लागलीसे आस…

0
20
  • मीना समुद्र

हा ऋतुबदल पाहून मन कासावीस होते. उपऱ्यासारखे वाटू लागते. त्याच्या स्वप्नातही नसते की नाती अशी तुटतील, असा अबोला वाढेल, असे प्रेम आटेल. गळ्यात आठवणींनी हुंडका दाटतो. त्याला आठवत राहतो तो फक्त जीव ओवाळून टाकणाऱ्यांचा काळ.

मोबाईलमुळे हल्ली संवाद हरवत चालल्याची तक्रार सगळीकडे दिसून येते. खरे तर संवाद हे घरात आणि घराबाहेर एकमेकांना बांधून ठेवण्याचे, मैत्रभाव जागविण्याचे, आपुलकी जपण्याचे एक अतिशय प्रभावी आणि अत्यावश्यक साधन आहे. दोन व्यक्तीतील किंवा व्यक्ती-व्यक्तीतील संवाद हा त्या-त्या व्यक्तीच्या सुखदुःखाचे, भावनांचे, कल्पनांचे प्रकटीकरण करत असतो. सुसंवाद ही जीवनाला चैतन्य देणारी, नातेसंबंध जोडणारी, जुळवणारी, टिकविणारी, प्रेमजिव्हाळा वाढविणारी गोष्ट आहे. एखादी व्यक्ती घरातही न बोलता काहीतरी विपरित करून बसते आणि त्याचे परिणाम एकटेपणाने भोगत निराश स्थितीत जाते तेव्हा घरची, जवळची माणसे साहजिकच म्हणताना आढळतात- ‘अरे, आम्ही सगळे होतो ना, बोलायचं कुणापाशीही एकदा तरी.’ संवादाने मनातल्या शंका मिटतात. मळभ दूर होऊन आकाश स्वच्छ होते. निराशेच्या घनघोर अंधारातही चांदण्या चमचम करतात- आशेचे किरण दिसू लागतात. प्रथितयश कवी श्री. वैभव जोशी यांनी म्हटल्याप्रमाणे-
एक क्षण येतो असा की बोलणे संपून जाते
राहते आभाळ हाती चांदणे हरवून जाते
संवादातून, एकमेकांशी बोलण्यातून माणसाला जगण्याचा सूर गवसतो. समसंवेदनेची जाणीव होते. व्यथाकथांची देवाणघेवाण होते. अनुभवी मार्गदर्शन मिळते. वाटा उजळ होतात. आश्वासक हात पाठीवरून फिरल्यासारखा वाटतो. आभाळासारखे मुक्त स्वातंत्र्य अनुभवायला मिळते. दिशादिशातून बरसणारा आनंद उपभोगायला मिळतो. मनोमीलन घडते. पण एखादा क्षण असा येतो की संवादातला एकांगी सूर आपल्याला आवडत नाही, पटत नाही. त्यातला हट्टी हेकेखोरपणा रूचत नाही. अति अहंकाराचा दर्प आला की निमूटपणे बाजूला व्हावेसे वाटते. मनाच्या निरभ्र आकाशात मळभ दाटून येते आणि निराशेतही आशेची किरणे दाखवणाऱ्या चमचमत्या- लखलखत्या चांदण्याही निस्तेज होतात. फक्त काळोखे अनंत, अथांग आभाळ आपल्या हाती उरते. चांदण्यांचं सत्त्व म्हणजे त्यांची शीतलता, त्यांचे अनिमिष सौंदर्य, त्यांचा सौम्य हवाहवासा प्रकाश आणि नीरवतेत गवसणारी असीम शांती. निरभ्र गगनातलं स्वच्छ चांदणं म्हणजे निखळ आनंदाचा ठेवा.

