा पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
लुथरा बंधूंच्या नाईटक्लबमध्ये झालेल्या अग्नितांडवात 25 लोक मृत्यूमुखी पडले असून, अन्य काही जण जखमीही झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा आहे. त्याशिवाय त्यांच्यावर बेकायदेशीर बांधकाम व आर्थिक गैरव्यवहाराचेही आरोप असल्याचे गोवा पोलिसांनी न्यायालयाच्या नजरेत आणून दिले.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर रोहिणी न्यायालयाने लुथरा बंधूंचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला. थायलंडमधून प्रत्यार्पणासंबंधीची सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सीबीआय त्यांना भारतात आणणार असून, त्यानंतर त्यांना गोवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
‘आरोपी पुरावे नष्ट करू शकतात’

आरोपी नाईटक्लबमध्ये झालेल्या अग्नितांडव प्रकरणी तपासासाठी कोणतेही सहकार्य करीत नसल्याचेही गोवा पोलिसांनी न्यायालयाच्या नजरेत आणून दिले. त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला तर ते पुरावे नष्ट करू शकतात. तसेच साक्षीदारांवर दबाव आणू शकतात, असेही गोवा पोलिसांनी दिल्लीच्या रोहिणी न्यायालयात सांगितले.