अर्ज मंजूर झालेल्यांचे पैसे ईसीएसद्वारे त्यांच्या खात्यात जमा होणार असून त्यांच्या लग्नाच्यावेळी व्याजासकट ते त्यांना मिळणार असल्याचे परुळेकर यांनी स्पष्ट केले. वरील योजनेसाठी ९३६ अर्ज आले होते. त्यापैकी ५८५ मंजूर करण्यात आलेले असून ३५१ अर्ज आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्यात न आल्याने ठेवून देण्यात आल्याचे ते म्हणाले.
१८ वर्षे पूर्ण झालेल्या मुलींच्या नावाने खाते उघडून एक लाख रु. जमा केले जातील. मात्र, त्यासाठी १८ वर्षे पूर्ण केलेल्या मुलींना १८० दिवसांच्या आत वरील योजनेसाठीचा अर्ज भरून सर्व सोपस्कार पूर्ण करावे लागतील. मात्र, तसे करण्यास अपयश येणार्या मुलींना लग्नाच्या वेळीच योजनेसाठी अर्ज करावे लागतील व त्याना व्याजाला मुकावे लागणार असल्याने एक लाख रु. च मिळू शकतील. मात्र, १८ व्या वर्षी लाडली लक्ष्मी योजनेसाठी अर्ज करणार्यांना व्याजासह पैसे मिळतील. १ एप्रिल २०१२ या दिवशी १८ वर्षे पूर्ण केलेल्या मुलींना वरील योजनेसाठी अर्ज करता येईल. मात्र, त्यापूर्वी जन्मलेल्या मुलींना लग्नाच्या वेळी अर्ज करावा लागणार असल्याचे परुळेकर यांनी सांगितले.
चालू वर्षी १५ हजार जणींना लाभ
२०१२–२०१३ या वर्षी १५ हजार मुलींना ‘लाडली लक्ष्मी’चा लाभ मिळणार असल्याची माहितीही दिलीप परुळेकर यांनी दिली.
२० हजार अर्ज वितरित
वरील योजनेखाली आतापर्यंत २० हजार अर्ज उपलब्ध करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वप्रथम ४ हजार अर्ज उपलब्ध करण्यात आले होते. नंतर स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी या बँकांत मिळून १० हजार अर्ज उपलब्ध करण्यात आले. नंतर महिला व बालविकास खात्यात ४ हजार अर्ज ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. १८ वर्षे पूर्ण केलेल्या मुलींच्या खात्यावर वरील योजनेखाली पैसे जमा करण्यात येणार असले तरी लग्नाची नोंदणी झाल्यानंतरच तिला खात्यावरील पैसे मिळतील.
१८ ते ४० या वयोगटातील मुलींसाठी ही योजना आहे. अर्जदार मुलगी, महिला व बाल विकास खात्याचे संचालक व बँकेचे व्यवस्थापक यांच्या जोड नावाने खाते उघडण्यात येणार असून लग्नाची नोंदणी झाल्यानंतर वरील अधिकार्यांची परवानगी घेऊन सदर मुलगी खात्यातून पैसे काढू शकेल. २०१२–१३ या आर्थिक वर्षासाठी सरकारने वरील योजनेसाठी १५० कोटी रु. ची तरतूद केली असल्याची माहिती दिलीप परुळेकर यांनी दिली. स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सरकारने ही योजना सुरू केलेली असून भाजप सरकारने आपल्या निवडणूक जाहिरनाम्यात या योजनेचा समावेश केला होता.
मांद्य्रातून सर्वाधिक अर्ज, नावेलीतून शून्य
लाडली लक्ष्मी योजनेसाठी सर्वाधिक अर्ज लक्ष्मीकांत पार्सेकर (आरोग्यमंत्री) यांच्या मांद्रे मतदारसंघासाठी मंजूर झालेले असून तेथून आलेल्या ७४ अर्जापैकी ६६ अर्ज मंजूर झाले असल्याचे दिलीप परुळेकर यांनी सांगितले. काणकोण मतदारसंघातून ३२ अर्ज मंजूर झालेले असून १६ मंजूर होण्याच्या मार्गावर असल्याचे ते म्हणाले. आपल्या साळगाव मतदारसंघातून २४ अर्ज होते. त्यापैकी १२ मंजूर झालेले असून १२ प्रतीक्षा यादीत असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, नावेलीचे मंत्री आवेर्तीन फुर्तादो यांच्या मतदारसंघातून एकही अर्ज आला नसल्याची माहितीही परुळेकर यांनी दिली.