माणसांतला सुसंवाद थांबला, बोलणं थांबलं की एकमेकांना समजून घेणं दूरच राहतं. मन एकांगी विचार करू लागतं आणि कुठल्याही क्रियेला गैरसमजाच्या दृष्टिकोनातूनच पाहिले जाते. सुंदर नात्यात जेव्हा गैरसमजाचा ऋतू डोकावू लागतो तेव्हा आपुलकीची, जिव्हाळ्याची होरपळ होते. धनधान्य, सुख-समृद्धी, संतती, संपत्ती, घरदार सारे काही असूनही ते फक्त बाह्यतः दिसायला. नात्यांचे बंध ताणले जातात. कधी-कधी तटातटा तुटतात. मायेचे वस्त्र विरू लागते. मायाममतेची स्निग्धता आणि एकतेतले सौंदर्य, एकमेकांबद्दलचा आदर, स्नेह, प्रेमजिव्हाळा हरवून जातो. जगण्यातली निश्चिंतता, निर्भरता, रस, चैतन्य आटून-विटून नाहीशी होऊन जाते. जलसिंचन झाले नाही तर रोपटे वाळून जाते, कधीकधी नष्ट होते; तसे नात्यात संवाद उरला नाही तर मन सुकून निराश होते. कधी टोकाचे निर्णय घेतले जातात. गैरसमज ऋतूसारखा बरेच दिवस, कधी कधी जीवनभर मनात ठाण मांडून बसतो. त्यामुळे सौहार्द संपते. आस्था, कौतुक, चांगुलपणाही नष्ट होतात.
जवळून अतिशय चांगली ओळख असणारा, चांगली जानपहचान असणारा, हरएक भेटीत फुलूनखुलून येणारा चेहरा स्वार्थापायी, मनाच्या संकुचितपणापायी मुखवट्याआड जातो. आपली कधीकाळी ओळख होती, एकमेकांची ओढ होती, भेटीची आतुरता होती, प्रेम होते, विश्वास होता- हे सारे मनातून पुसून जाते. वागणे मुखवटा धारण केल्यासारखे अनोळखी, कृत्रिम होऊन जाते. ही ओळख अतिशय वेदनादायी असते. त्यामुळे ज्याचे मन साफ असते त्याला अत्यंत दुःख होते, अश्रू येतात आणि ती ओळख जणू डोळ्यातल्या अश्रूंवाटे वाहून जाते.

ज्या धुळीशी बोलताना पावले होतात हळवी
धूळ तीही एवढी का कोरडी राहून जाते- नात्यातल्या सर्वांच्या भेटीच्या ओढीने गावाच्या धुळीतून चालताना पावलेही हळवी होतात, अधीर होऊन झरझर चालतात. ती धूळ पायाला सुखद वाटत नाही. मृदू मुलायम होऊन स्वागत करणारी धूळ कोरडेपणाने स्वागत करते. असे का होते? मोठ्या अपेक्षेने, प्रेमासाठी आसुसलेले मन या कोरडेपणाने, रुक्षपणाने बावरून खचून जाते. आणि अनपेक्षितपणाचा हा धक्का सहन न होऊन पार निराश होऊन म्हणते-
उंबऱ्याचा जन्म माझा उंबऱ्याला काय घेणे
कोण ओलांडून येते कोण ओलांडून जाते
उंबरा ही घराची मर्यादा समजली जाते. किती जण उंबरा ओलांडून घरात येतात आणि कितीजण नोकरी, कामानिमित्ताने, व्यवसायानिमित्ताने उंबरा ओलांडून बाहेर, कधी बाहेरगावी तर कधी दूरदेशीही जातात. उंबऱ्याला त्याचे काहीच देणेघेणे नसते. तो तटस्थ असतो. गावाहून येणाऱ्यांचे स्वागतही करतो; आणि त्यांना निरोपही देतो. भाकरतुकडा ओवाळून टाकताना, दृष्ट काढताना, स्वागताची आरती ओवाळतानाही तो तटस्थ असतो आणि उंबऱ्याशी येऊन निरोपाच्या क्षणीही तो तसाच. त्याला कशाचंच देणं-घेणं नसतं. कुणी आला काय, गेला काय त्याला कसलीच फिकीर नसते, कसलीच पर्वा नसते. अशी ही तटस्थता पाहून कवीचे संवेदनशील मनही हळवे होते. हा ऋतुबदल पाहून मन कासावीस होते. उपऱ्यासारखे वाटू लागते. त्याच्या स्वप्नातही नसते की नाती अशी तुटतील, असा अबोला वाढेल, असे प्रेम आटेल. गळ्यात आठवणींनी हुंडका दाटतो. त्याला आठवत राहतो तो फक्त जीव ओवाळून टाकणाऱ्यांचा काळ. कौतुकाचे, ममतेचे शब्द ऐकण्याचा काळ. कुशीत शिरण्याचा, सांत्वन मिळवण्याचा, प्रेमाचा वर्षाव करणारा, नाती दृढ करणारा वेडा काळ. सर्वांच्या काळजाचा दिवा होऊन राहिलेला तो आज प्रेमाला पारखा झाला आहे. ते कौतुक, तो स्नेह, ती सहानुभूती, ते निरपेक्ष प्रेम, ती अनुकंपा, ते कौतुक, ती अपार माया, ती निर्भरता, तो बहराचा ऋतू आता परत येणार नाही. तो लळा-जिव्हाळा आता परत कधीच लाभणार नाही. यामुळे त्याच्या गळ्यात हुंदका दाटतो आणि त्या काळच्या आठवणींनी अंगावर शिरशिरी येते; कारण आता तो काळ परत कधीच येणार नाही याची साक्ष त्याच्या हळव्या मनाला मिळालेली आहे. आपुले भेटणे हीच कोजागरी; चंद्रमाही नको, चांदणेही नसो अशी भेटीची तळमळ असणाऱ्या कवीची निराशा मनाचा तळ ढवळून काढते.