‘लाडली लक्ष्मी’च्या प्रलंबित अर्जांना आधी मंजुरी मिळणार

0
17

>> मुख्यमंत्र्यांकडून आवश्यक कार्यवाहीची मंत्री विश्वजीत राणे यांना सूचना

>> गावडेंकडून प्रश्न उपस्थित; 10-12 वर्षांपासून अर्जांवर कार्यवाही नाही

‘लाडली लक्ष्मी’ योजनेच्या नव्या अर्जांना मंजुरी देण्यापूर्वी मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रलंबित सर्व अर्जांची छाननी करून ते अगोदर मंजूर करावेत, अशी सूचना काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी महिला-बालकल्याण खात्याचे मंत्री विश्वजीत राणे यांना केली.

काल प्रश्नोत्तराच्या तासाला हा प्रश्न उपस्थित करताना आमदार गोविंद गावडे यांनी लाडली लक्ष्मी योजनेचे काही अर्ज गेल्या 10-12 वर्षांपासूनही मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यासंबंधीचे उदाहरण देताना आपल्या प्रियोळ मतदारसंघातील एका व्यक्तीने या योजनेखाली 2013 साली केलेला अर्ज अजूनही मंजूर करण्यात आला नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी गरीब घरांतील मुलींना लग्नाच्या वेळी पैसे मिळावेत यासाठी ही योजना सुरू केली होती, असे सांगून आता अशा अर्जदारांचे अर्ज अडवून ठेवून त्यांना या योजनेपासून वंचित ठेवू नका, अशी कळकळीची विनंती
त्यांनी केली.

काही जणांच्या जन्मदाखल्यावर असलेल्या नावाच्या इंग्रजी आद्याक्षरांमध्ये (स्पेलिंग) किरकोळ चूक असली तरी त्यांना भिन्नता प्रमाणपत्र (डायव्हर्जन्स सर्टिफिकेट) आणण्यास सांगितले जाते. त्यामुळे त्या महिलेचा ‘लाडली लक्ष्मी’साठीचा अर्ज अडून पडत असल्याचे गावडे यांनी सांगितले. त्यावर बोलताना मंत्री विश्वजीत राणे यांनी त्यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.
मात्र, यावेळी हस्तक्षेप करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्री विश्वजीत राणे यांना लाडली लक्ष्मी योजनेच्या नव्या अर्जांना मंजुरी देण्यापूर्वी मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रलंबित सर्व अर्जांचा योग्य अभ्यास करुन ते अगोदर मंजूर करावे, अशी सूचना केली.