हडफडेे येथील बर्च बाय रोमियो लेन या नाईटक्लबमधील भीषण आग प्रकरणात अटक केलेल्या सौरभ आणि गौरव या लुथरा बंधूंची येत्या 9 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत काल रवानगी करण्यात आली. लुथरा बंधूची पोलीस कोठडीतील मुदत पूर्ण झाल्याने हणजूण पोलिसांनी त्यांना काल म्हापसा येथील प्रथम श्रेणी न्यायालयासमोर हजर केले. म्हापसा न्यायालयाच्या निर्देशानुसार लुथरा बंधूंची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांना आवश्यक औषधे उपलब्ध करण्याचा निर्देश देण्यात आला.
बर्च या नाईटक्लबच्या बनावट दाखला प्रकरणात लुथरा बंधूंनी म्हापसा येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर मंगळवार दि. 30 डिसेंबरला सुनावणी होणार आहे.
या प्रकरणात म्हापसा पोलिसांनी लुथरा बंधू, अजय गुप्ता याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अजय गुप्ता याच्या पोलीस कोठडीत आणखी पाच दिवसांनी वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान, बर्च नाईटक्लबच्या आग प्रकरणात बळी पडलेल्या काही व्यक्तीच्या नातेवाईकांनी लुथरा बंधूच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करण्याचा निर्णय घेतला असून, आग प्रकरणातील काही बळींचे नातेवाईक म्हापशात दाखल झाले आहेत.
प्रदीप घाडी आमोणकर यांची
पोलिसांकडून उलटतपासणी
बर्च बाय रोमियो लेन या नाईटक्लबमधील आगीच्या दुर्घटनेप्रकरणी काल हणजूण पोलिसांनी तेथील जमिनीचे मूळ मालक प्रदीप घाडी आमोणकर यांची उलटतपासणी घेतली.