रोज दोन हजारांची चाचणी शक्य

0
140

>> चाचणी सुविधांत वाढ : आरोग्यमंत्री

राज्याच्या सील केलेल्या सीमा खुल्या करण्यात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर परराज्यांतून गोव्यात येणार्‍या कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडा गेल्या दोन-तीन दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर आरोग्य खात्याने कोरोना चाचणीसाठीच्या सुविधांतही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. रॅपिड चाचणीसाठी आणखी पाच नवी ट्रुनेट मशिन राज्यभरात बनवण्यात येणार असून म्हापसा व मडगाव येथील जिल्हा इस्पितळात प्रत्येकी एक तसेच फोंडा येथील तीन उपजिल्हा इस्पितळातही प्रत्येकी एक ट्रुनेट रॅपिड चाचणी मशीन बसवण्यात येणार आहे, अशी माहिती काल आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यानी दिली.

यापुढे रेल्वे अथवा विमानाद्वारे मोठ्या संख्येने राज्यात येणार असलेल्या लोकांच्या विनाविलंब कोरोनासाठीच्या चाचण्या करता याव्यात यासाठी ट्रुनेट रॅपिड मशिनाबरोबरच मनुष्यबळही वाढवण्यात येणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. रेल्वे व विमानाद्वारे मोठ्या संख्येने येणार्‍या लोकांना चाचण्यांसाठी ताटकळत रहावे लागू नये यासाठी वरील सोय करण्याचा आरोग्य खात्याने निर्णय घेतला आहे.
राज्यातील लोकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी आरोग्य खात्यातील आघाडीवरील कर्मचारिवर्ग अथकपणे काम करीत असल्याचे सांगून लोकांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी अन्य उपायांबरोबरच वृत्तपत्रांतून जाहिरातीही प्रसिद्ध करण्यात येत आहेत.
राज्याच्या तपासणी नाक्यावर सीमेपलीकडून येणार्‍या लोकांची चाचणी करणारे आरोग्य खात्याचे कर्मचारी सुरक्षित रहावेत यासाठी त्यांचीही कोरोनासाठीची चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.