रैनाला करायचेय पुनरागमन

0
159

 

टीम इंडियाचा माजी खेळाडू सुरेश रैना याने भारतीय संघात परतण्याची आशा अजून सोडलेली नाही. ‘इन्स्ट्राग्राम लाईव्ह चॅट’ दरम्यान रैनाने रोहित शर्माशी आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली.

रैना म्हणाला की संघात परत येण्यासाठी मी मेहनत घेत आहे. मी स्वत:मध्ये सुधारणा केली. गुडघा दुखापतीनंतर मी तंदुरुस्तीवर काम करत होतो आणि या प्रक्रियेत मी ‘यो-यो’ चाचणी देखील उत्तीर्ण झालो. मी भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहे. मोठ्या खेळाडूंनी नेहमीच कठीण काळात मला साथ दिली आहे. मला वाटते अजूनही माझ्यामध्ये क्रिकेट शिल्लक आहे.

भारताच्या वनडे आणि टी-ट्वेंटी संघाचा उपकर्णधार असलेल्या रोहितनेही म्हटले की रैनाने भारतीय संघात असायला हवे. रोहित म्हणाला, ’मला माहित आहे की इतके वर्षे खेळल्यानंतर संघातून बाहेर असणे कठीण आहे. आम्ही नेहमी बोलत असतो की रैनाला संघात परत घ्यायला हवे. पण संघनिवड आमच्या हातात नाही आणि आपण केवळ मेहनत करु शकतो.’
रैनाने आत्तापर्यंत १८ कसोटी, २२६ वनडे आणि ७८ आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत ७६८ धावा, वनडेत ५६१५ धावा आणि आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये १६०५ धावा केल्या आहेत. तसेच रैनाच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटध्ये ७ शतके आहेत.

रैना-रोहितच्या संघाचा धोनी कप्तान
चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणारा सुरेश रैना व मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा यांनी यावेळी चेन्नई व मुंबई यांची संयुक्त टीमदेखील निवडली. या दोघांनी सलामीसाठी मॅथ्यू हेडन व सचिन तेंडुलकर यांना सलामीला संधी दिली. रैना व रोहितने या संघात स्वतःला निवडले नाही. तिसर्‍या स्थानासाठी फाफ ड्युप्लेसी व चौथ्या स्थानासाठी अंबाती रायडूला उभयतांना पसंती दिली. महेंद्रसिंग याच्याकडे संघाचे नेतृत्व सोपविण्याबाबत दोघांमध्ये एकमत झाले. कायरन पोलार्ड, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा व ड्वेन ब्राव्हो यांच्या रुपात चार अष्टपैलूंना या दोघांनी संघात स्थान दिले. हरभजन सिंग व जसप्रीत बुमराह या केवळ दोन स्पेशलिस्ट गोलदाजांना संघात स्थान मिळाले.