Home Featured लुथरा बंधूंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

लुथरा बंधूंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

0

>> क्लबच्या आणखी एका सहमालकास नवी दिल्लीत अटक

>> हडफडे नाईटक्लब दुर्घटनेत आतापर्यंत सहाजण अटकेत

हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन या नाईटक्लबमधील भीषण आगीच्या दुर्घटनेतील संशयित आरोपी नाईटक्लबचे मालक सौरभ आणि गौरव लुथरा या बंधूनी नवी दिल्लीतील रोहिणी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळत न्यायालयाने संशयित लुथरा बंधूंना अंतरिम जामीन देण्यास नकार दिला आहे.

संशयित आरोपी नाईटक्लबचे मालक सौरभ आणि गौरव या लुथरा बंधूंनी 7 डिसेंबर 2025 रोजी पहाटे 1.17 वाजता एमएमटी प्लॅटफॉर्मवर थायलंडला जाण्यासाठी तिकीट बुक केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
गोवा पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान आग विझवत असताना आणि क्लबमधील भीषण आगीत अडकलेल्यांना वाचवत असताना, संशयित आरोपी सौरभ आणि गौरव हे दोघेही विदेशात पळून जाण्याच्या तयारीत होते.

हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन या नाईटक्लबमधील आगप्रकरणातील फरारी संशयित आरोपी नाईटक्लबचे मालक सौरभ आणि गौरव या लुथराबंधूंनी अंतरिम जामिनासाठी दिल्लीच्या रोहिणी न्यायालयात अर्ज दाखल केला. संशयितांनी बर्च बाय रोमियो लेन आग प्रकरणात ट्रान्झीट अटकपूर्व जामीन मंजूर करण्याची विनंती अर्जात केली होती.

न्यायालयाने या अर्जावर काल सुनावणी घेत संशयितांना दिलासा देण्यास नकार दिला. या अर्जावर आज गुरूवारी सुनावणी होणार आहे. या अटकपूर्व जामीन अर्जावर आरोपींकडून ॲड. सिद्धार्थ लुथरा आणि ॲड. तन्वीर अहमद यांनी युक्तिवाद केला. तर, गोवा पोलिसांच्यावतीने वरिष्ठ वकील ॲड. अभिनव मुखर्जी आणि ॲड. सुरजेंदू शंकर दास यांनी युक्तिवाद
केला.
सुनावणीच्या वेळी गोवा पोलिसांनी संशयित आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

आणखी एका सहमालकास
नवी दिल्ली येथे अटक

हणजूण पोलिसांनी या नाईटक्लबचा आणखी एक मालक अजय गुप्ता याला नवी दिल्ली येथे अटक केली आहे. आग दुर्घटनेमध्ये पोलिसांनी आतापर्यंत सहाजणांना अटक केली आहे. या क्लबचा आणखी एक मालक अजय गुप्ता याला स्थानिक न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले असून त्याच्या वैद्यकीय तपासणीनंतर त्याला गोव्यात आणण्यात येणार आहे.

अहवालानंतर न्यायालयीन चौकशीचा निर्णय ः मुख्यमंत्री

राज्य सरकारने हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन या नाईटक्लबमधील भीषण आग प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीचा अहवाल मिळाल्यानंतरच न्यायालयीन चौकशीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. पोलीस, पर्यटन खात्याचे अधिकारी आणि पर्यटन क्षेत्रातील संस्था, उद्योजक यांच्यासोबत घेतलेल्या एका उच्चस्तरीय बैठकीनंतर पर्वरी येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बैठकीला पर्यटनमंत्री रोहन खंवटे, मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू, पोलीस महासंचालक आलोक कुमार व इतरांची उपस्थिती होती.
हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन या नाईटक्लबकडे बांधकाम परवाना नव्हता आणि सर्व परवाने पंचायतीने दिलेल्या व्यापार परवान्यावर देण्यात आले होते, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली. या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत सहा संशयितांना अटक केली आहे. मुख्य संशयित आरोपी सौरभ आणि गौरव या लुथरा बंधूंना अटक करण्यासाठी गोवा पोलिसांनी केंद्रीय तपास यंत्रणेशी संपर्क साधला असून आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

नियम न पाळणाऱ्यांचे परवाने निलंबित

राज्यात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पर्यटन क्षेत्रातील आस्थापनांसाठी नियमांचे पालन सक्तीचे करण्यात आले आहे. राज्यातील पर्यटन क्षेत्रातील सर्व आस्थापनांना 12 नियमांचे पालन करण्याचा निर्देश जारी करण्यात आला आहे. या नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात येणार आहेत. अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.

निलंबित अधिकाऱ्यांचे सहकार्य

राज्य सरकारने हडफडे येथील आग दुर्घटना प्रकरणामध्ये निलंबित केलेल्या अधिकारी शर्मिला मोंतेरो आणि सिद्धी हळर्णकर यांनी चौकशीसाठी उपस्थिती लावून सहकार्य केले आहे. तथापि, हडफडे-नागोवा पंचायतीचे निलंबित सचिव रघुवीर बागकर यांनी अद्यापपर्यंत तपासकामाला सहकार्य केलेले नाही. रघुवीर बागकर पोलिसांसमोर हजर न झाल्यास त्यांना अटक होऊ शकते.

आयपीएस अधिकाऱ्याचा हस्तक्षेप नाही ः मुख्यमंत्री

सदर नाईटक्लबमधील कारवायांवर केली जाणारी कारवाई रोखण्यात आयपीएस किंवा अन्य कुठल्याही अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचे आढळून आल्यास संबंधिताच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे. तथापि, अजूनपर्यंत आयपीएस अधिकाऱ्याचा हस्तक्षेप नजरेस आलेला नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

कॅसिनोंत सुरक्षेचे उपाय

राज्यातील कॅसिनोमध्ये 100 टक्के सुरक्षितता आणि सुरक्षेचे उपाय’ आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी एका प्रश्नावर बोलताना दिली. कॅसिनोकडे वैध अग्निशमन परवाने आहेत. असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.