उत्तर गोवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने शिरगाव येथील श्री लईराई जत्रोत्सवासाठी सुरक्षा आणि गर्दीचे व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी उत्सवातील स्टॉल्सचे नियमन आणि मंजुरीची देखरेख करण्यासाठी एका उपसमितीची नियुक्ती केली आहे.
राज्य सरकारने लईराई जत्रोत्सवाच्या सुरक्षा व्यवस्थेवर भर दिला आहे. राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठातसुध्दा भाविक व भक्तांच्या सुरक्षेची हमी दिलेली आहे. डिचोलीचे उपजिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी (एसडीओ) यांच्या अध्यक्षतेखाली उपसमितीची नियुक्ती करण्यात आली आहे. या उपसमितीमध्ये डिचोलीचे पोलीस उपअधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, अग्निसुरक्षा अधिकारी, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग (इमारती), कार्यकारी अभियंता, विद्युत विभाग, शिरगाव येथील श्री लईराई संस्थानाच्या व्यवस्थापन समितीचे प्रतिनिधी, शिरगाव ग्रामपंचायत सचिव यांचा या समावेश आहे.
उपसमितीचे सदस्य म्हणून डिचोली मामलेदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती प्रस्तावाची छाननी करणार असून प्रस्ताव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मंजुरीसाठी सादर करणार आहे. समिती आज 10 एप्रिल 2026 रोजी अहवाल सादर करणार आहे.

