Home बातम्या ‘रोहयो’ खाली काम देणे अशक्य झाल्यास शंभर दिवसांचे वेतन द्यावे

‘रोहयो’ खाली काम देणे अशक्य झाल्यास शंभर दिवसांचे वेतन द्यावे

0

चंद्रकांत कवळेकर यांची विधानसभेत मागणी

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखाली काम मिळावे यासाठी ज्या लोकांनी कार्डे केलेली आहेत त्यांना सरकारने शंभर दिवसांचे काम द्यावे व ते देण्यास अपयश आल्यास त्यांना शंभर दिवसांच्या कामाचा पगार द्यावा, अशी मागणी काल कॉंग्रेसचे आमदार चंद्रकांत कवळेकर यांनी विधानसभेत केली.

जमीनमालक आक्षेप घेत असल्याने बरीचशी कामे अडून पडत असतात. परिणामी सरकारला राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखाली १०० दिवस काम देणे शक्य होत नसल्याचे चित्र राज्यात पहावयास मिळत असल्याचे कवळेकर यांनी यावेळी सांगितले. सरकारच्या या अपयशामुळे लोकांचे नुकसान होत असल्याने या योजनेखाली काम देण्यास अपयश आल्यास सरकारने त्यांना त्यानी कमी दिवस काम केल्यासही १०० दिवसांचे वेतन द्यावे, अशी सूचना कवळेकर यांनी केली.

काही पंचायती काम नसल्याचे सांगून निधी परत पाठवत असल्याचेही यावेळी कवळेकर यांनी सभागृहाच्या नजरेत आणून दिले. तर काही पंचायतींना वरील योजनेखाली निधीच उपलब्ध करून देण्यात आला नसल्याचे आमदार डॉ. प्रमोद सावंत म्हणाले. तर कसलेच काम न करता काम केल्याचा बहाणा करून काही लोकांनी पैसे घेऊन खाण्याच्या घटना मागील सरकारच्या काळात झाल्याचा आरोप यावेळी आमदार मायकल लोबो यांनी केला व त्याची चौकशी करण्याची मागणी केली. यावेळी उत्तर देताना पंचायतमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पंचायतींना लोकांना वरील योजनेखाली १०० दिवस काम देण्यास अपयश येत असल्याचे वृत्त खरे असल्याचे सांगितले. तसेच त्यांना शंभर दिवसांचे वेतन देण्यात यावे ही मागणीही योग्य असल्याचे ते म्हणाले व त्यात लक्ष घालण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.