‘लाईफ ऑफ पाय’ला चार पुरस्कार

0
65

 ‘ऑस्कर’ला भारतीय किनार

यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांना भारतीय किनार लाभली आहे. रणबीर-प्रियांका यांचा ‘बर्फी’ या स्पर्धेतून बाद ठरल्यानंतर एका भारतीय मुलावर आधारित व भारतीय कलाकारांचा सहभाग असलेला ‘लाईफ ऑफ पाय’ हा चित्रपट चार ऑस्कर पुरस्कारांचा मानकरी ठरला आहे.

‘लाईफ ऑफ पाय’चे दिग्दर्शक अँग ली यांना उत्कृष्ट दिग्दर्शक तसेच क्लावडियो मिरांडा (सिनेमाटोग्राफी), मायकल डॅन्ना (संगीत) व बिल वेस्टनहोफर (व्हिज्युअल ईफेक्टस्) हे अन्य ऑस्कर पुरस्कार विजेते ठरले.

या चित्रपटात सूरज शर्मा, इरफान खान व तब्बू या भारतीय कलाकारांचा सहभाग होता. या चित्रपटाचे बहुतेक चित्रिकरण भारतात झाले होते. बुकर पुरस्कार विजेत्या यान मार्टेल यांच्या पुस्तकावर आधारित या चित्रपटातील ११ नामांकने या पुरस्कारासाठी करण्यात आली होती. त्यापैकी चौघांना यश मिळाले. गेल्या नोव्हेंबरमध्ये गोव्यात झालेल्या इफ्फी महोत्सवात या चित्रपटाचे खास प्रदर्शन झाले होते. तसेच दिग्दर्शक अँग ली यांच्यासह प्रमुख कलाकारांनीही इफ्फीत उपस्थिती लावली होती. पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना दिग्दर्शक ली यांनी भारतीय कलाकारांचा उल्लेख केला. प्रमुख भूमिका केलेल्या सूरज शर्माचा त्यांनी विशेष उल्लेख केला. दिल्लीतील १९ वर्षीय सूरजने या चित्रपटाद्वारे पर्दापण केले. त्याची या भूमिकेसाठीची निवड २०१० साली ३००० युवकांमधून करण्यात आली होती.