लक्ष जी-20 परिषदेकडे

0
5

गेले वर्षभर यजमान भारताच्या राज्याराज्यातून ज्याच्या विविध कार्यगटांच्या बैठकांमागून बैठका चालत आल्या, त्या जी – 20 गटाच्या मुख्य परिषदेसाठी राजधानी नवी दिल्ली सज्ज झाली आहे. येत्या शनिवार – रविवारी अशी दोन दिवस दिल्लीच्या अतिशय सुंदर अशा भारत मंडपममध्ये ही परिषद भरणार आहे आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यासह विविध सदस्य राष्ट्रांच्या प्रमुखांची उपस्थिती तिला लाभणार आहे. मात्र, दोन महत्त्वाच्या व्यक्तींनी या परिषदेकडे पाठ फिरवली आहे. एक आहेत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि दुसरे आहेत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग. जिनपिंग यानी आपल्या देशाचे पंतप्रधान ली कियांग यांना आपल्या जागी पाठवले आहे, तर पुतीन यांनी विदेशमंत्री सर्जी लावरोव यांची पाठवणी केली आहे. युक्रेन युद्धामुळे पुतीन आणि भारताशी असलेल्या सीमाप्रश्नामुळे जिनपिंग यांनी ह्या परिषदेची उपस्थिती टाळल्याचे मानले जाते. अर्थात, त्याने काही फरक पडणार नाही. फक्त ह्या परिषदेच्या अंती जे संयुक्त घोषणापत्र जारी करण्याची प्रथा आहे, त्यामध्ये ह्या देशांकडून काही खुसपट काढून अडथळा आणला जाणार का हाच कळीचा मुद्दा राहणार आहे. गेले वर्षभर देशाच्या विविध राज्यांतून विविध शहरांतून जी 20 च्या विविध कार्यगटांच्या बैठका पार पडल्या. देशातील साठ शहरांत सुमारे दोनशे बैठका झाल्या, ज्यात जगातील सव्वाशे देशांतील लाखभर प्रतिनिधी सहभागी झाले. आरोग्यापासून पर्यटनापर्यंत, शेतीपासून अर्थकारणापर्यंत नाना विषय त्यामध्ये चर्चिले गेले. गोव्यात हरित पर्यटनाची बात झाली, तर चेन्नईत नील अर्थव्यवस्था चर्चिली गेली, गुजरातमध्ये आरोग्यविषयक उहापोह झाला, तर जयपूरमध्ये व्यापार व गुंतवणुकीवर खल झाला. असे ठिकठिकाणी जे मंथन घडले त्या सगळ्याचे समापन ह्या मुख्य परिषदेत होणार आहे. ह्या सगळ्या कार्यगटांच्या आणि मंत्रिस्तरीय बैठकांमधून जे मंथन झाले, त्यातून ठरवली गेलेली जागतिक प्राधान्ये आणि त्याप्रतीची प्रत्येक सदस्य देशाची बांधीलकी यांचे प्रतिबिंब ह्या परिषदेच्या संयुक्त घोषणापत्रात पडणे अपेक्षित आहे.
जी 20 गटाला संयुक्त राष्ट्रसंघासारखे औपचारिक संस्थात्मक स्थान जरी नसले तरीही जगाच्या एकूण उत्पन्नाच्या 85 टक्के उत्पन्न असलेले, एकूण जागतिक व्यापाराच्या 75 टक्के व्यापार असलेले आणि जगाची दोन तृतीयांश लोकसंख्या असलेले सामर्थ्यवान देश ह्या परिषदेत एकत्र येत आहेत हे लक्षात घेणे जरूरी आहे. 1991 मध्ये एकीकडे सोव्हिएत रशिया विघटित होत असताना दुसरीकडे भारत, चीन, ब्राझील अशा उभरत्या अर्थव्यवस्था उदयाला येत होत्या. जी 7, जागतिक बँकेसारख्या तत्कालीन व्यवस्था ह्या स्थित्यंतराला जोखण्यात आणि त्याचा जागतिक परिस्थितीवर होणारा परिणाम व्यवस्थापित करण्यास अपुऱ्या भासू लागल्या होत्या. त्यातून जी 20 चा जन्म झाला. आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्याच्या दृष्टीने ह्या जी 20 गटाला अतोनात महत्त्व 2008 सालच्या जागतिक मंदीनंतरच्या काळात आलेले आहे. विविध सदस्य राष्ट्रांदरम्यान आर्थिक धोरणात्मक समन्वय साधणे, भावी आर्थिक नियमनाची दिशा ठरवणे आणि नवी जागतिक वित्तीय रचना कशी असेल त्याची आखणी करणे ह्या सगळ्या गोष्टी ह्याच गटाच्या व्यासपीठावरून होत असतात. त्यामुळे जागतिक स्थैर्य आणि विकासाच्या दृष्टीने ह्या परिषदांची फलश्रृती महत्त्वाची ठरत असते. जी 20 गटाच्या आजवरच्या वाटचालीने त्याला विश्वासार्हता प्राप्त करून दिलेली आहे. भारतामध्ये होणारी ही परिषद तिच्या ‘वसुधैव कुटुंबकम’ या बोधवाक्याप्रमाणेच आजवरच्या वाटचालीवर कळस चढवणारी व संस्मरणीय व्हावी अशी अपेक्षा आहे. जी 20 च्या वित्तीय ट्रॅकखालील किंवा शेर्पा ट्रॅकखालील कार्यगट असोत, मंत्रिस्तरीय बैठका असोत, त्यांच्या गेल्या वर्षभरातील बैठकांतून जी निरीक्षणे समोर आलेली आहेत, त्या सर्वांच्या समुच्चयातून निश्चित धोरणे ह्या परिषदेत आखली जातील अशी आशा आहे. लाईफ – लाईफस्टाइल फॉर एन्व्हायरनमेंट ही ह्या परिषदेची संकल्पना आहे. ही शाश्वत पर्यावरणपूरक जीवनशैली घडविण्यासाठी जगाचे आर्थिक नेतृत्व करणाऱ्या या देशांनी काय काय करणे यापुढे आवश्यक असेल त्याचे दिशादिग्दर्शन करणे ह्या परिषदेतून व्हावे, त्यासाठी विविध सदस्य देशांमध्ये एक व्यापक सहमती बनावी आणि भविष्यातील जग अधिक सक्षम, अधिक सुरक्षित, अधिक सुसह्य बनविण्याच्या दिशेने ही परिषद एक मैलाचा दगड ठरावी हीच यजमान भारताची आज अपेक्षा आहे. त्या दिशेने विश्वबंधुत्वाच्या भारतीय विचारांशी सुसंगत अशी मानवकल्याणकारी सर्वसहमती ह्या परिषदेत घडणार की युक्रेनसारख्या विषयांवरून सध्या जगात निर्माण झालेली दुफळीच येथे प्रतिबिंबित होणार हे पाहूया!