Home बातम्या लग्नानंतरचे ‘ओझे’ बंद होईल का?

लग्नानंतरचे ‘ओझे’ बंद होईल का?

0

– दामोदर उसगांवकर, कवळे – फोंडा

हे ‘ओझे’ वराकडील मंडळी आपल्या नातेवाईकांत आपली शान वाढविण्यासाठी लाडू, नेवर्‍या, मिठाई या स्वरुपात वाटतात. आता काही वरांनी सुपीक कल्पना काढलेली आहे. ते म्हणजे बापाकरवी ओझ्याच्या बदली महागडा मोबाईल, लॅपटॉप, उंची एखादी वस्तू किंवा ‘ओव्हन’ वगैरे वधूपित्याकडून मागायचे. हा प्रकार आजच्या पिढीतील सुधारक तरुणांनी तरी थांबवला पाहिजे 

गोवा राज्याच्या सीमा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला भिडलेल्या आहेत. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इत्यादी कोकणपट्टीत आहेत. सुशोभित समुद्रकिनारे पसरलेले आहेत. त्यामुळे अधिक प्रमाणात येथील लोकांची बोलीभाषा कोंकणी व चालीरीती समान आहेत, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. अपवाद म्हणजे वर्षानुवर्षे चालून आलेल्या काही बुरसट रुढी – परंपरा गोव्यात आहेत, ज्या आजूबाजूच्या प्रदेशांत नाहीत. 
गोव्यातील वधूच्या मातापित्यांना, मुलीची ‘पाठवणी’ सासुरवाडीला करताना नवरदेवाला, पैसा अडका, सोने देऊन करावी लागते. मुलगी कमावती असली तर ‘फर्निचर’  कपडे, गाद्या वगैरे गृहोपयोगी सामानही द्यावे लागते. जी घेण्याची नवरदेवाची ऐपत नसावी? ह्या प्रकाराने सामान्यवर्गीय वधूपित्यांचे कंबरडेच मोडते व आयुष्यभर पै पै करून कमावलेली संपत्ती वराच्या घशात ओतावी लागते. 

