सत्तरी तालुक्यातील रेडेघाटी परिसरात रविवारी मध्यरात्री झालेल्या भीषण रस्ता अपघातात सोनाळ गावातील विशाल गावकर (36) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. होंडा भागातून वाळपईच्या दिशेने येत असताना रेडेघाटी परिसरात हा अपघात झाला. अपघातानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्यांना वाळपई सरकारी सामाजिक रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
विशाल गावकर हे रविवारी मध्यरात्री होंडा भागातून वाळपईच्या दिशेने येत होते. रेडेघाटी परिसरात त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार बसला व मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला.
अपघातानंतर विशाल यांना तातडीने वाळपई सरकारी सामाजिक रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
वाळपई सरकारी सामाजिक रुग्णालयातून विशाल गावकर यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला. उत्तरीय तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
त्यानंतर काल सोमवारी संध्याकाळी उशिरा सोनाळ येथे त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. विशाल गावकर यांची परिसरात एक चांगला आणि कुशल ट्रकचालक म्हणून वेगळी ओळख होती.

