Home Featured रोशन रेडकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

रोशन रेडकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

0

बर्च नाईटक्लब अग्नितांडव प्रकरणात हडफडे-नागवाचे पदच्युत माजी सरपंच रोशन रेडकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज काल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फेटाळला. दरम्यान, गोवा पोलिसांनी फरार रोशन रेडकर यांच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे, अशी माहिती उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर यांनी काल दिली.

हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन या नाईटक्लबमधील अग्नितांडव प्रकरणात रोशन रेडकर यांचा शोध हणजूण पोलीस घेत आहेत. या दुर्घटनेत 25 जणांचा बळी गेला होता. रेडकर यांनी म्हापसा येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर, त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात धाव घेऊन म्हापसा येथील अतिरिक्त न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देऊन जामीन मंजूर करण्याची मागणी केली होती.

उच्च न्यायालयाने रेडकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी दोन दिवसापूर्वी पूर्ण करून निवाडा राखून ठेवला होता. आता उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.
रोशन रेडकर यांचा विविध भागात शोध घेतला जात आहे. त्यांच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे, असे उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर यांनी सांगितले.