सोन्याचे भाव गगनाला भिडले असताना अनेक सुवर्णालंकार, वधूच्या गळ्यात घालावे लागतात. आमच्या ओळखीच्या एका सद्गृहस्थाच्या सांगण्यावरून एक प्रस्ताव एका फोंड्याच्या जवाहिर्‍याकडे घेऊन तो गेला होता. 
गडगंज संपत्ती, चारपाच गाड्या, दोन दुकाने, भरपूर पैसा. मुलगा इंजिनियर असलेल्या या जवाहिर्‍याने चक्क त्या वधूपित्याला बेशरमपणे मुलगी पसंत आहे, पत्रिकेची जरूरी नाही, मात्र मुलीला सोन्याबरोबर जर सोन्याच्या किंमती ‘गोठ’ घालत असाल तर पुढील बोलणी करू असे सांगितले. 
अजूनही काही श्रीमंत लोकांचा हावरटपणा संपलेला दिसत नाही. हे दुर्दैव म्हणावे लागेल. 
आज महागाईत एक लग्न म्हणजे कमीत कमी चार-पाच लाख रुपये, कर्ज घेऊन वधूपित्याला जमा करावे लागतात. पुष्कळदा असे आढळून येते. साखरपुड्याला ‘पार्टीला’ लागणारा खर्चही वर वधूपित्यावर ढकलतात आणि तेही जेवण त्यांना मांसाहारी हवे असते व वर फुकटचे श्रेय घेण्यासाठी जास्तीत जास्त वराकडचेच लोक साखरपुड्याला हजर राहतात. 
पण हेच लोक हळदी समारंभाला किंवा लग्नाला हजर राहत नाहीत, कारण हे जेवण त्यांच्या तब्येतीला मानवत नाही असे म्हणताना दिसते.
लग्नानंतरही वधूपित्याची छळणूक थांबत नाही. श्रीगणेश चतुर्थीचे ‘ओझे’ त्याबरोबर पूजेला लागणारे साहित्य, सामान, फळे मिठाई, लाडू सर्व काही त्यांना हवे असते. त्यानंतर दिवाळी, शिमगा वगैरे वगैरे. 
कधी कधी हे ओझे त्या नवरदेवाचा मुलगा लग्नाचा होईपर्यंत मागितले जाते आणि त्यात काही हयगय झाली की मग त्या मुलीची मानसिक, शारीरिक छळणूक सुरू होताना दिसते वा ऐकावयास मिळते. त्यातूनच आत्महत्येचे प्रकार होतात. 
हे ‘ओझे’ वराकडील मंडळी आपल्या नातेवाईकांत आपली शान वाढविण्यासाठी लाडू, नेवर्‍या, मिठाई या स्वरुपात वाटतात. आता काही वरांनी सुपीक कल्पना काढलेली आहे. ते म्हणजे बापाकरवी ओझ्याच्या बदली महागडा मोबाईल, लॅपटॉप, उंची एखादी वस्तू किंवा ‘ओव्हन’ वगैरे वधूपित्याकडून मागायचे. 
हा प्रकार आजच्या पिढीतील सुधारक तरुणांनी तरी थांबवला पाहिजे, कारण या प्रथेला जुन्या जमान्याच्या लोकांकडूनच जास्त खतपाणी घातले जाते. कदाचित असेही असावे. स्वतःला आपल्या लग्नसोहळ्याला कमी मिळाले असेल ते शल्य बोचत असते त्यांना. 
खरे तर आपल्या पूर्वजांनी काही प्रथा चांगल्या कारणांसाठी सुरू केल्या होत्या. पण दुर्दैवाने त्यांचा विपर्यास समाजातील प्रतिगामी वृत्तीच्या लोकांनी केला आहे. 
पूर्वीच्या काळात आजच्यासारखी दळणवळणाची साधने नव्हती. मुलीच्या आईवडिलांशी वर्षोन्‌वर्षे गाठ पडत नव्हती. म्हणून मुलीला सासरी काही त्रास पडू नये म्हणून केवळ आपल्या प्रेमापोटी आईवडील गोडधोड, लाडू, करंजी देवाला नैवेद्य रुपात नातेवाईकांकडून पाठवून देत. पण काही लोकांनी आपल्या स्वार्थापायी आपल्याला हव्या असलेल्या सुधारणा केल्या व केवळ वधूपित्याकडून जास्तीत जास्त पैसे, सोने लाटण्यासाठी या प्रथेचा उपयोग केला. 
ही प्रथा अजूनही काही जातींमध्ये गोव्यात कार्यरत आहे. ही प्रथा मोडीत काढली पाहिजे. हुंडाबंदी असूनही काही श्रीमंत लोक ‘गोठ’, ‘पाटल्या‘, ‘तोडे’, स्वरुपात भेटी मागतात. अशा लोकांची धिंड काढून भर चौकात त्यांना फटके मारले पाहिजेत, तरच इतरांना जरब बसेल व ही ‘ओझ्याची’ प्रथा, गरजू वधूपित्याकडून सोने, पैसा मागण्याची प्रथा बंद पडेल. वधूपित्याची पिळवणूक करणार्‍या या प्रथेच्या निर्मूलनासाठी सरकारनेयासंबंधी कायदा करावा. विद्यमान कायदे अस्तित्वात असतील तर त्या कायद्यांखाली कारवाई करण्यासाठी तक्रार कशी करावी याचे सर्वसामान्य जनतेला मार्गदर्शन व्हावे, संरक्षण मिळावे. ज्यामुळे सहज लोक याविरुद्ध धाडस करतील यात शंकाच नाही. लाडली लक्ष्मीला एक लाख देणारे सरकार या दृष्टीने काय परिश्रम घेईल?